गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२६

दिवे लावत राहू!

सर्वोच्च न्यायालयाने एका दिवसाची परवानगी देऊनही मदुराई जिल्ह्यातील तिरुपरंकुंद्रम टेकडीवरील ‘दीपाथून’वर दिवा न लागण्याचे कारण हिंदूच आहेत. ‘शेकडो वर्षांचा विचार करू नका, आत्तापुरते पाहा’, ‘हिंदू-मुस्लीम करू नका’, ‘दिवे लावले नाही म्हणून जग बुडणार नाही’, वगैरे हे सर्व म्हणणारे हिंदूच आहेत. ‘हिंदू खतरे मे’ वगैरे अजिबात नाही; मेलेले कोंबडे कधी ‘खतर्‍या’त असते? हिंदू संस्कृती संपवण्यासाठी शेकडो वर्षांपासून रोवलेली बीजे, फोफावलेल्या वृक्षासकट उपटून तिथे हिंदू मूल्यांचे बीजारोपण होत नाही तोवर संस्कृती कुजण्याची ही प्रक्रिया हळूहळू पण निरंतर सुरूच राहील. आणि आम्ही हिंदू तोवर दिवे लावत राहू!

 ‘सेक्युलर’ राज्यघटनेने मेख मारून हिंदूंचे किती मोठे नुकसान केले आहे, याचे अगदी कालपरवाचे उदाहरण म्हणजे मदुराईतील ‘कार्तिगई दीपम्’! शेकडो वर्षांपूर्वी पेरलेल्या बीजांच्या वृक्षांना आलेली फळे वर्तमानात खावी लागत असूनही, हिंदू समाज व संघटना केवळ आजच्यापुरता विचार करतात. त्यामुळे, हिंदू संस्कृती संपेपर्यंत हिंदू ही फळे खात राहतील आणि आत्तापुरते दिवे लावत राहतील!

१९२३च्या सब-कोर्टाच्या निकालात आणि १९३१च्या प्रिव्ही कौन्सिलच्या निर्णयात तमिळनाडूतील मदुराई जिल्ह्यातील तिरुपरंकुंद्रम टेकडीच्या संपूर्ण जागेचे आणि सीमांचे अत्यंत सूक्ष्म विश्लेषण आलेले आहे. त्यात या खांब्याला कुठेही सर्व्हेक्षणाचा खांब म्हटलेले नाही आणि ‘दीपाथून’(दीपस्तंभ) असेही म्हटलेले नाही. पण, ही संपूर्ण जागा देवस्थानची असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. त्यामुळे, जागेच्या मालकीचा प्रश्‍न १९३१सालीच निकाली निघाला होता. 

टेकडीच्या वरच्या भागात दिवा लावण्याची परवानगी मागण्यासाठी सुरुवातीपासूनच वैयक्तिक भक्त आणि हिंदू संघटना न्यायालयात गेल्या. १९९४साली हा वाद प्रथम मद्रास उच्च न्यायालयात नेला गेला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२५मध्ये रामा रविकुमार या भक्ताने मद्रास उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून ’दीपाथून’ स्तंभावर दिवा लावण्याची मागणी केली. तसेच, हिंदू धर्म परिषदेने डिसेंबर २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यावर निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने २० नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशात फक्त मंदिर प्रशासन (देवस्थानम) आणि सरकारच्या अधिकृत प्रतिनिधींनाच तेथे जाऊन दिवा लावण्याची परवानगी दिली. ज्यांनी याचिका दाखल केली होती त्या भक्तांना नाही. याचाच फायदा तामिळनाडू सरकारने घेतला. देवस्थान समितीने कलेक्टरला प्रतिज्ञापत्र लिहून दिले की न्यायालयाने आदेश दिलेल्या जागी आम्ही दिवे लावणार नाही, अन्य ठिकाणी लावू. आता सर्वोच्च न्यायालय याला स्वत:च्या आदेशाचा अवमान मानते, की देवस्थानाने व सरकारने ‘सामाजिक सलोखा राखण्याचे’ कौतुकास्पद कार्य मानते, हे येणारा काळच ठरवेल!

मुख्य प्रश्‍न हाच आहे, की हे घडले त्याची सुरुवात कुठून झाली. त्याची ‘मेख’ राज्यघटनेनेच मारली आहे. ‘सेक्युलर’ राज्यघटनेने.कलम २५(२)(ब) ‘हिंदू’ असा शब्दप्रयोग मुद्दाम केल्याने, राज्य सरकारांनी मंदिरांच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. सार्वजनिक देवळे ही सर्व हिंदूंची होती; ती कुठल्याही ट्रस्टची किंवा संप्रदायाची नव्हती, त्याचा फायदा अनेक राज्य सरकारांनी घेतला व देवळांच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण मिळवले. संपूर्ण भारतात एकाही राज्याने एकाही चर्चवर आणि एकाही मशिदीवर असे नियंत्रण मिळवण्याचे धाडस दाखवले नाही. याचे कारण त्याची बीजे व्यवस्थित विचार करून शेकडो वर्षांपूर्वी पेरण्यात आली आहेत. त्यामुळेच, साधा दगडी क्रॉस ते कपेल व कपेल ते चर्च हा प्रवास विनाअडथळा होतो. मंदिरे, त्यात येणारा पैसा, जमिनी मात्र सरकारच्या ताब्यात जातात. 

चर्चवर किंवा मशिदीवर मंदिरांसारखे नियंत्रण मिळवण्याचे धाडस कुठलेही राज्य सरकार किंवा भारत सरकार दाखवूच शकत नाही. ‘एकगठ्ठा मते’ हे राजकीय पक्षांचे इंधन असते. त्यामुळे, त्याविरुद्ध जाण्याचे धाडस कुठलाही राजकीय पक्ष करत नाही. बहुसंख्य असलेला हिंदू समाज व त्याच्या संघटना केवळ आजच्यापुरते पाहतात. वैयक्तिकदृष्ट्याही प्रत्येक हिंदू आपल्यापुरते पाहतो. त्यामुळे, हिंदूंचा संघटित विरोध होण्याची भीती एकाही राजकीय पक्षास नाही! 

सर्वोच्च न्यायालयाने एका दिवसाची परवानगी देऊनही मदुराई जिल्ह्यातील तिरुपरंकुंद्रम टेकडीवरील ‘दीपाथून’वर दिवा न लागण्याचे कारण हिंदूच आहेत. ‘शेकडो वर्षांचा विचार करू नका, आत्तापुरते पाहा’, ‘हिंदू-मुस्लीम करू नका’, ‘दिवे लावले नाही म्हणून जग बुडणार नाही’, वगैरे हे सर्व म्हणणारे हिंदूच आहेत. ‘हिंदू खतरे मे’ वगैरे अजिबात नाही; मेलेले कोंबडे कधी ‘खतर्‍या’त असते? हिंदू संस्कृती संपवण्यासाठी शेकडो वर्षांपासून रोवलेली बीजे, फोफावलेल्या वृक्षासकट उपटून तिथे हिंदू मूल्यांचे बीजारोपण होत नाही तोवर संस्कृती कुजण्याची ही प्रक्रिया हळूहळू पण निरंतर सुरूच राहील. आणि आम्ही हिंदू तोवर दिवे लावत राहू!