‘अहो उठा!’ हे दोन शब्द लग्न झाल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या सुरात कानावर पडतात. स्वत:च्या पाकळीवर पडलेले चांदण्याचे ओझेही सहन न झालेल्या गुलाबाने केलेले लडिवाळ आर्जव ते सुरकुतलेल्या चेहऱ्यावर झिजलेले हात ठेवत वात्सल्याने ओथंबलेले मार्दव, इतका मोठा या दोन शब्दांचा प्रवास असतो.
बायकोने झोपेतून प्रेमाने जागे करण्याचे क्षण वीस पंचवीस वर्षांनंतर तसे कमीच येतात. पण, आज तो क्षण आला. अगदी संसाराच्या पहिल्या पहाटेत मला घेऊन गेला. तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. ‘अहो, उठा! खिडकीत पाहा. तुमच्यासाठी सरप्राइज आहे’. येऊन पाहतो, चार पाच गुलाबी फुले उमलली होती. त्यांना काय म्हणतात तेही माहीत नाही, पण हिच्या चेहऱ्यावर तो आनंद पाहूनच आनंदलो. संसारात सुखाचे हे असे छोटे छोटे क्षणच स्त्रीसाठी खूप महत्त्वाचे असतात. तिच्या खूप मोठ्या अपेक्षा नसतात. आपल्या छोट्या छोट्या आनंदात, आपल्या जाणिवांत नवऱ्याची जाणीव असावी, ती मिसळावी असेच वाटत असते. सुखाच्या या लहान लहान क्षणांना गोळा करतच दु:खाचे डोंगर पार करायचे असतात.
‘स्त्रीला नेमके काय हवे असते?’ या गहन प्रश्नाचे उत्तर कदाचित सापडणारही नाही. ते शोधूही नये. लग्न झाल्यानंतरच्या नव्यानवेल्या दिवसांत, ‘आपलं किती प्रेम आहे’ हे दाखवायची हौस असते. प्रत्येक गोष्टीत ते दाखवायचा अट्टहास असतो. पंधरा वीस वर्षे गेल्यानंतर लक्षांत येते की, तिला ते दाखवून दिलेले नको असते; तिला ते दिसायला हवे असते. संसार हा असाच उणिवांना, जाणिवांना शिकत जाण्याचा, त्यावर भाळण्याचा आणि सांभाळण्याचा प्रवास आहे. अगदी आंग्लाळलेल्या विचारांनी सांगायचे तर आपली ‘बॅचलर्स’ पदवी हरवूनही आपण ‘मास्टर’ न होण्याचा खटाटोप आहे.
तिचा आनंद कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह काही केल्या आवरता आला नाही. हाच फोटो आणखी काही वर्षांनी पाहेन तेव्हा हीच सकाळ जशीच्या तशी आठवेल. आजचा तिचा आनंद तेव्हाही माझ्या मनात, चेहऱ्यावर ओसंडून वाहेल. ती फुले नसतील कदाचित, ते क्षण तसेच असतील आणि हिचं ते ‘अहो उठा!’ म्हणणेही...

kya baat hai!
उत्तर द्याहटवाखुप छान👍
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवासंसारात सुखाचे हे असे छोटे छोटे क्षणच स्त्रीसाठी खूप महत्त्वाचे असतात. तिच्या खूप मोठ्या अपेक्षा नसतात. आपल्या छोट्या छोट्या आनंदात, आपल्या जाणिवांत नवऱ्याची जाणीव असावी, ती मिसळावी असेच वाटत असते. सुखाच्या या लहान लहान क्षणांना गोळा करतच दु:खाचे डोंगर पार करायचे असतात.
उत्तर द्याहटवाअगदी छान शब्दांमध्ये मांडलेत. आवडलं. 👌
"बॅचलर पदवी हरवून मास्टर न होण्याचा खटाटोप " हे अचूक आहे.
उत्तर द्याहटवाफोटोत तुमच्या गुलाबांनी कात टाकली अस वाटल!
उत्तर द्याहटवामस्त
उत्तर द्याहटवा