शुक्रवार, २६ जून, २०२६

प्रादेशिक अस्मिता किती ताणायची?

भाषा हा विषय शिकवताना, शिकताना त्या भाषेतले साहित्याचे प्रवाह विद्यार्थ्याला समजतील अशी रचना असणे अपेक्षित आहे. तिथे लेखक कुठला आहे व स्थानिक लेखकांना स्थान आहे की नाही, हा प्रश्‍नच उद्भवत नाही. गोव्यात मराठी साहित्यिक नाहीत किंवा त्यांच्यात लिहिण्याची क्षमता, वैविध्य नाही असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. गोव्याचे लेखक किती आणि गोव्याबाहेरील लेखक किती, याकी गणिती आकडेमोड करण्यापेक्षा एक विषय म्हणून भाषेचे सर्व कंगोरे अभ्यासक्रमात येतात की नाही, हा खरा महत्त्वाचा प्रश्‍न आहे.

गोव्याच्या मराठी पुस्तकांत गोमंतकीय मराठी लेखक नाहीत याची खंत वर्तमानपत्रांना झाली, हे बरे वाटले. पण, मराठी भाषा विषय म्हणून शिकताना स्थानिक अस्मितेला किती रेटायचे, याचा विचार होणेही तितकेच आवश्यक आहे. 

भाषा हा विषय शिकवताना, शिकताना त्या भाषेतले साहित्याचे प्रवाह विद्यार्थ्याला समजतील अशी रचना असणे अपेक्षित आहे. तिथे लेखक कुठला आहे व स्थानिक लेखकांना स्थान आहे की नाही, हा प्रश्‍नच उद्भवत नाही. गोव्यात मराठी साहित्यिक नाहीत किंवा त्यांच्यात लिहिण्याची क्षमता, वैविध्य नाही असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. गोव्याचे लेखक किती आणि गोव्याबाहेरील लेखक किती, याची गणिती आकडेमोड करण्यापेक्षा एक विषय म्हणून भाषेचे सर्व कंगोरे अभ्यासक्रमात येतात की नाही, हा खरा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. 

मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे हे लेखक निवड करताना ४०-६० असे प्रमाण सहसा असते. ४० टक्के गोमंतकीय व ६० टक्के अन्य. मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे ही विभागणी आहे की नाही, हा खरे तर महत्त्वाचा प्रश्‍न आहे. पण त्याला गोमंतकीय अस्मितेशी जोडून केलेली मांडणी व वार्तांकन अत्यंत हिणकस आहे. कुठल्या तरी गोमंतकीय साहित्यिकाचा समावेश न झाल्याने, ‘जय महाराष्ट्रा’ची काडी पेटवून दिल्याची शक्यताही नाकारता येत नाही. मुळात गोव्यातील लोकांना पात्र असूनही नोकरी नाकारली जाते, हा खरा महत्त्वाचा प्रश्‍न आहे. तिथे ‘जय गोमंतक’ करणे अपेक्षित आहे. त्याऐवजी विषय म्हणून शिकवली जाणारी भाषा गोमंतकीय अस्मितेशी जोडणे कितपत योग्य आहे?

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, यातून ‘मराठी महाराष्ट्राची किंवा गोव्याबाहेरची’ हे चिन्हित करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना? हल्ली प्रादेशिक अस्मिता नको तितक्या ताणण्याचा ‘ट्रेन्ड’ सुरू आहे. त्या धर्तीवर ‘महाराष्ट्र धार्जिणे’, ‘महाराष्ट्रवादी’ किंवा त्याही पुढे जाऊन मराठीवादी म्हणजे महाराष्ट्रवादी, ‘मागील दाराने गोवा महाराष्ट्रात ढकलू पाहणारे’ वगैरे विमर्ष (नॅरेटिव्ह) पुढे सरकवले जाऊ शकतात. ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सगळे संत, राष्ट्रपुरुष आणि अगदी देवही जातीत ढकलले जातात तसेच मराठी भाषेला ब्राह्मण (नंतर बामण) जातीशी जोडण्याचा प्रयत्न हल्लीच झाला. त्याचीच पुढची पायरी म्हणजे मराठीला महाराष्ट्राशी जोडून गोव्यापासून तोडण्याचा हा प्रयत्न आहे. ‘गोंयान रावचे आसा जाल्यार कोकणी उलवचे पडटलें’ हे वाक्यही महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्यात ऐकू येणे फार दूर नाही. 

टोकाची अस्मिता असणे हे अस्मिता नसण्यापेक्षा जास्त घातक असते. कुठलीही गोष्ट स्वत:त परिपूर्ण नसते आणि ती जोडली जाते तेव्हा समृद्ध होत जाते. त्यासाठी हक्क असण्याऐवजी पूरक असणे महत्त्वाचे आहे. आज जिथे कुठल्याही लेखकाचे जगात कुठेही वाचले जाण्याची सोय उपलब्ध असताना, प्रादेशिक अस्मितेच्या शृंखलांमध्ये भाषेला किती जखडून ठेवायचे, याचा तारतम्याने विचार करणे योग्य ठरेल. 

1 टिप्पणी:

  1. अतिशय योग्य मांडणी, भाषिक अस्मिता किती ताणावी, कोणत्या बाबतीत भाषिक अस्मितेचा टेम्भा मिरवावा, यावरही गांभीर्याने विचार व्हायला हवा, अन्यथा भाषा म्हणून शिकण्या शिकवण्याच्या मूळ उद्देश बाजूला जाईल.

    उत्तर द्याहटवा