
उदय भेंब्रे यांच्या लेखाच्या पूर्वार्धात असलेले शीर्षक ‘गोव्यात मराठी ब्राह्मणांनी आणली’ उत्तरार्धात ‘होय, बामणांनीच मराठी परंपरा सुरू केली’, असे झाले किंवा केले. पूर्वार्धातील तिसर्या परिच्छेदात जे म्हटले आहे, ते पाहता त्यांना सारस्वतांव्यतिरिक्त असलेले ब्राह्मण म्हणायचे आहे, हे स्पष्ट आहे. पुन्हा उत्तरार्धात ब्राह्मण आणि बामण हे एकच आहे; आता जे बामण म्हणतोय, त्याच ब्राह्मणांनी मराठी गोव्यात आणली, अशी मखलाशी करतात. महाराष्ट्रात ब्राह्मणांना ‘बामनं’ म्हणतात, गोव्यातील स्थानिक पद्दे व महाराष्ट्रातून इथे आलेल्यांना ‘बामण’ म्हणत नाहीत. केवळ सारस्वतांना ‘बामण’ म्हणतात. गोव्यातील सारस्वत हे सरस्वती नदी आटल्यावर उत्तर-पूर्व भारतातून किंवा गौड देशातून इथे आले, असे मत यांच्यासारखेच विचारवंत मानतात. मग, त्यांची परंपरा ‘मराठी’ कशी? या बोटावरची थुंकी त्या बोटावर करण्याचे हे ‘बामणबुद्दी’चे उद्योग भेंब्रे यांनी आता तरी बंद करावेत.
उत्तरार्धातील त्यांच्या लेखात पुन्हा पूर्वीसारखे ओढूनताणून निष्कर्ष काढले आहेत. इतकेच कशाला, स्वत:च आधीच्या परिच्छेदात मांडलेला मुद्दा नंतरच्या परिच्छेदात खोडून काढला आहे. ‘१५२६ नंतर सुमारे दोनशे ते सव्वादोनशे वर्षांत गोमंतकीयांनी कोंकणीत किंवा मराठीत काहीच लिहिलेले आढळत नाही... कोणताच साहित्य मिळत नाही’, असे एका परिच्छेदात ते म्हणतात व त्यानंतरच्या परिच्छेदात म्हणतात की, सतराव्या शतकात आठ युरोपियन पाद्र्यांनी कोंकणी धार्मिक साहित्य रचले... आणि तीन मराठी पुस्तकेही लिहिली. जर १६१६मध्ये ’ख्रिस्तपुराण’सारखे वाङ्मय निर्माण होत होते आणि छापले जात होते, तर तो काळ ’काहीच न लिहिण्याचा’ कसा असू शकतो? जरी ते गोमंतकीयांनी लिहिले नसले, तरी गोव्यात साहित्य निर्मिती पूर्णपणे थांबली नव्हती.
जर १५२६मध्ये कृष्णदास शामा यांनी ’श्रीकृष्णचरित्रकथा’ सारखे प्रगल्भ मराठी काव्य लिहिले असेल तर ती भाषा त्यांनी अचानक एका दिवसात शिकणे शक्य नाही. कोणतीही व्यक्ती साहित्याची निर्मिती तेव्हाच करू शकते, जेव्हा ती भाषा तिच्या समाजात किमान १००-१५० वर्षांपासून रुजलेली असते. शामा यांच्या भाषेचा बाज हा यादवकालीन महाराष्ट्रीशी, मराठीशी मिळताजुळता आहे.
भेंब्रे एवढ्यावरच थांबलेले नाहीत, त्यांचा भामटेपणा एक पॅरलल (समांतर रेषा) आखतो.
जसा संस्कृत पंडितांनी मराठी लेखनास ती बोली म्हणत विरोध केला, तसाच विरोध गोव्यातील मराठीवाद्यांनी कोकणीस केला.
ही ती समांतर रेषा.
मुळात संस्कृत पंडितांनी आक्षेप घेतले होते, वाद घातला होता; विरोध केला नव्हता. पैठणमध्ये एकनाथ महाराज संस्कृत ’भागवत पुराणावर’ मराठीत टीका लिहीत आहेत, हे जेव्हा काशीच्या विद्वानांना समजले, तेव्हा त्यांनी एकनाथांना काशीला पाचारण केले. भागवतासारख्या अत्यंत गूढ ग्रंथाचा अचूक तात्त्विक अर्थ प्राकृतात उतरवणे अशक्य आहे आणि तसे केल्यास अर्थाचा अनर्थ होईल, असा संस्कृत पंडितांचा आक्षेप होता. काशीच्या विद्वानांनी एकनाथांच्या ग्रंथाची अतिशय कठोर, शास्त्रीय तपासणी केली. त्यांनी एकनाथी भागवताचे अध्याय स्वतः वाचले, त्यातील तात्त्विक मांडणी तपासली आणि संस्कृतमधील मूळ वेदान्ताचा अर्थ मराठीत कुठेही ढळलेला नाही, याची खात्री करून घेतली. जेव्हा पंडितांना कळाले की एकनाथांनी संस्कृतमधील मूळ अर्थाला यत्किंचितही धक्का न लावता, अत्यंत अचूकतेने तो मराठीत आणला आहे, तेव्हा त्यांनी एकनाथांचा आणि त्यांच्या ’एकनाथी भागवता’चा काशीत हत्तीवरून मिरवणूक काढून सर्वोच्च सन्मान केला आणि ग्रंथाला अधिकृत मान्यता दिली. विरोध हा मराठीला किंवा ज्ञानाचा नव्हता, तर ’संस्कृतमधील नेमका तात्त्विक अर्थ प्राकृत पेलू शकते का’ या तांत्रिक क्षमतेचा होता. ज्ञानेश्वर, एकनाथ आणि नंतरच्या संतांनी आपल्या साहित्यातून मराठीची ही क्षमता शतप्रतिशत सिद्ध करून दाखवली. जर विरोधच करायचा असता, तर तो आक्षेप खोडून काढल्यावरही केला असता. भेंब्रेंसारखे विचारवंत ‘तात्त्विक वादा’ला ‘विरोध’ म्हणतात ते केवळ मराठीवाद्यांनी कोकणीस केलेल्या विरोधाशी समांतर रेषा जोडण्यासाठी.
स्वातंत्र्यानंतर महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा ही राज्ये म्हणून निर्माण झाली आहेत. त्याआधी ती संयुक्तपणे किंवा वेगवेगळी कुठल्या तरी राजवटीचा भाग होती. प्राचीन काळी महाराष्ट्री किंवा प्राकृत ही माळव्यापासून ते थेट दक्षिण कर्नाटकातील कृष्णा-तुंगभद्रा नद्यांपर्यंत आणि संपूर्ण गोव्यासह पश्चिम किनारपट्टीवर बोलली जाणारी मुख्य लोकभाषा व राजभाषा होती. त्यातून मराठी व कोकणी या आधुनिक काळातील भाषा तयार झाल्या. कोकणी ना आदिवासींनी आणली, ना मराठी ब्राह्मणांनी. या भाषा कुठल्याही ‘भायल्या’ जातसमूहाने कुठूनही बाहेरून आणलेल्या नाहीत, त्या इथल्या मातीतच तयार झाल्या, वाढल्या व विस्तारल्या. त्यानंतर झालेल्या ‘महाराष्ट्र’ व ‘गोवा’ या भौगोलिक भेदांवरून भाषांची विभागणी करण्याचा कर्मदरिद्रीपणा आपण करत आहोत. भाषिक वर्गीकरणावरून वांशिक वर्गीकरणापर्यंत पोहोचण्याची जी बीजे वसाहतवाद्यांनी पेरली होती, त्यांच्याच संकरित रूपांची लागवड भेंब्रेंसारखे विचारवंत करत आहेत. ते न कोकणीचे समर्थक आहेत ना मराठीचे; वास्तविक ते इंग्रजीचेच ‘बरे मागते’ आहेत.
देव त्यांचे लवकर भले करो!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा