’रामायण: भाग १’ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
’रामायण: भाग १’ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

सोमवार, ९ नोव्हेंबर, २०२६

रामायण- भाग १ : भव्य, नेत्रदीपक व चविष्ट विष!

मूळ महाकाव्याशी प्रतारणा करून आपली डावी विचारसरणी घुसडण्याला ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ म्हणता येणार नाही. हॉलिवूड असो वा बॉलिवूड, जेव्हा जेव्हा मूळ महाकाव्यांच्या गाभ्यात, मूळ विचारांत जाणीवपूर्वक मुद्दाम बदल केला जातो तेव्हा ते कलात्मक स्वातंत्र्य (सिनेमॅटिक लिबर्टी) राहत नाही; तर तो इतिहास, संस्कृती आणि श्रद्धा यांचा पद्धतशीर विपर्यास ठरतो. आपल्या संस्कृतीच्या मूळ ग्रथांना त्यांच्या अस्सल स्वरूपात स्वीकारण्याऐवजी, त्यांना डाव्या विचारसरणीच्या आकर्षक झबल्यात कोंबले जाते हा साहित्याशी केलेला मोठा विश्वासघातच आहे. ’रामायण: भाग १’ या चित्रपटाने तो केला आहे.

हॉलिवूडमध्ये महाकाव्यांवर चित्रपट बनवताना समता, स्वातंत्र्य, स्त्रीवाद आणि वर्गसंघर्ष या डाव्या विचारसरणीत कोंबले जातात. नवीन महाकाव्य निर्माण करून ते मांडण्याऐवजी लोकांची श्रद्धा असलेल्या महाकाव्यास स्वत:च्या अजेंड्यानुसार बदलणे सोपे जाते. हॉलिवूडमधील ही घाण आता बॉलिवूडमध्येही फोफावत आहे. ‘रामायण’ हा भव्य, नेत्रदीपक व चविष्ट चित्रपट त्याच विषात (स्लो पॉइझनिंग) बरबटलेला आहे.

दिग्दर्शक नितेश तिवारी व निर्माता नमित मल्होत्रा यांचा ‘रामायण: भाग १’ हा चित्रपटही वाल्मिकी रामायणाशी फारकत घेत वर्गसंघर्ष, शोषक-शोषित आणि स्त्रीवादी (फेमिनिस्ट) बनवला आहे. वाल्मिकी रामायणात रावण हा स्त्रीलंपट, हजारो स्त्रियांचे शीलहरण करणारा, अहंकारी राजा आहे. राम-रावण हे युद्धही केवळ त्याच्या स्त्रीलंपटपणामुळेच घडते. ‘रामायण: भाग १’ या चित्रपटात रावणाचा स्त्रीलंपटपणाच वगळण्यात आला आहे. त्याला स्त्रियांविषयी मर्यादा सांभाळणारा, स्वत:च्या कुळावर झालेला अन्याय दूर करणारा वगैरे दाखवले आहे. 

वाल्मिकी रामायणात राम मर्यादा पुरुषोत्तम आहे. चित्रपटात रावण मर्यादा पुरुषोत्तम दाखवला आहे. रावणाने लैंगिक अत्याचार केलेल्या किमान दोन स्त्रियांचे थेट उल्लेख रामायणात आहेत. पुंजिकस्थला व रंभा या त्या दोन स्त्रिया. याशिवाय शेकडो कन्या व विवाहित स्त्रिया यांचे उपभोगासाठी अपहरण केल्याचा उल्लेख रामायणात येतो. सुंदर स्त्री दिसली की तिचे नातेवाईक मारून तिला पुष्पक विमानात बंदिस्त करण्याचे वर्णन रामायणात आहे. शेकडो स्त्रिया व कन्या रावणाच्या कामवासनेस बळी पडल्या होत्या. तो भाग चित्रपटात टाळला आहे.

शूर्पणखा (तिला सूर्पणखा का म्हटले आहे लेखकच जाणोत!) आपले जरासे कापलेले नाक घेऊन रावणासमोर जाते तेव्हाही ती बहिणीच्या अपमानाचा सूड घेण्याबद्दल बोलते. वास्तविक वाल्मिकी रामायणात ती रावणासमोर सीतीचे कामुक वर्णन करते. पण, चित्रपटात ते दाखवले असते, तर स्त्रियांबाबत रावणाच्या ‘मर्यादा पुरोषोत्तम’ असण्यास बाधा आली असती. त्यामुळे, रावणाचा लंपटपणा व्यक्त होईल अशी चित्रपटाची भूमिका अजिबात नाही. उलट ‘वंचित, शोषित राक्षस कुळाला न्याय देणारा रावण’, अशी भूमिका चित्रपट मांडतो. 

ऋषिकुळावर व मानवांवर अत्याचार करणारे राक्षस हे मुळात विश्‍वकर्म्याने बांधलेल्या सोन्याच्या लंकेतच राहत असतात. ते देवलोक जिंकण्यासाठी बाहेर पडतात व युद्ध हरून रसातळात लपून बसतात. ओस पडलेल्या लंकेत कुबेर येऊन राहू लागतो. तिथेही त्यांचे राज्य असते. राक्षस हे कुणी देवांनी अन्याय केलेले शोषित, वंचित नव्हते. या चित्रपटात त्यांना तसे दाखवण्यात आले आहे. रावण, कुंभकर्ण आणि विभीषण यांनी ब्रह्मदेवाकडून वर मिळवल्याचे समजल्यानंतर सुमाली आपल्या मारीच, प्रहस्त, विरूपाक्ष आणि महोदर या मंत्र्यासोबत रसातळातून बाहेर आल्याचे वर्णन वाल्मिकी रामायणात (उत्तररकांड, सर्ग ११)आहे. त्यापूर्वी सुमाली सुवर्णकुंडले घालून पृथ्वीवर फिरत असल्याचे वर्णन उत्तरकांडाच्या नवव्या सर्गात येते. 

चित्रपटातील वंचित, पीडित, भुकेलेल्या राक्षसांसमोर रावणाने केलेले भाषण साक्षात कार्ल मार्क्सने लिहिले असावे, असा भास होतो. शोषित, वंचित, भेदभाव सहन करणार्‍या राक्षसांवरील (चित्रपटात त्यांना असुर म्हटले आहे, जे चुकीचे आहे)अन्याय दूर करण्यासाठी उभा ठाकलेला समाजवादी क्रांतिकारी अशी रावणाची प्रतिमा संपूर्ण चित्रपट उभी करतो. त्याचे युद्धही बहिणीच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी व कुळावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी असल्याची भूमिका चित्रपट मांडतो. हे मूळ वाल्मिकी रामायणाच्याच विरुद्ध आहे. 

अत्यंत पळपुटा, विलासी, स्त्रीलंपटपणामुळे संपूर्ण ट्रॉय शहराचा महाविनाश ओढवून घेणारा होमरच्या ‘इलियाड’ या महाकाव्यातला पॅरिस ‘ट्रॉय’ या हॉलिवूडपटात मात्र प्रेमासाठी सर्वस्व पणाला लावणारा महायोद्धा दाखवला आहे. तसेच या चित्रपटात रावणाची स्त्रीलंपट व लैंगिक अत्याचाराची सत्यता लपवून त्याला वंचितांच्या अन्यायाविरुद्ध लढणारा समाजवादी क्रांतिकारी साकारला आहे. 

ब्रिटनच्या आर्थरियन आख्यायिकांत राणी ग्वेनेव्हिर ही एक अत्यंत सुसंस्कृत, राजेशाही थाटात राहणारी आणि लावण्यवती राणी आहे. ‘किंग आर्थर’ या चित्रपटात तिला अर्धनग्न, तलवार-धनुष्य लीलया चालवणारी एक आदिवासी गनिमी कावा करणारी योद्धा साकारले गेले. ग्वेनेव्हिर कधीही प्रत्यक्ष रणांगणात तलवार घेऊन लढल्याचे मूळ कथेत नसतानाही केवळ स्त्रीवादी (फेमिनिस्ट) प्रतिमा प्रस्थापित करण्यासाठी अनेक प्रसंग चित्रपटात घुसडले. सीतेच्या हाती तलवार देऊन तिला खरदूषण युद्धप्रसंगी रामलक्ष्मणासोबत युद्ध करताना दाखवून या चित्रपटानेही तेच केले आहे. 

मूळ महाकाव्याशी प्रतारणा करून आपली डावी विचारसरणी घुसडण्याला ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ म्हणता येणार नाही. हॉलिवूड असो वा बॉलिवूड, जेव्हा जेव्हा मूळ महाकाव्यांच्या गाभ्यात, मूळ विचारांत जाणीवपूर्वक मुद्दाम बदल केला जातो तेव्हा ते कलात्मक स्वातंत्र्य (सिनेमॅटिक लिबर्टी) राहत नाही; तर तो इतिहास, संस्कृती आणि श्रद्धा यांचा पद्धतशीर विपर्यास ठरतो. आपल्या संस्कृतीच्या मूळ ग्रथांना त्यांच्या अस्सल स्वरूपात स्वीकारण्याऐवजी, त्यांना डाव्या विचारसरणीच्या आकर्षक झबल्यात कोंबले जाते हा साहित्याशी केलेला मोठा विश्वासघातच आहे. ‘रामायण: भाग १’ या चित्रपटाने तो केला आहे.

‘चित्रपटच तर आहे, त्यात काय एवढे?’ असे म्हणून सोडून देण्याचा हा विषय नाही. ही विषपेरणी आहे. चित्रपट भव्य, नेत्रसुखद निश्‍चितच आहे. त्याबद्दल वाद नाही. पण, चित्रपट जी भूमिका मांडतो, ती वाल्मिकी रामायणाशी प्रामाणिक नाही. त्यामुळे, विष कितीही चविष्ट असले तरी ते घातकच असते. त्याचा परिणाम दुर्लक्षित करून चवीची स्तुती करण्यात काहीही अर्थ नसतो!