सोमवार, १३ एप्रिल, २०२६

वारकरी आणि ‘पवार’करी

वारकरी संप्रदायाला धोका प्रतिगामी, धार्मिकांचा नाही, तर आत घुसलेल्या पुरोगामी व ‘पवार’कर्‍यांचा आहे. त्यांची घुसखोरी वेळीच रोखली नाही, तर विठ्ठलाच्या भक्तीऐवजी हे समतेचे, समानतेचे खूळ माजेल. समृद्ध परंपरा असलेला वारकरी संप्रदाय मूळ वारीच्या वाटेवरून भरकटेल. वारकर्‍यांची पाऊले पंढरीच्या वाटेनेच जायला हवीत, बारामतीच्या वाटेने नव्हे!
विठ्ठलाची वारी करणार्‍यांचा संप्रदाय म्हणजे वारकरी. ‘वैष्णव’, ‘माळकरी’ अशी नावे असलेला हा संप्रदाय भागवत धर्माखाली येतो. विठ्ठल या लोकदैवताचे विष्णू हे वैदिकीकरण असल्याचे रा. चि. ढेरे, दुर्गा भागवत वगैरे म्हणत असले तरी ते तसे नाही. कारण, त्यांचा हा सिद्धांत आर्य आक्रमणावर पूर्णपणे बेतलेला नसला, तरी साम्यवाद आणि समाजवादाने पेरलेल्या वर्ग विभागणीत व वर्गसंघर्षात आहे. ते वेगळेपण मानल्यामुळे त्यांना समन्वयाचा सिद्धांत मांडावा लागतो. एकाच रूपाचे भिन्न ठिकाणी वेगवेगळे रूप असे ते मानायला तयार नाहीत कारण त्यांची वैचारिक बैठकच तशी नाही. 

एकात्म तत्त्व, देवता विचार हा वेदांपासून ते आजपर्यंत एकसंध, अखंड व सातत्याने प्रवाही विचार आहे. तेहतीस प्रकारच्या निसर्गदेवतांमध्ये देवचार, क्षेत्रपाल, प्राणी, झाडे, पक्षी, वारूळ, मूर्ती सगळे येते. त्यात विठ्ठलही येतो आणि गोव्यातली सांतेरही येते. विठ्ठल हा ‘बहुजनांचा देवू’ आहे असा विचार जेव्हा हे विचारवंत मांडतात तेव्हा त्यांना विठ्ठलाशी काही देणेघेणे नसते, त्याचा संबंध बहुजनांशी जोडून इतरांना वेगळे किंवा आक्रमक ठरवण्याचा असतो. सांतेर असलेली शांतादुर्गा झाली हे लोकदैवतेचे, निसर्गदेवतेचे ‘ब्राह्मणीकरण’ आहे, असा विचार मांडतात. पण, खांडोळ्याच्या सांतेरीचे (वारुळाचे) मूर्तीरूप कुणी केले, याचे उत्तर मात्र देणे टाळतात. ते ब्राह्मणांनी केले नाही तर तिला भजणार्‍या मूळ स्थानिकांनीच केले, हे ते सांगत नाहीत. एकाच शक्तीरूपाचे विविध प्रकारे झालेले प्रकटीकरण हे मान्य करावे लागते. तसे केले तर पुरोगामी, समाजवादी, साम्यवादी वर्गसंघर्ष मांडता येत नाही. 

शरद पवारांनी हल्लीच केलेले वक्तव्य हा त्याचाच पुढील भाग आहे. ‘वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोाकांची घुसखोरी झाली आहे. वारकरी संप्रदायात ६० टक्के लोकांची मांडणी धर्मांध शक्तींना बळ देणारी आहे’, असे जे शरद पवार म्हणत आहेत, त्या वारकरी संप्रदायाला पुरोगाम्यांशी काही देणेघेणे नाही. वारकरी संप्रदाय हा पूर्णतः आस्तिक्यभावावर आणि विठ्ठलभक्तीवर आधारलेला आहे. वारीत चालणारा वारकरी सामाजिक बदलासाठी नाही, तर ’विठ्ठल भेटी’साठी चालतो.

वारकरी संप्रदाय भक्तिमार्गी धार्मिकांचा व प्रतिगामींचाच आहे. त्यात पुरोगामी घुसले आहेत. सोबत समाजवादी, निधर्मी, साम्यवादी, हे लोकही घुसले आहेत. हे लोक समतेच्या, समानतेच्या, सामाजिक सुधारणेच्या गप्पा हाणतात. अभंगांचे तोडून मोडून अर्थ सांगतात. गेल्यावर्षी ते ‘अल्ला देवे, अल्ला पिलावे’ प्रकरणही असेच पुरोगामी घुसल्याचे ज्वलंत उदाहरण होते. अनेक साम्यवादी कीर्तनकार, प्रवचनकार (त्यांच्या प्रोफाइलवरही तसेच लिहिले होते) समतेच्या, समानतेच्या गप्पा हाणत होते. 

वारकरी संप्रदायाचा मूळ उद्देश हा ’विठ्ठल भेटी’ची आस आणि ’मोक्ष’ किंवा ’सायुज्यकता’ प्राप्त करणे हाच आहे. नामस्मरण, कीर्तन आणि वारी ही साधने चित्तशुद्धीसाठी आहेत. ती पुरोगामित्व, सामाजिक समतेचा राजकीय जाहीरनामा मांडण्यासाठी नाहीत. एखाद्या संस्थेत, संप्रदायात घुसून ताबा मिळवणे व नष्ट करणे हे सांस्कृतिक मार्क्सवादाचे लिखित ध्येय आहे. त्याचे राजकीय फायदे ओळखून गेल्या अनेक वर्षांपासून अनेक पुरोगामी, ‘पवार’करी वार्‍या करू लागले. प्रारंभी ‘ग्यानबा तुकाराम’ याला पर्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी आरंभला होता. संतांची जातवार विभागणी या लोकांनीच केली. त्यामुळे भजन, कीर्तनात ज्ञानदेव, एकनाथ नकोसे होऊ लागले. पण, त्याला फारसा पाठिंबा मिळाला नाही. मग, तुकारामाच्या खुनाचे तर्कट लढवण्यात आले. ‘सदेह स्वर्गा’त जाणे तर्काला पटत नसल्याने त्यांचा खूनच झाला, असा तर्कट मांडण्यात आले. श्रद्धेच्या प्रत्येक मुळावर घाव घालताना, त्याची जातवार मांडणी करताना तोंडी समतेच्या व समानतेच्या गोष्टी कायम ठेवल्या.

मुळात वैयक्तिक सुधारणेवर भर असलेला वारकरी संप्रदाय व संत हे धार्मिकच आहेत. त्या अर्थाने ते प्रतिगामीही आहेत. त्यांना समतेच्या चळवळीचे पाईक करण्याचा कुणी प्रयत्न करू नये. ते वारकरी संप्रदायाच्या मूळ गाभ्याशी जुळेनासे झाले तशी ‘भक्ती चळवळ’ नावाची नवी वळवळ विचारवंतांनी  सुरू केली. मग, प्राचीन काळापासून असलेली व वारकरी संप्रदायाचा मूलाधार असलेली भक्तिसूत्रे जी अनेक ऋषीमुनींनी लिहिली त्याचे काय? याचे उत्तर कुणीही देत नाही. 

वारकरी संप्रदायाला धोका प्रतिगामी, धार्मिकांचा नाही, तर आत घुसलेल्या पुरोगामी व ‘पवार’कर्‍यांचा आहे. त्यांची घुसखोरी वेळीच रोखली नाही, तर विठ्ठलाच्या भक्तीऐवजी हे समतेचे, समानतेचे खूळ माजेल. समृद्ध परंपरा असलेला वारकरी संप्रदाय मूळ वारीच्या वाटेवरून भरकटेल. वारकर्‍यांची पाऊले पंढरीच्या वाटेनेच जायला हवीत, बारामतीच्या वाटेने नव्हे!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा