सोमवार, २५ मे, २०२६

वाळवी लागलेली संस्कृती कुठवर टिकेल?


उदयनिधी स्टॅलिन जे म्हणाला, ते आजवर चालत आलेल्या व पुढेही सुरू राहणार्‍या शृंखलेचा केवळ एक बिंदू आहे. वैदिक सनातन हिंदू संस्कृती संपवण्याचा प्रयास आजकालचा नाही; त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. इस्लामी आक्रमणे नृशंस होती. पण, त्यांचा प्रभाव संस्कृती संपवण्याइतका घातक नव्हता. ख्रिश्‍चनिटी त्यात फारच पुढारलेली व शिस्तबद्ध आहे. ख्रिश्‍चनिटी व समाजवादी-साम्यवादी हे दोन्ही ‘कल्ट’ आहेत. संस्कृती संपवण्याची त्यांची पद्धत सारखी आहे. एरव्ही भारताबाहेर त्यांचे एकमेकांत पटत नाही. पण, भारतात एकवाक्यता असते; इथे ते हातात हात घालून फिरतात. जगभरातही जिथे जिथे निसर्गपूजक संस्कृती संपवल्या तिथे तिथेही ते तसेच वागले आहेत.
 
जिथे ख्रिश्‍चनिटीचा उदय झाला तिथेही तो स्थानिक मूर्ती फोडूनच झाला. पण, बळ असेपर्यंतच यश मिळू लागले. मग, एका नव्या नीतीचा उदय झाला. संघर्षबिंदू (फॉल्टलाइन) शोधण्याचा; त्या शोधायच्या, वाढवायच्या व त्यांना सोडून द्यायचे. तेच एकमेकांत लढून लढून मरतात आणि उरलेले ख्रिस्ती होतात. संस्कृतीही संपते आणि आपले हातही रक्ताने माखत नाहीत, अशी ही संपूर्ण योजना चर्चने राजसत्तेतून राबवली. त्यासाठी स्थानिकांचाच वापर केला. त्यांना मोठे केले.
 
ओफोन्सो (प्रथम) या मध्य आफ्रिकेतील कॉंगो राजाने स्वतःच्या पूर्वजांच्या संस्कृतीला ’सैतानी’ आणि ’अंधश्रद्धेचे जाळे’ घोषित केले. त्याने कॉंगोच्या पारंपारिक देवदेवतांच्या मूर्ती, चिन्हे आणि प्रार्थनास्थळे जाहीरपणे शिव्या शाप देत जाळून, फोडून टाकली. हा राजा तेथील व पाश्‍चात्य पाठ्यपुस्तकांत आता आफ्रिकेचा ‘पहिला प्रबुद्ध आणि आधुनिक राजा’ म्हणून शिकवला जातो. कॉंगोला ’रानटी’ अवस्थेतून बाहेर काढणारा ‘महान सुधारक’ म्हणून तो शिकवला जातो. ऍझ्टेक संस्कृतीतील देवतांना गलिच्छ भाषेत शिव्या देऊन सैतान संबोधण्याचे काम करणारा हुआन डिएगो, आज तेथील अभ्यासक्रमात ’स्थानिक लोकांमध्ये शांतता आणि ख्रिश्चन प्रेमाचा प्रसार करणारा महान दूत’ म्हणून गौरवला जातो. उत्तर अमेरिकेतील ’माटोआका’ नामक स्त्री नंतर ’रेबेका’ झाली. तिने स्वतःच्या टोळीच्या पारंपारिक धार्मिक समजुती आणि देवांना ’अंधार पसरवणारे’ आणि ‘रानटी’ ठरवून त्यांचा त्याग केला. आजही अमेरिकन शाळांमध्ये तिला ’एक महान नायिका’ म्हणून शिकवले जाते. हॉलिवूडमध्ये तिच्यावर चित्रपटही काढण्यात आले. हॉन्ग झिक्वुआन याने चीनमधील पारंपारिक बौद्ध, कन्फ्युशियन आणि ताओइस्ट संस्कृतीला ’सैतानी’ म्हटले. त्याने त्याच्या लाखो अनुयायांच्या मदतीने चीनमधील प्राचीन बौद्ध मंदिरे, कन्फ्युशियन पुतळे आणि ग्रंथ जाळून खाक केले, कोट्यवधी लोक मारले. आंतरराष्ट्रीय स्तरावर याला प्रारंभिक काळात चीनला जुन्या सरंजामशाहीतून आणि अंधश्रद्धेतून मुक्त करू पाहणारा क्रांतिकारक आणि सुधारक म्हणून प्रसिद्ध करण्यात आले.
 
हेच कार्य भारतीय संस्कृतीला नावे ठेवणार्‍यांना जागतिक पातळीवर व भारतीय अभ्यासक्रमात महान ठरवण्यात आले. त्यांच्याच बगलबच्च्यांकडून त्यांना ‘राजा’, ‘महात्मा’ आणि ‘पेरियर’ अशा पदव्या बहाल करवण्यात आल्या. ऑक्सफर्ड, केंब्रिज, हॉर्वर्ड या जागतिक विद्यापीठांमध्ये या ’सुधारकांवर’ पीएचडी आणि संशोधनासाठी मोठा निधी दिला गेला. हाच अभ्यासक्रम पुढे भारतासारख्या देशांच्या पाठ्यपुस्तकांत जसाच्या तसा उतरवला गेला.
 
भारतात त्यांना मारण्यासाठी एक न निखळणारी पाचर मिळाली; ‘सामाजिक अस्मिता’! स्वत:च्याच संस्कृतीतील देवतांना अभद्र, गलिच्छ आणि हीन शिव्या हासडणार्‍यांना व त्यांच्या सामाजिक कार्याला समाजाच्या अस्मितेशी घट्ट बांधून टाकले. आज पुरोगामी म्हणून टिकून राहण्यासाठी आपल्याच देवदेवतांना हीन पातळीवर जाऊन टीका करण्याच्या त्यांच्या कृत्याकडे डोळेझाक तरी करावी लागते, किंवा त्याचे समर्थन तरी करावे लागते. चुकीच्या सामाजिक चालीरीतींवर प्रहार करण्यासाठी देवदेवतांची अभद्र निंदा का करावी लागते, या प्रश्‍नाचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नसते. जातिभेद, उच्चनीचता संपवून समता, समानता आणायची होती म्हणून त्यांनी तसे केले, असे समर्थन पुरोगामी विचारवंत करतात. पण, तशी निंदानालस्ती न करताही सामाजिक सुधारणा करणारे स्वामी दयानंद सरस्वती, ईश्‍वरचंद्र विद्यासागर, नारायण गुरू असे असंख्य समाजसुधारक भारतातील प्रत्येक राज्यांत होते. त्यांची नावे पाठ्यपुस्तकात येणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेण्यात आली. एकाच जातीवर सगळे खापर फोडायचे, आत्यंतिक जातीय द्वेष पसरवायचा आणि त्यालाच जातिभेद, उच्चनीचता संपवण्याचे महान कार्य म्हणायचे. या समाजसुधारकांनी केलेल्या जातीयद्वेषाचा उल्लेख केला तरी, तसे करणाराच जातीयवादी ठरतो. आपल्या संस्कृतीवर, देवांवर केलेल्या गलिच्छ टीकेस, ‘गलिच्छ आहे’ असे म्हणतो तोच आज ‘कम्युनरल’ ठरतो.

चर्च, मिशनरि, वसाहतवादी आणि आधुनिक काळात समाजवादी-साम्यवादी विचारवंतांनी अभेद्य करून ठेवलेल्या ‘समाजसुधारकां’च्या विचारांवर टीका करणारा ‘मनुवादी’, प्रतिगामी, समतेचा विरोधक वगैरे ठरवला जातो. इतकेच नव्हे तर तो त्या संपूर्ण समाजाचा विरोधक ठरवला जातो. या माणसांचे कार्य मोठे नाही का? निश्‍चितच आहे, पण आपल्याच संस्कृतीला, देवदेवतांना हीन ठरवून ही माणसे महान झाली आहेत. हीच शृंखला पुढे सुरू आहे आणि संस्कृती संपेपर्यंत सुरूच राहणार आहे. दक्षिण भारत स्वतंत्र द्राविडी अस्मितेपायी आणि महाराष्ट्रासह उत्तर भारत समता-समानतेच्या वेडापायी आपलीच संस्कृती संपवत आहे. या वाळवींनी पोखरलेली संस्कृती किती तग धरते, तेच पाहत राहणे आपल्या हाती आहे. ते पाहण्याआधीच या जन्मी तरी निदान डोळे मिटावेत हीच इच्छा!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा