‘हेरिटेज कनेक्ट’ या यूट्यूब चॅनलवर योगेश नागवेकर यांनी डॉ. सुशिला सावंत मेंडिस यांची मुलाखत घेतली आहे. ‘द अनटोल्ड स्टोरी ऑफ अकबर्स पोर्तुगीज क्वीन’ ना नावाने यूट्यूबर असलेल्या या व्हिडिओत अनेक गोष्टी चुकीच्या आहेत किंवा अर्धवट सांगितल्या आहेत. अकबराला ‘सेक्युलर’, ‘लिबरल’ ठरवणे चुकीचे आहे, त्याचबरोबर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंक्तीत बसवून त्यांनाही तीच बिरुदे लावणे सर्वथैव गैर आहे.
अकबर वयाच्या तेराव्या वर्षी सम्राट झाला. त्याच्यावर मीर अब्दुल लतीफ या पर्शियातून आलेल्या शिक्षकाचा प्रभाव होता. इतिहासकार या लतीफला ‘लिबरल’ मानतात. अकबरावर या लतीफच्या शिकवणीचा प्रभाव होता, असे मेंडिस म्हणतात. आता आपण अकबराचे वयानुसार कारनामे पाहू. वयाच्या पंधराव्या वर्षापासून ते वयाच्या तेहत्तीसाव्या वर्षापर्यंत अकबराने असंख्य हिंदूंच्या चक्क कत्तली केल्या व पानिपतच्या दुसर्या युद्धात हिंदूंच्या मुंडक्यांचे मिनार रचले. हिंदू मंदिरे पाडली, मूर्ती फोडल्या. वयाच्या पंचवीसाव्या वर्षी अकबराने चित्तोडगडचा किल्ला जिंकला तेव्हा तिथल्या ३०,००० नि:शस्त्र आणि निष्पाप स्थानिक हिंदू नागरिकांच्या सामूहिक कत्तलीचा आदेश दिला होता. याच विजयानंतर त्याने स्वतःला ’गाझी’ घोषित केले होते. ‘गाझी’ म्हणजे काफिरांचा (हिंदूंचा) संहारक. लतीफ याच्या शिकवणुकीप्रमाणे वयाच्या तेराव्या वर्षी लिबरल व प्रॉग्रेसिव्ह असलेला अकबर, पुढची वीस वर्षे म्हणजे वयाच्या तेहत्तीसाव्या वर्षापर्यंत हिंदूंच्या कत्तली व देवळे पाडणे (रिलिजिअस पर्सिक्यूशन) करतच राहिला.
वयाच्या तेहत्तीसाव्या वर्षी त्याने इबादतखाना सुरू करून सर्व पंथीयांच्या लोकांशी चर्चा सुरू केली. पुढची सात आठ वर्षे तो ‘महझरनामा’ व ’सुलह-इ-कुल’ राबवत होता. वयाच्या सदतीसाव्या वर्षी त्याने ‘दीन-ए-इलाही’ नावाचा पंथ सुरू केला. याच दरम्यान गोव्यातील पहिले जेझुइट मिशन त्याला भेटायला गेले होते. जेसुइट पाद्री, फादर अँथनी मोन्सेरात हे या शिष्टमंडळाचे सदस्य होते. त्यांनी लॅटिन भाषेत लिहिलेल्या ‘मोंगोलिके लेगातिओनिस कोम्मेन्तारिउस’ या ग्रंथात त्याचे वर्णन लिहिले आहे. याचा इंग्रजी अनुवाद जे. एस. होयलँड यांनी केला आणि एस. एन. बॅनर्जी यांनी ‘कॉमेन्टरी ऑफ फादर मोन्सेरात’ या पुस्तकात संपादित केला आहे. यात पान क्रमांक २७वर एक परिच्छेद आहे त्यात फादर मोन्सेरात लिहितात ‘इन प्लेस ऑफ हिंदू टेम्पल्स, काउन्टलेस टूम्ब्स अँड लिटल श्राइन्स ऑफ विकेड अँड वर्थलेस मुसलमान्स हॅव बीन इरेक्टेड’ ( हिंदूंच्या मंदिरांच्या जागी दुष्ट व नालायक मुसलमानांच्या असंख्य कबरी आणि लहान दर्गे उभारण्यात आले आहेत.) हा अकबराचा उदारमतवाद, पुरोगामीपण व सेक्युलर असणे आहे.
आता त्याच्या ‘दीन-ए-इलाही’बद्दल थोडेसे सांगणे भाग आहे. हे त्याच्या ‘सेक्युलर’, पुरोगामी असण्याचे प्रतीक म्हणून डॉ. मेंडिस यांच्यासह बहुतांश आधुनिक इतिहासकार सांगतात. वयाच्या तेहत्तीस वर्षांपर्यंत अत्यंत कट्टर मुसलमान असलेला व स्वत:स ‘गाझी’ म्हणवून घेणारा अकबर, अचानक पुरोगामी व ‘सेक्युलर’ कसा काय झाला? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी त्यावेळची परिस्थिती पाहणे फार आवश्यक आहे.
नासिर-उद्दीन मुहम्मद हुमायून म्हणजेच ‘हुमायूं’ हा अकबराचा बाप व आजोबा झहिर-उद्दीन मुहम्मद बाबर म्हणजेच ‘बाबर’ यांना भारतात तसे पाय रोवता आले नाहीत कारण त्यांचा स्थानिक प्रजेशी सलोख्याचा संबंध नव्हता. भारतात मुघल साम्राज्य हे बाहेरून आलेले उपरे साम्राज्य होते. त्यामुळे केवळ लष्करी बळावर एवढ्या मोठ्या देशावर दीर्घकाळ राज्य करणे अशक्य होते, हे अकबराच्या लक्षात आले होते. अकबराचे स्वतःचे अमीर-उमराव हे तुराणी आणि इराणी वंशाचे होते. हे सरदार अत्यंत महत्त्वाकांक्षी होते आणि ते अकबराच्या सत्तेला कधीही आव्हान देऊ शकत होते. अगदी, अकबराचा सावत्र भाऊ मिर्झा हकीम याने उघड बंड केले होते. याशिवाय मखदूम-उल-मुल्क आणि अब्दुन नबीसारखे कट्टर सुन्नी उलेमांचे प्रस्थ वाढले होते. वयाच्या तिशीत अकबराला समजले होते की, जर केवळ या विदेशी मुसलमानांवर विसंबून राहिलो, तर भारतात तग धरणे अशक्य आहे. म्हणूनच, या सरदारांना शह देण्यासाठी त्याने भारतातील मूळ आणि बलाढ्य अशा राजपूत राजांशी आणि स्थानिक हिंदू घटकांशी जवळीक साधण्यास सुरुवात केली. जिझिया कर रद्द करून आणि हिंदू सणांमध्ये स्वतः सहभागी होऊन अकबराने प्रजेचा विश्वास संपादन केला.
अकबराने सुरू केलेला ’दीन-इ-इलाही’ (तौहीद-इ-इलाही) हा काही लोकांचा उद्धार करणारा, ‘सेक्युलर’ वा पुरोगामी पंथ नव्हता, तर तो सम्राटाशी एकनिष्ठ राहणार्या दरबार्यांचा एक गट होता. यात प्रवेश करणार्याला सम्राटाच्या पाया पडावे लागे आणि सम्राटासाठी आपला माल, जीव, धर्म आणि अब्रू (चार गोष्टी) अर्पण करण्याची शपथ घ्यावी लागे. ’दीन-इ-इलाही’ हा आपली राजकीय निष्ठा वाढवण्यासाठी अकबराने सुरू केलेला प्रकार होता.
छत्रपती शिवाजी महाराज हिंदू राजे होते आणि अबूल-फतह जलाल-उद्दीन मुहम्मद अकबर हा कट्टर मुघल होता. दोघेही ‘सेक्युलर’ व पुरोगामी नव्हते. ‘तुर्क फौजेत ठेविलीयाने जय कैसा मिळतो?’ असे विचारणारे शिवाजी महाराज अभिषिक्त हिंदू राजे, छत्रपती होते. अकबराचे वरवर ‘सेक्युलर’ दिसणे ही त्याची राजकीय गरज होती. तो प्रचंड हिंदूद्वेष्टा होता. हिंदूंची ’कत्ल-ए-आम’ (सर्वसामान्य नागरिकांची सरसकट कत्तल) करून त्यांच्या मुंडक्यांचे मिनार रचणारा अकबर ‘सेक्युलर’ आणि पुरोगामी असेल तर मग या शब्दांचा नेमका अर्थ निश्चित करावा लागेल. मीर कासिमपासून ते ताहिर हुसैनपर्यंत सुरू असलेले हे क्रौर्य म्हणजे ‘सेक्युलरिझम’ असेल तर अशा सेक्युलरिझमचा विचार करावाच लागेल!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा