सोमवार, २५ मे, २०२६

समता, समानता आणि भारत

संस्कारांचा, देवळासारख्या संस्कृतीच्या मानबिंदूंचाही आम्ही बाजार मांडला आहे. भारतीय समाजातील पारंपरिक सामूहिक ताकद, परस्परावलंबित्व आणि आत्मसन्मान नष्ट करून, प्रत्येक भारतीयाला एक वैयक्तिक आणि वैचारिकदृष्ट्या गुलाम बनलेला पाश्चात्य ग्राहक बनवण्याचे पाश्‍चात्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. संस्कृती संपवण्याचे ख्रिश्‍चनिटीचे ध्येय हिंदूच पूर्ण करतील; तेही समता, समानता ही त्यांनीच दिलेली शस्त्रे वापरून.

मागील काही लेखांमध्ये, ‘भारताची संस्कृती संपवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांमध्ये सर्वांत यशस्वी ठरली ती ख्रिश्‍चनिटी’, असे म्हटले होते. आता त्याचे काही अन्य कंगोरे आणि परिणाम यावर विचार करू. संस्कृती, समाज आणि उद्योग यांचा नाश करण्यासाठी ‘समता व समानता‘ या दोन शस्त्रांचा वापर प्रामुख्याने ब्रिटिश प्रशासक, युरोपीय विचारवंत आणि ख्रिश्चन मिशनरि यांनी पद्धतशीरपणे केला. 

ईस्ट इंडिया कंपनीला प्रारंभी (निदान कॅलिको ॲक्ट होण्यापूर्वी तरी) केवळ व्यापार करण्यात स्वारस्य होते. म्हणून त्यांनी मिशनरिंवर बंदीस मान्यता मिळवली होती. त्यामुळे, डच राज्य करत असलेल्या सेरामपूर येथे मिशनरि कार्य सुरू झाले. इथेच समता व समानतेचे बीज रोवणारे ‘सेरामपूर त्रिकुट’ (विल्यम कॅरी, जोशुआ मार्शमन आणि विल्यम वॉर्ड) सक्रिय झाले. त्यांनी ‘देवासमोर सर्व माणसे समान आहेत’ हा खिश्‍चनिटीचा सिद्धांत (जो पाश्‍चिमात्य देशातही त्यावेळी लागू नव्हता) छापून पसरवला व शाळा उघडून शिकवायला सुरुवात केली. हेच कार्य अलेक्झांडर डफ या स्कॉटिश मिशनरीने केले व चार्ल्स फ्रीर अँड्र्यूज या अँग्लिकन मिशनऱ्याने भारतातील गरिबांच्या आणि कामगारांच्या समान हक्कांसाठी बोलणे सुरू केले. थॉमस मेकॉले व हेन्री विवियन डेरोझिओ यांनी हे विषारी बियाणे इथे रुजेल अशी भूमी तयार केली. त्याला वैचारिक बैठक विल्यम जोन्स आणि मॅक्स म्युलर यांनी दिली. 

भारतीय समाजव्यवस्था पूरकता आणि परस्परावलंबित्व यावर आधारित होती. समाजाचा प्रत्येक घटक, अन्य घटकांस व समाजास पूरक आणि परस्परांवर अवलंबून होता. या प्रत्येक घटकाला कर्तव्य आणि जबाबदारी यांची जाणीव होती. समतेचा आणि समानतेचा उद्घोष करणारे आजचे विचारवंत जात ही व्यावसायिक ओळख होती, प्रत्येक जात इतरांना पूरक व्यवसाय करणारी होती आणि इतरांवर अवलंबून असणारी होती हे सांगत नाहीत. ते सांगितले तर विषमतेच्या आणि शोषक-शोषित या गृहीतकांना बाधा येते. जेव्हा चलन अस्तित्वात नव्हते, वस्तूच्या बदल्यात वस्तू किंवा शेतसारा असायचा, तेव्हा उच्चनीचता कशी संभवते? याचे उत्तर त्यांच्याकडे नसते. मग, ते कुणालाही कोणतेही काम करण्याची मुभा व सामाजिक प्रतिष्ठा याकडे वळतात. भारतीय समाजव्यवस्थेत प्रत्येकाला त्याच्या स्थानी, तेवढ्यापुरता मान होता. प्रत्येकाला आपापल्या जागी एक निश्‍चित आणि आदराचे स्थान होते. ज्यांना त्याकाळी अस्पृश्य व आजकाल ‘शोषित’ म्हटले जाते, त्यांनाही देवस्थानाच्या कार्यात, सण-उत्सवात मान होता. पण, तो प्रांगणापर्यंत होता, देवळात नव्हता. आणखी एक महत्त्वाचा दोष म्हणजे, जातीचा व्यवसाय न करणाराही त्याच जातीचा उरणे. आचमनही माहीत नसलेला केवळ ब्राह्मण जातीत जन्मला म्हणून ‘भट’ होतो व जन्मल्यापासून कधीही चामडे न सोललेला माणूस ‘चर्मकार’ होतो आणि त्या त्या जातीचे गुणदोष भोगतो. 

अस्पृश्यतेचा जन्म अतिशुचितेतून होतो. या अस्पृश्यतेची आजची वर्णनेही याच समतेच्या, समानतेच्या दृष्टिकोनातून आहेत. त्यांची घरे गावच्या वेशीजवळ असत किंवा मुख्य वस्तीपासून दूर असत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे व्यवसायाचे ठिकाण व निवासाचे ठिकाण एकच असणे. आजच्यासारखे दुकाने, कारखाने तेव्हा नव्हते; सुतार, कुंभार, लोहार, चर्मकार आपापली कामे घरीच करत असत. दुर्गंधी, स्वच्छता(हायजीन) या कारणांसाठी त्यांची घरे मुख्यवस्तीपासून दूर असत. त्यांचे शोषणच करायचे असते तर देवळाच्या प्रांगणात तरी प्रवेश का दिला असता? या व्यवस्थेमुळे प्रत्येक गाव स्वावलंबी व स्वयंपूर्ण होता. संरक्षण व काही प्रमाणात न्याय, वगळता एकही गाव राजावर अवलंबून नव्हता. सत्ता कुणाचीही असली तरी फरक पडत नसे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे समूहभावना जाज्वल्य होती.

प्रत्येक जातीला त्यांचे व्यावसायिक शिक्षण व कौशल्य घरीच शिकण्याची व्यवस्था होती. त्यामुळे, ‘शिक्षणापासून वंचित ठेवले’ वगैरे थोतांडही आजच्या शिक्षणपद्धतीच्या फूटपट्ट्या लावून पसरवले जाते. ‘सर्वांना सर्व शिक्षण’ या समता, समानतेच्या गृहीतकावर आधारित शिक्षण व्यवस्थेमुळे, मुलाकडे उपजत कोणते गुण, कौशल्य आहे व त्याचा नैसर्गिक कल कुठे आहे, याचा अभ्यासच केला जात नाही. हा अभ्यास पूर्वी गुरुकुलात केला जात असे. आज विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांमागेही हे एक महत्त्वाचे कारण आहे. परंपरेने चालत आलेले कौशल्य व ज्ञान एका जातीतच एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे दिले जायचे. त्यामुळे, जात हे ‘स्पेशलाइझेशन ऑफ वर्क’ होते. याचा परिणाम म्हणजे ब्रिटिश आले तेव्हा व यायच्या आधी भारत तयार उत्पादने बाहेरच्या देशांना विकायचा. धातू, वस्त्र, रसायने यातील अनेक दर्जेदार उत्पादनांसाठी जग भारतावर अवलंबून होते. जगाला आपण तयार उत्पादने विकायचो;  आता जगाची सेवा करतोय. कच्चा माल व पक्की बुद्धी जगाला पुरवतो आणि जग आपल्याला त्यातून तयार केलेली उत्पादने विकते. 

ब्रिटिश अधिकारी व ख्रिश्‍चन मिशनरि यांनी हे समतेचे, समानतेचे विचार पसरवायला सुरुवात केली व प्रत्येक गोष्टीला शोषक व शोषित यातच विभागणी करण्याची विचारसरणी रुजवली. त्याला भारतीय समाजातून पहिला पाठिंबा बंगालमध्ये राममोहन रॉय यांनी दिला आणि नंतर जोतिबा फुले यांनी. रॉय यांनी पाश्‍चात्य शिक्षणाचा पाया घालण्याचे काम केले. महाराष्ट्रात फुलेंनी व दक्षिणेत ई. रामासामी यांनी आर्य आक्रमणाचा सिद्धांत सामाजिक स्तरावर प्रत्यक्षात आणला. दक्षिणेत त्याला राजकीय यश मिळाले. महाराष्ट्रात डझनभर मती असलेले राजकारणी आजवर त्याचा राजकीय लाभ उठवण्याचा यथेच्छ प्रयत्न करतात. दक्षिणेतील राजकीय यशापेक्षाही महाराष्ट्रात झालेले सामाजिक नुकसान कैक पटीने मोठे व भरून निघू शकत नाही, असे आहे. सगळ्यांत मोठे झालेले सांस्कृतिक, सामाजिक व व्यावसायिक नुकसान त्यांच्या लक्षांत येत नाही. आपल्याच देवदेवतांना, संस्कृतीला आणि पूर्वजांना यथेच्छ शिव्या दिल्या जातात. प्रत्येक देव, संत आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची व्यक्ती यांचे वर्गीकरण जातीत झाले आहे. जातींचे वर्ग आणि वर्गांच्या झुंडी तयार झाल्या आहेत. समाजामध्ये जबाबदारीऐवजी हक्क फार महत्त्वाचे झाले आहेत. आधी जे ‘गावचे’ असायचे ते आता स्वत:च्या कुटुंबाचेही उरले नाहीत. समाज उभा आडवा फाटला आहे. हजारो वर्षांच्या परंपरेने टिकवून ठेवलेले व्यावसायिक कौशल्य, ज्ञान केव्हाच संपले आहे; इतकेच नव्हे तर ते व्यवसायही नष्ट झाले आहेत. ज्या जातिगत व्यवसायांचा अभिमान बाळगला जायचा, त्याचीच आता लाज वाटू लागली आहे. जातींचा इतरांनी केलेला उल्लेख ‘ॲट्रॉसिटी’ व अपमान वाटतोय, तर स्वत:च्याच जातीला मागास म्हणवून घेण्यात अभिमान वाटतोय. स्वत:च्या जातीला ‘मागास म्हणा’ म्हणून आंदोलने केली जात आहेत. सर्वांत मोठा विरोधाभास म्हणजे हेच लोक तोंडाने समतेच्या आणि समानतेच्या गोष्टी करत आहेत. 

राज्यघटनेने नसलेली पांथिक समता अनिवार्य केली आणि व्यवस्थेने पाळायची नागरी समता ऐच्छिक केली. त्यामुळे हक्क, अधिकार, व्यक्तिस्वातंत्र्य यांचा इतका गवगवा झालाय, की त्यातून आपली झोपण्याची खोलीही सुटलेली नाही. अगदी नवरा बायकोचे नाते पूरक असण्याऐवजी समता व समानतेत अडकले आहे. लग्न एक संस्कार होता, तो आता करार झाला आहे; त्याहीपुढे जाऊन बाजार झाला आहे. संस्कारांचा, देवळासारख्या संस्कृतीच्या मानबिंदूंचाही आम्ही बाजार मांडला आहे. भारतीय समाजातील पारंपरिक सामूहिक ताकद, परस्परावलंबित्व आणि आत्मसन्मान नष्ट करून, प्रत्येक भारतीयाला एक वैयक्तिक आणि वैचारिकदृष्ट्या गुलाम बनलेला पाश्चात्य ग्राहक बनवण्याचे पाश्‍चात्त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. संस्कृती संपवण्याचे ख्रिश्‍चनिटीचे ध्येय हिंदूच पूर्ण करतील; तेही समता, समानता ही त्यांनीच दिलेली शस्त्रे वापरून. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा