आमिर खानने किती लग्ने केली, हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यात त्याची असूया इतरांनी बाळगावी, असे काहीच नाही. आहे ते लग्न मोडून पुन्हा संसार थाटण्यात काहीच अर्थ नसतो, हे बहुतांश मध्यमवर्गीय पुरुष जाणतात. पण, मग हे मीडियावाले, वृत्तपत्रे आमीर खानचे लग्न ‘बेगाने की शादी मे दिवाना’ झालेल्या अब्दुल्लापेक्षाही वेडे होत का बरे दाखवतात? त्यातही त्याच्या आधीच्या दोन बायका व मुले अत्यंत खूश होती, आनंदी होती, असे का दाखवले व भासवले जाते? हा केवळ टीआरपीचा खेळ नाही. समाजमन एका विशिष्ट दिशेने वळवण्याचा एक पद्धतशीर, योजनाबद्ध खेळ आहे. आपले कुटुंब त्यापासून किती काळ वाचेल, हाच खरा प्रश्न आहे.
सिने, मालिका व नाट्य क्षेत्रातील कलावंत, शिक्षण क्षेत्रातील ‘मार्क्स’वंत, उच्चभ्रू-एलीट वर्ग, उच्च शिक्षित, नवश्रीमंत आणि शहरी भागांतील उच्च मध्यमवर्गीय यांच्या कुटुंबांत व्यसनांना प्रतिष्ठा, स्वैर वर्तन, बहुपत्नीत्व आता स्थिरावले आहे. लग्न करणे, घटस्फोट घेणे व पुन्हा लग्न करणे हे त्यांच्यात सामान्य आहे. ‘सिंगल पॅरेंटिंग’(फक्त आईनेच किंवा बापानेच मुलांना वाढवणे), नवीन लग्न झाल्याने बाप किंवा आई बदलणे सामान्य आहे. ‘लिव्ह इन रिलेशन’ (ग्राम्य भाषेत ठेवलेली बाई किंवा ठेवलेला बाप्या) हेसुद्धा अगदी ‘पहले इस्तेमाल करें फिर विश्वास करें’, इतके सामान्य झाले आहे. सिनेमा, सिरियल, लेख, चर्चा यांतून अशा गोष्टी करणे म्हणजे कसे पुरोगामी असणे हे वारंवार ठसवले जाते. लग्न, कुटुंब, संसार या गोष्टी किती तकलादू आहेत, अत्याचार करणार्या, समतेच्या व समानतेच्या विरुद्ध कशा आहेत, ‘ब्रॅम्हेनिकल पॅट्रिआर्की’(थोडक्यात ‘पुरुषसत्ताक संस्कृती’) कशी वाईट आहे, हेच बिंबवले जाते. अगदी मराठी वाहिन्यांवरही ‘माझ्या नवर्याची बायको’ ते अगदी ‘माझ्या बायकोचा नवरा’ इथपर्यंत मालिकांचा प्रवास होतो. या सगळ्याचे पुढील पिढीवर व समाजावर होणारे परिणाम पाश्चिमात्त्य देश भोगत आहेत. तिथली कुटुंबव्यवस्था नासवल्यानंतर त्या समाजाला झालेली हगवण, इथे पंचपक्वान्न म्हणून दररोज वाढली जाते आणि चवीने बघितलीही जाते.
पाश्चात्त्य देशांमध्ये गेल्या काही दशकांत कुटुंबसंस्थेत झालेले बदल आणि मुलांचे मानसिक आरोग्य यावर खूप अभ्यास झाला आहे. ‘द लॅन्सेट’सारख्या जागतिक आरोग्य नियतकालिकांमधील संशोधनानुसार जन्मदात्या आईवडिलांसोबत लहानाचे मोठे झालेल्या मुलांपेक्षा सिंगल पॅरेंटिंग किंवा वारंवार पालक बदलणार्या कुटुंबांतील मुलांमध्ये डिप्रेशनचा धोका २ ते ३ पट जास्त असतो. अशा मुलांमध्ये आत्महत्येचे विचार येणे किंवा तसा प्रयत्न करण्याचे प्रमाण दुप्पट आहे. सावत्र आई/वडील येणे किंवा तेही सोडून जाणे यामुळे मुलांचे जन्मदात्या आईवडिलांशी असलेले भावनिक बंध तुटतात. त्याचा परिणाम त्याच्या आयुष्यावर होतो. अशी मुले गुन्हेगारीकडे वळण्याचे, व्यसनांच्या आहारी जाण्याचे प्रमाणही जास्त असल्याचे अनेक अहवालांत म्हटले आहे.
पाश्चात्त्य देशांमध्ये या समस्येवर आता मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली जात आहे. केवळ वैयक्तिक स्वातंत्र्य आणि आर्थिक प्रगती माणसाला मानसिक स्थैर्य देऊ शकत नाही; त्यासाठी स्थिर कौटुंबिक वातावरण आवश्यक असते, हा विचार तिथे होत आहे.
आपल्याकडे मात्र चित्र अगदी उलटे आहे. लहान वयात शोभून दिसणारे कपडे, तरुण वयात घालून मुली सार्वजनिक ठिकाणी फिरतात. त्या आधीच्या पिढीत ‘काहीही होत नाही गं, तू घाल तुला हवे ते कपडे’, असे म्हणत त्यात काही चुकीचे नाही, हे ठसवले गेले. अंतर्वस्त्रे बाहेर दिसणे, त्वचेला घट्ट चिकटून तंग होणारे कपडे सार्वजनिक ठिकाणी घालणे या पिढीत सामान्य बाब आहे. ते ‘सामान्य’ होणे यालाच ‘नॉर्मलाइझेशन’ म्हणतात. कुंकू किंवा टिकली लावून जाणार्या मुलीला तिच्यासोबतच्या मुली ‘काकूबाई’ म्हणून चिडवतात. तीही ते लावणे बंद करते. ‘संस्कारी’ असण्याची थट्टा उडवली जाते. आपल्याकडे जे जे चांगले व उदात्त होते त्याची सिनेमा, नाटक, कथा, कादंबरी, रील्स या माध्यमांतून पद्धतशीरपणे थट्टा उडवली गेली. अजूनही उडवली जाते. संस्कृतीचा अभिमान अजिबात न बाळगणारी आपली चौथी पिढी आहे. सतीसारख्या अपवादांना ‘प्रथा’ ठरवून नकारात्मक भावना पाठ्यपुस्तकांतून जोपासली गेली. या वाळवीने आपल्या संस्कृतीला इतके ग्रासले आहे, की जे चांगले आहे त्याला चांगले म्हणायची आपली हिंमतच होत नाही. तसे म्हटले, वागले तर आपण ‘कूल’ दिसत नाही, ‘पॉलिटिकली करेक्ट’ होत नाही.
या वाळवीची सुरुवात फार आधी झाली आहे. कार्ल मार्क्सची एकही भविष्यवाणी खरी न होण्याचे कारण मार्क्सवादात न शोधता, त्याचे खापर समाज, संस्कृती यांवर फोडले गेले. ‘क्रिटिकल थिअरी’ने कधीच मार्क्सवादाचा क्रिटिकल अभ्यास केला नाही. एरिख फ्रॉम आणि अडॉर्नो यांनी ’द ऑथॉरिटेरियन पर्सनॅलिटी’सारखे शास्त्रीय अभ्यास करून असा निष्कर्ष काढला की, पारंपरिक कुटुंब, रिलिजन आणि संस्कृती मानणारा सामान्य मध्यमवर्गीय माणूस हा मानसिकदृष्ट्या ’हुकूमशाही’ आणि ’फॅसिस्ट’ प्रवृत्तीचा असतो. त्यांनी स्वतःच्या डाव्या विचारसरणीच्या अपयशाचे प्रामाणिक चिंतन कधीच केले नाही. उलट, समाजाने त्यांच्या सिद्धांतानुसार वागावे म्हणून त्यांनी समाज, कुटुंब, परंपरा आणि संस्कृती या सर्व संस्थांनाच मोडीत काढण्याचे वैचारिक प्रयत्न सुरू केले. हा प्रवास १९१७पासून सुरू झाला. ‘पारंपरिक कुटुंब आता कालबाह्य झाले आहे’, असे लिहिणारी अलेक्झांड्रा कोलोन्टाई, त्यानंतर १९७१साली ’द डेथ ऑफ द फॅमिली’ या पुस्तकातून डेव्हिड कूपर ते सोफी लुईसपर्यंत हा प्रवास सुरूच आहे. सोफी लुईसने तर आपल्या ’ऍबोलिश द फॅमिली: अ मॅनिफेस्टो फॉर केअर अँड लिबरेशन’ या पुस्तकात ‘कुटुंबव्यवस्था ही हिंसाचार, लिंगभेद आणि विषमतेचे मुख्य केंद्र आहे, त्यामुळे मानवाच्या खर्या मुक्तीसाठी कुटुंब व्यवस्था संपुष्टात आणणे आवश्यक आहे’, असे थेट लिहिले आहे. या लिबरल विचारांच्या प्रभावाने पाश्चिमात्त्य देशातील कुटुंबे व त्यांची संस्कृती संपत चालली आहे. भारतीय संस्कृती व कुटुंबव्यववस्था संपवण्यासाठी व्यक्तिस्वातंत्र्याचा, समता-समानतेचा, एकांगी कायद्यांचा यथेच्छ वापर भारतात केला जात आहे.
‘व्होकिझम’सारख्या गोष्टी आपल्या संस्कृतीत हळूहळू पेरल्या, रुजवल्या जात आहेत. भारत ही त्यासाठी प्रयोगशाळा आहे. समाजमन एका विशिष्ट दिशेने पद्धतशीर, योजनाबद्ध रीतीने वळवले जात आहे. आपले कुटुंब त्यापासून किती काळ वाचेल, हेही आता सांगता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा