‘सरोज खरे म्हणतात, ‘कुमार गिरीशमध्ये आम्हाला काही चमत्कारिक ट्रेट्स दिसतात. असे थोडे आउट ऑफ द वे वागणार्या मुलांमध्ये हे विवक्षित गुण कुठून आले याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या पालकांच्यातल्या ट्रेट्स पाहाव्या लागतात. प्रॉफेसर ऑस्ट्रोजेमची थिअरी आहे. पॅरेन्ट सायकॉलॉजीवर ऑथोरिटी आहे ती’ त्यावर जोशी म्हणतात, ‘हो हो प्रश्नच नाही. ऑस्ट्रोजेम म्हणजे काय, ही इज अ जेम’ त्यावर सरोज खरे म्हणतात,‘ही नाही शी आहे ती’. त्यावर चतुरपणे स्वत:ची बाजू सांभाळत, ‘मी मराठी ‘ही’ म्हटली’, असे जोशी उद्गारतात.’
हा प्रसंग आठवायला कारण ठरला तो अनंत गोब्रे या पुलंना न भेटलेल्या वल्लीने पाठवलेला व्हॉट्सअॅप मेसेज. रत्नांग्रीच्या त्या मधल्या आळीतले सगळे घेऊन वेळगे ग्रामीची ही ‘अंतू गोब्रे’ नामक व्यक्ती पुलंना भेटायला हवी होती, असे प्रत्येक अनुभवागणिक वाटते. असो! ‘गोमन्तक टीव्ही’च्या एका फेसबुक पोस्टचा स्क्रीन शॉट अंतूने पाठवला होता. त्यात पूजा नाईकने आपल्याला नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले होते. तो मजकूर इंग्रजीत होता आणि त्यात पूजा नाईक विषयी ‘He didn't receive the legal notice sent by IAS officer Nikhil Desai in the 'Cash for Job' case, says he will also drag Desai's chief engineer Uttam Parsekar along with Desai, the main accused Pooja Naik said while speaking to 'Gomantak' on Saturday. ’ असे इंग्रजीत लिहिलेले दिसत होते. त्या स्क्रीनशॉटखाली अंतूचा मला प्रश्न, ‘हा लिंगबदल कधी झाला?’
अर्थात माझ्याही लक्षात येईना ही चूक कशी झाली. मी फेसबुक धुंडाळले. पण, ती बातमी काही सापडली नाही. मग मी तीच मेसेज सुशांत मांगलेकरला फॉरवर्ड केली. तो बिचारा त्याच्या नवजात मुलीला आंघोळ घालण्यात व्यग्र होता. मूल जन्माला घातले म्हणजे वडील होत नाही, वडील होण्याचा हा प्रवास फार मोठा असतो, याचा अनुभव तो आताशा घेऊ लागलाय. थोड्या वेळाने त्याचा फोन आला. तो म्हणला, ‘ती मूळ पोस्ट मराठीत आहे. तुम्हांला मूळ बातमीचा स्क्रीनशॉट पाठवलाय. तुमच्या मित्राच्या मोबाइलवर ऑटो ट्रान्स्लेट ऑन असल्याने हे झाले असावे.’
सुशांतची व्हॉट्सअॅप मेसेज पाहिली तेव्हा घोळ लक्षांत आला. ‘ऑटो ट्रान्स्लेट’ ही सुविधा सुरू असल्यामुळे अंतूच्या मोबाइलवर मूळ मराठी मजकूर इंग्रजीत दिसत होता. त्यात ‘.... या प्रकरणातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने शनिवारी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले’, असे होते त्याचे इंग्रजी भाषांतर करताना मराठीतीले ‘हिने’ इंग्रजीत कसे घ्यावे हे न कळल्याने मराठीतली ‘ही’, इंग्रजीतही तशीच राहिली. इंग्रजी बातमीत पूजा नाईकचा झालेला ‘लिंगबदल’ हा ‘ऑटो ट्रान्सलेट’चा घोळ होता.
असे अनेक घोळ प्रत्येक वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया खाती यांवर होत असतात. काही चुका खरोखरच ‘उपसंपादकाच्या डुलक्या’ व ‘मुद्राराक्षसाचे विनोद’ असतात, यात दुमत नाही. पण प्रत्येक खेपेस तसेच असते, असे नाही. चूक कुणाकडूनही होऊ शकते, हे जाणून कोणताही पूर्वग्रह न बाळगता टीका करण्यास काहीच हरकत नाही. ‘सुधारणा व्हावी’ हा निखळ हेतू असावा. जसा आमच्या अंतूचा होता!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा