सोमवार, २५ मे, २०२६

केवळ उदयनिधीच हे म्हणतोय का?


मंगळवार दि. १२ मे रोजी तामिळनाडू विधानसभेत विरोधी पक्षनेता म्हणून आपले पहिले भाषण करताना उदयनिधी स्टॅलिनने त्याच्या जुन्या विधानाचाच पुनरुच्चार केला आहे. ‘सनातन धर्म हा नक्कीच नष्ट केला पाहिजे’, असे जे तो काल म्हणाला तेच त्याने ‘सनातन निर्मूलन परिषदे’त २०२३मध्ये म्हटले होते. सनातन हा डेंग्यू, मलेरिया आहे; त्यामुळे त्याला नष्ट केलेच पाहिजे असे तो म्हणाला होता. आता डेंग्यू मलेरिया थेट नष्ट करता येत नाही, त्यासाठी तो पसरवणारे डास मारावे लागतात. सनातन नष्ट करण्यासाठी सनातन धर्माचे वाहक, मानणारे मारावे लागतील, हा थेट इशारा होता. त्यामुळे, त्याला जे म्हणायचे होते तो थेट हिंदूंचा नरसंहारच होता; अन्य काहीही नव्हते. पण, निर्णय देणाऱ्या न्यायालयास ते तसे काही वाटलेच नाही. ‘तो जे बोलला होता ते ‘हेट स्पीच’ आहे व त्यासाठी तो दोषी आहे’ हेही आजतागायत न्यायालयाने मान्य केले नाही.

हिंदू म्हणजे सांप्रदायिक, अत्यंत नीच, घाणेरडा, अविकसित, सुधारणा न झालेला किंवा मान्य नसलेला समाज आहे, हे भारतीय राज्यघटनेचे अलिखित मत आहे. केवळ राज्यघटनेचेच नव्हे तर त्याअंतर्गत झालेल्या कायद्यांचे, कायदा करणाऱ्यांचे आणि त्याचे पालन करावयास लावणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेचेही तेच अलिखित मत आहे. एवढेच कशाला, भारतीय शिक्षणव्यवस्थाही तेच मानते.

राज्यघटनेस केवळ सामाजिक सुधारणा अपेक्षित असती, तर कलम २५ (२ ब)मध्ये ‘हिंदू’ हा शब्दच आला नसता. 'सामाजिक सुधारणा' या गोंडस नावाखाली सरकारला हिंदू संस्थांमध्ये बदल करता आले नसते. कायद्याबाबत बोलायचे झाल्यास हिंदू वगळता अन्य एकाही पर्सनल लॉ बोर्डाचा एकही कायदा आजतागायत संपूर्णपणे कोडिफाय झालेला नाही. अगदी लग्नाचे वय ठरवणारा कायदाही मुस्लीम पर्सनल लॉ रद्दबातल ठरवत नाही. असे असंख्य कायदे आहेत जे लागू होतात असेही ठामपणे म्हणता येत नाही आणि लागू होत नाहीत, असेही ठामपणे म्हणता येत नाही. यालाच ‘ग्रे एरिया’ म्हणतात. हा इतकी वर्षे मुद्दाम ‘ग्रे’ ठेवण्यात आला आहे. हिंदूंचे सरळ ब्लॅक आणि व्हाईट करून टाकले आहे.

शिक्षणात सामाजिक त्रुटी सांगताना बालविवाह, केशवपन वगैरे हजारो गोष्टी केवळ हिंदू धर्माबद्दल घृणा व नकारात्मक भाव निर्माण करणाऱ्या शिकवल्या जातात. आजही मुस्लिमांत बालविवाह आहे व तो कायदेशीर आहे, हे शिकवले जात नाही.

अशा असंख्य गोष्टी आहेत, ज्या माध्यमातून सनातन हिंदू धर्म संपवण्याचे काम स्वतंत्र भारतातील लोकशाहीने पद्धतशीरपणे केले आहे व करत आहे. समता, समानता ही शस्त्रे त्यासाठी प्रभावीपणे वापरली जात आहेत. उदयनिधी तेच थेट मांडले होते व काल पुन्हा मांडले आहे. तो किमान थेट बोलण्याची हिंमत दाखवतो, भारतीय लोकशाही तीही दाखवीत नाही. उदयनिधीसारख्या लोकांसाठी हिंदू हा कुत्र्याच्या मौतीने मरण्यायोग्य किंवा किड्यामुंग्यांप्रमाणे संपवण्यायोग्य समाज आहे. प्रश्‍न त्याचा किंवा लोकशाहीचा नाहीच. प्रश्‍न आहे तो हिंदूंचा.

हिंदू स्वत:स काय समजतात, हा खरा प्रश्‍न आहे!

जगभरातील संस्कृतींना अवघ्या काही वर्षांत जमीनदोस्त करणाऱ्या ख्रिश्‍चनिटीला व इस्लामला सनातन वैदिक हिंदू धर्म संपवता आला नाही व इतकी वर्षे लोकशाहीसही ते जमले नाही. जगभरात केवळ एकच शक्ती हिंदू धर्माला संपवेल, ती म्हणजे स्वत: हिंदू. त्यामुळे, हिंदू स्वत:स काय समजतात या प्रश्‍नाच्या उत्तरावरच हिंदूंचे अस्तित्व टिकणे किंवा संपणे अवलंबून आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा