एकोणीस वर्षांच्या वेदमूर्ती देवव्रत रेखे याचा देशाला काय फायदा? असा प्रश्न विचारणाऱ्यांंनी फक्त पाठांतर पद्धतीचा अभ्यास केला तरी अचंबित व्हायला होईल. पाठांतर, घोकंपट्टी, रेटून काही फायदा नाही; आधी अर्थ समजून घ्यायला हवा, हा विचार फार घातक आहे. ज्या वयात पाठांतर करण्याची शक्ती असते त्याच वयात ते करावे लागते. अर्थ समजून घेण्यासाठी आयुष्यही पुरत नाही. ख्रिश्चन मिशनरि आणि ब्रिटिश लेखकांनी लिहिलेल्या द्वेषपूर्ण व चुकीच्या लिखाणास प्रमाण मानून आपल्या संस्कृतीला हीन समजणारे स्वाभिमानशून्य विचारवंत हाच प्रश्न विचारतात, "काय फायदा?"
वेदपठणाच्या एकूण अकरा पद्धती आहेत, ज्या दोन भागांत विभागलेल्या आहेत; प्रकृती आणि विकृती. मूलभूत, नैसर्गिक असलेल्या प्रकृती पाठांतर्गत संहिता (सर्वांत मूळ आणि सामान्य क्रम पाठ करणे), पद पाठ (संहितेतील प्रत्येक शब्द किंवा पद वेगळे करून, विराम देऊन पाठ करणे) आणि क्रम पाठ (शब्द जोड्यांमध्ये पाठ करणे). याशिवाय, आठ विकृती पाठ आहेत. विकृती म्हणजे बदल(चुकीचे किंवा नकारात्मक नव्हेत) करून पाठ करणे. विकृती पाठांतर्गत जटा (शब्दांची उलट-सुलट मांडणी करून पाठ करणे, माला (शब्दांना एका विशिष्ट क्रमाने पुन्हा पुन्हा माळेसारखे जोडून पाठ करणे), शिखा ( शिखेसारखी रचना असलेली व शब्दांचा क्रम वर-खाली करत पाठकरणे), रेखा ( शब्दांची विशिष्ट पद्धतीने रेषेसारखी मांडणी करून पाठ करणे), ध्वज (ध्वजाच्या आकाराप्रमाणे शब्दांची मांडणी करत पाठ करणे), दंड ( दंड किंवा काठीच्या सरळ रेषेप्रमाणे एक विशिष्ट क्रमात पाठ करणे, रथ (रथाच्या चाकाप्रमाणे शब्दांचा क्रम चक्राकार ठेवत पाठ करणे) आणि घन (शब्दांची अत्यंत गुंतागुंतीची रचना आणि अनेक दिशांनी ती पाठ करणे) या आठ आहेत. या सर्व अकरा पद्धतींनी हजारो वर्षांपासून वेदांचे मूळ स्वरूप आणि अचूक उच्चारण जतन केले आहे. या पद्धती केवळ पाठांतरासाठीच नव्हे, तर मंत्रांचे व्याकरण, स्वर आणि अर्थ न बदलता ते जसेच्या तसे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार केल्या गेल्या होत्या.
याचा फायदाच हवा असेल तर सांगतो,
सती अपवादात्मक असताना तिला प्रथा म्हणून सिद्ध करण्याचा आणि वेदकाळापासून ती प्रचलित असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न हेन्री थॉमस कोलब्रूक यांनी १७९५ साली केला. त्यांनी
अ॒न॒श्रवो॑ऽनमी॒वाः सु॒रत्ना॒ आ रो॑हन्त॒ं जन॑यो॒ योनि॒मग्रे॑ ॥
(प्रेतासोबत जाणार्या स्त्रिया, ज्यांचे पती जिवंत आहेत किंवा युवा आहेत, त्यांनी आणि विधवा झालेल्या स्त्रीने जलाशयासमीप जाऊन डोळे, तोंड धुवावे आणि पुन्हा स्वस्थ होऊन घरी जावे.)
हा ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील अठराव्या सूक्तातील सातवा मंत्र जो बहुधा अंत्येष्टी (अंत्यसंस्कार) विधीत वापरला जातो, तो चक्क बदलला. अग्रे (पुढे जा) हा शब्द बदलून तिथे अग्ने (अग्नीत जा) हा शब्द घातला. हे विधवे तू अग्निप्रवेश कर असा अर्थ करून सती जाण्याची आज्ञा वेदात आहे, असे भासवले. या सर्व पाठांतर पद्धतीतून वेदाध्ययन केलेल्या विद्वानांनी ही बदमाशी उघड केली. त्यामुळे, विलियम जोन्स यांनी मंत्राचे भाषांतर चुकल्याचे सांगितले. संस्कृतचे विद्वान एच. एच. विल्सन यांनी सायणाचार्यांप्रमाणे त्याचा खोटारडेपणा जगासमोर आणला. हे केवळ त्या पाठपद्धतीमुळे शक्य झाले. अन्यथा लिहिलेले असते, तर त्यात बदल करून तेच आमच्या माथी मारले गेले असते.
याच्याच पुढील मंत्रात
ह॒स्त॒ग्रा॒भस्य॑ दिधि॒षोस्तवे॒दं पत्यु॑र्जनि॒त्वम॒भि सं ब॑भूथ ॥
(हे स्त्री, तू उठ, जिवंत लोकांच्या जगात परत ये. ज्याच्या शेजारी तू झोपली होतीस, तो मृत झाला आहे. (तुझे) पत्नीपण आता संपले आहे, तरी तू इथेच राहून संसार कर) असा स्पष्ट उल्लेख आहे. असे असतानाही सती ही प्रथा होती, असे सांगत जो भंपकपणा केला जातो, तो किळस आणणारा आहे.
आता तर "विधवा प्रथा" नामक बिनडोक प्रकार सुरू झाला आहे. विधवा होणे ही अवस्था आहे, ती प्रथा कशी होऊ शकते, हा साधा विचारही या विचारवंतांना सुचत नाही. प्रथा म्हणून संस्कृतीस एकदा हीन ठरवायचेच असे ठरवले की मग अपवादासही नियम करणे ओघाने आलेच. याविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे. ही आपली संस्कृती आहे. ना ती ब्राह्मणी आहे, ना बाहेरून आलेल्या युरेशिअन आर्यांची आहे, ना ती बहुजनविरोधी आहे. उलट यातील अनेक सूक्ते आज ज्यांना बहुजन म्हटले जाते, अशा ऋषींनीच रचलेली आहेत. ती परंपरा, ती संस्कृती जशास तशी जतन करण्याचा फायदा काय, असे विचारणार्या स्वाभिमानशून्यांना काय म्हणावे, तेच कळत नाही.
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद अशीच माहिती आपण देत रहावी जेणेकरून आमच्या हि ज्ञानात भर पडेल
उत्तर द्याहटवाटिका करणार्यांनी जन्मास येवून काय उजेड पाडला ते अगोदर स्पष्ट करावे. स्वतः काहीच करायच नाही, इतरांना करु द्यायच नाही, अशी स्वत्व हरवलेली स्वाभिमान शुन्य
उत्तर द्याहटवालोकांना दूर्लक्ष करणेच योग्य.