बातमी देताना त्यात हेतू घुसडू नये, हा संकेत आहे. पण, तसे होत नाही. बातमीत सत्यतेपेक्षा ती जास्तीत जास्त पाहिली जावी, याकडे लक्ष देण्याकडे वृत्तपत्रांचा कल वाढला आहे. त्यामुळे, मथळा इतका सनसनाटी केला जातो की त्यात सत्य हरवते. पण, या सगळ्याचा परिणाम काय होतो, याचा विचार कुणीही करत नाही. खप वाढला, इंटरनेटवर बातमी (केवळ मथळा व पहिला परिच्छेद फार तर वाचला जातो) किती वेळा पाहिली गेली याचे जाहिराती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हिशेब मांडले जातात. कमी वाचले जाते यामुळे संपादकीय अग्रलेखच काढून टाकले जातात.
सनसनाटी निर्माण करण्याच्या नादात पाठ्यपुस्तकांत किती टक्केवारी गोमंतकीयांची आहे व किती अन्य लेखाकांची आहे, याची व्यवस्थित पडताळणी झाली नाही. ज्या ज्या साहित्यिकांनी प्रतिक्रिया दिल्या, त्यांनी तरी याची पडताळणी करण्याचे कष्ट घेतले का? प्रत्येक ठिकाणी अस्मिता जोडून शिक्षण होणार नाही. गोव्यातला वैज्ञानिक, इंग्रजी साहित्यिक नाही तर पाठ्यपुस्तक चुकीचे ठरवू लागलो तर विषयच बंद करावे लागतील. या सनसनाटीपायी वृथा गैरसमज व चुकीचा नॅरेटिव्ह पेरण्याचा प्रयत्न होत आहे का? मुळात लेखक कुठले, हा मुद्दाच असू शकत नाही. जे साहित्य घेतले आहे ते दर्जेदार आहे की नाही व त्यातून भाषा या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना काही सकस व पोषक वाचायला, अभ्यासायला मिळते की नाही हा योग्य मुद्दा आहे. मराठी व कोकणी दोन्ही भाषांसाठी केवळ हाच निकष ठेवून विचार होणे गरजेचे आहे. टोकाच्या अस्मिता पेटवून व त्यांची चूड नको तिथे लावून केवळ रस्त्यावर उतरून तोडफोड करणारे धटिंगण निर्माण होतील. आम्हांला पुढच्या पिढीच्या हाती लेखणी द्यायची आहे, की दगड याचे चिंतन व्हावे हीच इच्छा आहे.
या निमित्ताने विषय निघालाच आहे, तर मराठी व कोकणी पाठ्यपुस्तकांत दर्जेदार साहित्य आहे की नाही याचाही धांडोळा घेतला जावा. पुरस्कारासाठी होते तसे लॉबिंग पाठ्यपुस्तकात धडा व कविता घ्यावी यासाठी होते का, याचीही पडताळणी व्हावी.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा