सोमवार, १३ एप्रिल, २०२६

ब्राह्मणांचे १०० टक्के आरक्षण व तत्कालीन शिक्षण व्यवस्था

ब्राह्मणांनी इतरांना शिक्षणापासून वंचित ठेवले म्हणायला त्यांच्याकडे शिक्षण होते कुठले, याचा कुणीच विचार करत नाही. पौरोहित्याव्यतिरिक्त त्यांच्याजवळ इतर शिक्षण नव्हते.

इतर सर्व जातीच्या लोकांना व खास करून दलितां(?)ना शिक्षणापासून वंचित ठेवल्याचा आरोप ब्राह्मणांवर कायम केला जातो. सगळे विचारवंत डोळे झाकून मान्य करतत. ब्राह्मण तर स्वत:स अपराधी मानू लागले आहेत. "केले असेल पूर्वजांनी; आम्ही तर जातपात मानत नाही ना?" असा बचावात्मक पवित्रा ब्राह्मण जातीचे लोक घेतात. आरक्षणाची गोष्ट येते तेव्हा गेली हजारो वर्षे शिक्षण क्षेत्रावर ब्राह्मणांना १०० टक्के आरक्षण होते, हा खोटारडेपणा अपराधी भावनेने स्वीकारतात व गप्प बसतात. स्वत:ची जात मागास ठरवण्यासाठी आंदोलने करणार्‍यांनाही ब्राह्मणांनी शिक्षणापासून वंचित ठेवले हे खरे वाटते. 

शिक्षण म्हणजे काय इथपासूनच बहुधा सुरुवात करावी लागेल. आज ज्याला आपण शिक्षण म्हणतोय तशी क्रमिक, शालेय शिक्षणपद्धती ब्रिटिश येण्याआधी नव्हती. अधीच्या पद्धतीत स्त्री आणि पुरुष दोघांनाही व्यावसायिक शिक्षण घरातच मिळत असे. परंपरेने, पिढी दर पिढी हे शिक्षण व कौशल्य सांभाळले जात असे व वाढत असे.

जात म्हणजे व्यावसायिक ओळख!

एका जातीतले लोक आपले शिक्षण दुसर्‍या जातीस देत नसत. लोहाराला, सुतारकामातले आणि सुताराला कुंभाराच्या कामातले बारकावे, कौशल्य माहीत असत नव्हते.  म्हणजे एका जातीतले लोक इतरांना वंचित ठेवत होते, असे म्हणायचे का? व्यावसायिक शिक्षणाव्यतिरिक्त अन्य काही शिकायची इच्छा असल्यास गुरुकुलात जात असत. ब्राह्मण जातीतले लोकही घरीच शिकायचे किंवा पौरोहित्यातले (जे नेहमी वापरात नसे) ते शिकायला पाठशाळेत जायचे. गोव्यातले अनेक ब्राह्मण पूर्वी नाशिक, काशी येथे जाऊन चक्क माधुकरी मागून शिकले आहेत.  ब्राह्मणांनी इतरांना शिक्षणापासून वंचित ठेवले म्हणायला त्यांच्याकडे शिक्षण होते कुठले, याचा कुणीच विचार करत नाही. पौरोहित्याव्यतिरिक्त त्यांच्याजवळ इतर शिक्षण नव्हते. तेच कशाला पौरोहित्यातही जे प्रयोग, विधी केले जायचे तेवढेच माहीत असत. म्हणूनच शिवरायांच्या आधी ३०० वर्षे कुणाचा राज्याभिषेक झालेलाच नसल्याने त्याचा विधी महाराष्ट्रातील ब्राह्मणांना माहीतच नव्हता.  

ब्रिटिशांनी शिक्षणाचे संस्थागत रूप आणले. रुग्णावर इलाज करायचा असेल तर डॉक्टरी शिका; इथपर्यंत ते ठीक होते. पण, डॉक्टरी नाही शिकला तर त्याला इलाजच करता येणार नाही किंवा तो भोंदू हे त्यांनी रुजवले. झाडपाल्याची औषधे करणारे गावोगावी होते ते वैदू ठरले. त्यांच्या उपचार पद्धती रानटी, अवैज्ञानिक, अशास्त्रीय ठरवल्या गेल्या.  टिपू सुलतानाच्या काळात कापलेल्या नाकाची प्लास्टिक सर्जरी करणारा रस्त्याच्या कडेला बसणारा कुंभार होता. त्याला कुठल्या ब्राह्मणाने ते शिकवले? आज एखादा कुंभार प्लास्टिक सर्जरी करू शकेल? त्याच्याकडे असलेली पारंपरिक विद्या व कौशल्यच ब्रिटिशांनी नष्ट केले. तेच प्रत्येक व्यवसायाबाबत केले.

प्रत्येक जात इतरांस पूरक व परस्परावलंबी होती. पैशांची देवाणघेवाण नसे. वस्तूंची असे. ब्राह्मणाची शेतीवाडी असली तरी त्याला शेतसारा द्यावा लागे, जो सगळ्यांना वाटून जात असे. गोव्यात तर गावकारी पद्धत होती.  ब्रिटिशांनी शिक्षण पद्धती लादून केवळ छोटे व्यवसायच संपवले असे नव्हे तर ग्रामीण भागांची आत्मनिर्भरताच संपवली. त्यांना साहेब करतील, या मनोवृत्तीत ढकलले. जे गोर्‍यांनी केले तेच काळ्या साहेबांनी पुढे चालू ठेवले. पूर्णपणे आत्मनिर्भर असणारी गावे राज्यकर्त्यांवर संपूर्णपणे अवलंबून असण्याचे कारणही तेच आहे. 

आजच्या शिक्षणव्यवस्थेची फूटपट्टी घेऊन भारतीय शिक्षण पद्धतीची मोजपापे काढणार्‍यांना आजकाल दिव्य कीर्ती मिळते, हेच दुर्दैव आहे! 

त्याहीपुढे जाऊन अजून न संपलेले वसाहतवादी बौद्धिक पारतंत्र्य हे सर्वांत मोठे दुर्दैव आहे!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा