मंगळवार, १३ जानेवारी, २०२६

अख्तर, मांगले आणि पुन्हा देवाचे नसणे

जसा देव आस्तिकास आठवतो, तसाच तो नास्तिकासही आठवतो; फक्त जागा वेगळी असते. आस्तिकाला तो भक्ती करताना आठवतो, तर नास्तिकाला वाद घालताना. सामान्य माणसाला देव कुठे व कशात दिसेल ते काही सांगता यायचे नाही. आईला तो बाळमुखातून बोलताना दिसतो, तर शेतकर्‍यास उंच पिकात डोलताना दिसतो; शेवटे ते ‘दिसणे’ आहे, ‘पाहणे’ नाही. पाहायला गेलात तर देव कधीच दिसणार नाही; तो दिसावाच लागतो. म्हणूनच कदाचित त्याला दर्शन म्हटले असावे.   - प्रसन्न शिवराम बर्वे
जावेद अख्तर यांनी खुदा नाही म्हटले व ते सिद्धही करण्याचा प्रयत्न केला. तशीच हुक्की बहुधा मांगल्यांच्या वैभवास आली असावी. खाज नास्तिकत्व सिद्ध करण्याची की आणखी कशाची, हे त्यांचे तेच जाणोत. पण, प्रश्‍न देवाच्या नसण्याचा असला तरी तो केवळ यांच्या नास्तिक असण्याचा निश्‍चितच नाही. 

मूळ भाषण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण ते काही उपलब्ध होऊ शकले नाही. हरकत नाही. पण, एकूण मुद्दा देव, त्याचे अस्तित्व, लुबाडणारे नास्तिक भट, कामधंदा नसलेले असहिष्णू हिंदू वगैरे वगैरे. हरकत नाही. 

भट नावाचा समाज इतकी हजारो वर्षे समस्त बहुजनांची लुबाडणूक करतो, यात नक्की अपमान कुणाचा आहे? देव अस्तित्वात नाही, पैसा कमावण्याचे साधन हे भटांना कळते पण किमान आठ हजार वर्षे बहुजनांना कळत नाही? बहुजन एवढीही बुद्धिमत्ता नसणारे व शेंड्या हलवीत पूजा करणारे भट इतके बुद्धिमान? हा तर्क ज्या महाभागांना मान्य आहे, त्यांना देव नाही, भट लुटारू हे मान्य होईल. देवस्थाने केवळ भटांची पोटे भरण्याकरता, असा एक युक्तिवाद मागे वाचनात आला होता. देवस्थान फक्त भट चालवतात, भक्त तिथे लुबाडून घ्यायला येतात. त्यांच्या घरी देव नसतो. देवळातही फक्त देव, भट आणि लुबाडले जाणारे बहुजन एवढेच असतात. अन्य व्यवसायांत चालतात तशाच लांड्यालबाड्या पौरोहित्यातही चालतात, यात काही दुमत नाही. पण, त्याचा संबंध धर्म, संस्कृती आणि देवाचे अस्तित्व याच्याशी लावणे तर्कहीन आहे. भट किंवा पौरोहित्य करणारे वाट्टेल तशा थापा देवाच्या, ग्रहांच्या नावे मारून शांती, जप वगैरे करायला लावतात. त्याबद्दल तेच दोषी आहेत, धर्म व देव नाही. एखादा डॉक्टर भीती घालून खर्चीक ऑपरेशन करायला लावतो, तेव्हा आपण दोष विज्ञानाला देतो का? आपण दोष त्या डॉक्टरपुरता मर्यादित ठेवतो. समस्त डॉक्टर जमातीसही नाही दोष देत. पण, जेव्हा हीच लांडेलबाडेगिरी भट करतात, तेव्हा दोष देवधर्मावर ठेवला जातो. हा सूक्ष्म फरकही लक्षांत घ्यायला हवा. 

‘देवाचे अस्तित्व नाही’ हा तर्क असेल तर कुठल्याच पंथाचे बंधन असता कामा नये. त्याला हिंदू धर्मापुरते मर्यादित करून चालणार नाही. देव ही संकल्पना जगात सर्वत्र आहे. नास्तिक देव नाही म्हणतात, तर आस्तिक देव आहे, असे म्हणतात. देव जसा हिंदूंचा आहे, तसाच तो ख्रिश्‍चनांचा व मुस्लिमांचाही आहे. मग, एकही नास्तिक अल्ला अस्तित्वात नाही, असे म्हणतो का? अगदी जावेद अख्तरही खुदा नाही म्हणतो, अल्ला नाही म्हणत नाही. 

‘आधी स्वत:चे घर स्वच्छ करतो, मग इतरांकडे पाहतो’, हे म्हणणार्‍यांच्या हाती झाडूऐवजी कुदळ दिसते, तेव्हा घर झाडायला नाही, तर पाडायला आले आहेत, हे स्पष्ट होते. ‘आम्ही हिंदू आहोत, म्हणून देवाबद्दल बोलतो’, असा तर्क अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांसारखा हे लोक लावतात. त्याच तर्काने जायचे तर ‘हिंदू धर्मात जो देव सांगितला जातो केवळ तोच अस्तित्वात नाही’, अशी स्पष्ट भूमिका घ्या ना. काहीच हरकत नाही. कुणीही काहीही म्हणणार नाही. नास्तिक असाल तर स्पष्टपणे हे सांगा की देव नाही, गॉड नाही आणि अल्लाही नाही. भटांनी, पाद्र्यांनी आणि मुल्लांनी स्वत:ची पोटे भरण्यासाठी देव, गॉड आणि अल्लाला निर्माण केले, असे सरळ व थेट विधान करा. एकही नास्तिक हे करणार नाही. अगदी तो इतर सर्व ठिकाणी सेक्युलर, पुरोगामी वगैरे असला तरीही. 

मांगल्यांचा वैभव जे स्वत:ला मारतील अशी भीती व्यक्त करत आहे, त्याची काहीच आवश्यकता नाही. कुणीही हिंदू ‘देव नाही म्हटले’ या कारणासाठी मारणार नाही. पण, खात्रीने सांगतो, हेच ‘अल्ला नाही हे माहीत असूनही मुल्लांनी स्वत:ची पोटे भरण्याकरता त्याला व मशिदीला निर्माण केले’, असे जर मांगले म्हणेल तर निश्‍चितच मरेल. त्यालाही ते पक्के माहीत आहे. आपले नास्तिकत्व फक्त हिंदूंपुरतेच ठेवायचे, त्याला अल्लापाशी, मुल्लापाशी आणि इस्लामपाशी न्यायचे नाही याची जाण त्याला आहे. 

हिंदू भक्त बेकार, बेरोजगार असतात, त्यांना काही कामधंदा नसतो हे सांगताना मांगले यांनी आपल्याच तर्काचे खंडन केले आहे. ज्याच्याकडे पाहून ज्ञानेश्‍वरांनी पसायदान रचले, ज्याच्याकडे पाहून तुकारामांनी गाथा लिहिली तो विठ्ठल त्यांच्यालेखी देव होता की नव्हता? की लहानपणी मांगल्यांच्या वैभवासोबत गोट्या खेळणारा त्याचा शेजारी कार्टा होता? देव नाहीच तर मग नसलेल्या विठ्ठलावर त्यांनी साहित्य काय स्वत:ची पोटे भरायला रचले? की, भटांसोबत त्यांचाही लोकांना नादी लावण्याचा जोडधंदा होता?

जसा देव आस्तिकास आठवतो, तसाच तो नास्तिकासही आठवतो; फक्त जागा वेगळी असते. आस्तिकाला तो भक्ती करताना आठवतो, तर नास्तिकाला वाद घालताना. सामान्य माणसाला देव कुठे व कशात दिसेल ते काही सांगता यायचे नाही. आईला तो बाळमुखातून बोलताना दिसतो, तर शेतकर्‍यास उंच पिकात डोलताना दिसतो; शेवटी ते ‘दिसणे’ आहे, ‘पाहणे’ नाही. पाहायला गेलात तर देव कधीच दिसणार नाही; तो दिसावाच लागतो. म्हणूनच कदाचित त्याला दर्शन म्हटले असावे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा