सोमवार, २५ मे, २०२६

वर्तमानपत्रात सर्वांत कमी काय वाचले जाते, अग्रलेख??

वर्तमानपत्रात सर्वांत कमी काय वाचले जाते, अग्रलेख??

परवाच एक मित्राने विचारले,

‘तुला माहिती आहे का, की वर्तमानपत्रात सर्वांत कमी काय वाचले जाते?’
‘नाही.’
‘काय? तुला माहीत नाही? पत्रकार ना तू! (हे एक अत्यंत अवघड प्रकरण आहे. पत्रकाराला सगळे माहीत असलेच पाहिजे असा या लोकांचा आग्रह. पत्रकार असण्याचा मानही, अपमान करण्यासाठीच दिला जातो.)
शरणागती पत्करत म्हटले, ‘नाही बाबा, खरेच माहीत नाही. तू सांग.’
तो म्हणाला, ‘अग्रलेख’
‘काय?’ मी उडालोच.
कुठल्या तरी सर्व्हेची कसली तरी आकडेवारी तोंडावर फेकत तो विजयी चेहर्‍याने विचारता झाला, ‘कळालं?’

त्याच्या डेटाने पुरवलेल्या ‘शास्त्रीय’ माहितीपुढे माझ्यासारख्या प्रतिगाम्याने वाद घालण्यात काही अर्थ नव्हता. गप्प बसलो.

हे आकड्यांचे खेळ करून आपल्याला हवे ते म्हणणे रेटण्याचा ‘साइंटिफिक’ खेळ अनेक ठिकाणी खेळला जातोय. हेच निकष लावायचे तर डॉन ब्रॅडमन, सुनिल गावस्कर, सचिन तेंडुलकर वगैरे फलंदाज अतिशय निकृष्ट दर्जाचे ठरतील. कायम शेवटी खेळायला येणारा फलंदाज, जो कमी चेंडू खेळून जास्त - म्हणजे चारपाच - धावा काढतो, तो सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरेल. अंक किंवा आकडे हे कमीत कमी कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी आंघोळ करणार्‍या नव्यानेच यौवनात प्रवेश केलेल्या मदालसेसारखे असतात; ते जे दाखवतात ते आकर्षक असते, लपवतात ते महत्त्वाचे असते!
अग्रलेखाचे महत्त्व तो किती लोक वाचतात, यावर ठरूच शकत नाही. अग्रलेख ही वर्तमानपत्राची भूमिका असते आणि दररोज घ्यावी लागते. ज्याला ‘बिटविन द लाइन्स’ म्हटले जाते ते प्रखरपणे सांगावे लागते. ते संपादकाचे वैयक्तिक मत नसते, ते वर्तमानपत्राचे मत असते. एखादा संपादक उजव्या विचारांचा असला, आणि वृत्तपत्र डाव्या विचारसरणीकडे झुकणारे असले; तरी त्याला स्वत:चे मत मांडता येत नाही. त्यासाठी त्याने वेगळा लेख लिहिला तरी चालतो; पण, अग्रलेखात ते घुसडणे पाप असते.

‘एखादी महत्त्वाची गोष्ट घडली तरच अग्रलेख लिहावा, अन्यथा लिहूच नये’ हा विचारच चुकीचा आहे. घटनेची बातमी होताना, त्यात हेतू किंवा भूमिका येता कामा नये. ती अग्रलेखात येणे अवश्यमेव असते. हडफड्यात घडलेल्या अग्नितांडवाची बातमी अग्रलेखापेक्षाही विस्तृत व जास्त माहिती देणारी असते. पण, त्यामागचा विचार, मत मांडण्याचे काम अग्रलेखाने करावयाचे असते. ते सर्वांसाठी असते. सामान्य वाचकांपासून सरकारपर्यंत सर्वांना त्यात घटनेचा बोध असतो.

लता मंगेशकर यांच्या स्वरकारकिर्दीस पंचवीस वर्षे झाली तेव्हा, त्याच्या बातम्या सर्वत्र झळकल्या, लेखही छापून आले. पण, ‘मराठा’मध्ये त्या दिवशी आचार्य अत्रे यांचा जो अग्रलेख आला होता त्याला तोड नाही. शीर्षकापासूनच सुरुवात, ‘स्वरलता’! अग्रलेखाची सुरुवातच वाचण्यासारखी व लता मंगेशकर म्हणजे काय याचे मूर्तिमंत शब्दरूप साकारणारी होती. ‘पक्ष्याचं कूजन, वाहणारा झरा, मोराचं नृत्य, पहिल्या पावसातल्या मातीचा गंध, यांना विशेषण लावण्याच्या फंदात पडू नये. त्याचप्रमाणे सच्चा प्रामाणिक सूर, याला फक्त ‘लता’ म्हणावं. अतिपरिचयानेसुद्धा ज्याची अवज्ञा झाली नाही, अशी एकच गोष्ट म्हणजे लताचा निखळ, मुक्त सूर!’ असा प्रारंभ केल्यानंतर अग्रलेखात पुढे मानवी ध्वनिसिद्धीच्या प्रांतातील अद्भुत चमत्कार असलेल्या लतादीदीच्या कंठाची मुक्तकंठाने स्तुती करताना अत्रे लिहितात, ‘उर्वशीच्या नुपूरांची रुणझूण, सरस्वतीच्या वीणेचा झंकार आणि कृष्णाच्या मुरलीची साद, हे सर्व एकवटून साक्षात विधात्यानेच लताचा कंठ घडवलेला असावा!’ लताच्या मृदू कंठाचे अभिवादन केवळ अग्रलेखातच होऊ शकते, वर्तमानपत्रातल्या अन्य कुठल्याही जाड्याभरड्या रकान्यात होऊच शकत नाही. प्रत्येकाची आपली जागा असते व ती तिथे, तशीच सांभाळायची असते!
आजतागायत असंख्य संपादकांनी लिहिलेल्या अग्रलेखातील शब्दसंचितांचे मूल्य कोण किती वाचतो, या आकड्यांत ठरवणे हे बौद्धिक दिवाळखोरीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. ‘वाचकांचे खिळलेले लक्ष’ हा निकष लावायचा, तर उत्तान, मादकतेने मुसमुसलेल्या अर्धनग्न युवतीच्या भिजलेल्या स्तनाग्रांवरही नजर खिळते, खिळून राहते; पण मग तो ‘हैदोस’ छापायचा का वर्तमानपत्रात? मटक्याचे आकडे छापावे लागतात म्हणून राजीनामा देणारे दिव्य दृष्टी लाभलेले संपादकही पाहिले आहेत आणि कुणीही न सांगता पहिल्या पानावर थेट माफी मागून संपूर्ण अग्रलेखच्या अग्रलेख मागे घेणारे दळभद्री संपादकही पाहिले आहेत. हा गुणदोष त्या संपादकांचा असला, तरी त्यामुळे अग्रलेखांचे महत्त्व यत्किंचितही कमी होत नाही, होणार नाही!

जाहिरात, वितरण या क्षेत्रातली माणसे बातम्यांचे महत्त्व व जागा ठरवू लागल्यापासून वर्तमानपत्रांची पत ढासळत चालली आहे, हे उघड सत्य आहे. या ढासळत चाललेल्या प्रतिष्ठेला कुणी सावरून धरत असेल तर तो अग्रलेख! दहा पैशाच्या दहा चिल्लर गोष्टींनी कदाचित गल्ला भरणारा रुपया होत असेल; पण बंदा रुपया हा शेवटी बंदा रुपयाच असतो. अग्रलेख हा त्या बंद्या रुपयासारखा असतो, त्याचे किंमत चिल्लरीत करू नये!

हे सगळे त्या मित्राला समजावणे आणि त्याने समजणे, दोन्ही कठीणच होते. ‘स्वत:स पत्रकार म्हणवून घेतात, खुर्च्या तापवतात आणि काडीचीही अक्कल नसते, माहिती नसते’, असे मनातल्या मनात म्हणत तो ‘जितं मया’च्या आविर्भावात निघूनही गेला होता. अस्मादिक कायम हरलेल्या चेहर्‍याने त्याची पाठमोरी आकृती पाहत हताश उभे होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा