कोकणी ही भाषा एकच असली, तरी तिच्या पाच लिपी आहेत व त्यातली एक रोमी किंवा रोमन आहे. तांत्रिकदृष्ट्या हा मुद्दा बरोबर आहे. पण, ख्रिश्चन तसे मानतात का? या प्रश्नाचे उत्तर "नाही" असेच आहे. https://www.facebook.com/reel/1276236410688728 येथे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ते लक्षांत येईल.
ईशान्य भारतातील, विशेषतः मणिपूर, नागालँड, मिझोराम येथे स्थानिक भाषांच्या बाबतीत चर्च आणि मिशनरि यांनी काही स्थानिक भाषांसाठी रोमन लिपी सुरू केली. आसामी भाषेसाठी ब्राह्मी लिपीपासून विकसित झालेल्या 'कामरूपी' शैलीतून उगम पावलेली स्वतःची स्वतंत्र 'आसामी लिपी' होती. प्राचीन ताइ घराण्याच्या अहोम भाषेला 'अहोम लिपी' होती. लेपचा भाषेची 'लेपचा लिपी' होती. चकमा लोकांच्या भाषेसाठी 'चकमा लिपी' होती. मोनपा, खंबा आणि सिक्कीममधील सिक्कीमी भाषेसाठी तिबेटी लिपी होती. ताइ खामती भाषेसाठी लिकताइ लिपी होती. 'लिंबू' भाषेसाठी 'किरात सिरीजंगा' ही लिपी होती. याशिवाय मिझो, नागा, खासी या बोली भाषा होत्या, ज्यांना लिपी नव्हती.
ईशान्य भारतात जेव्हा ख्रिस्तीकरण झाले तेव्हा सक्तीने या भाषांसाठी रोमन लिपी लागू करण्यात आली. त्या भाषांचा मूळ सांस्कृतिक पोत बदलला. अनेक शब्द बदलले. नवीन शब्द रूढ झाले. रोमन ही केवळ लिपी न राहता रोमी कोकणीसारखीच तिथेही रोमी कोकबोरोक ही भाषा म्हणून विकसित झाली. ख्रिस्तीकरणामुळे या भाषांमध्ये पांथिक विधी, नातेसंबंध आणि दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक मूळ शब्द बदलून त्या जागी इंग्रजी किंवा लॅटिन शब्दांचे प्राकृत रूप रूढ झाले. यामुळे भाषेचा मूळ 'सांस्कृतिक गाभा' बदलला. एकदा गाभा बदलला की सांस्कृतिक, पांथिक, सामाजिक, भौगोलिक सगळ्या अस्मिताही आपोआप चिकटतात. प्रत्येक भाषिक वेगळेपण, "वेगळे व्हायचेय मला" हा उद्घोष करू लागते.
हाच मुद्दा धरून मी अनेक कोकणी लेखकांना, रोमी कोकणी वेगळी भाषा आहे का, असे विचारले होते. बहुतेक सर्वांचे म्हणणे होते, की भाषा एकच आहे. फक्त लिपी वेगळी आहे. त्यात "गुलाब" या रोमन लिपीतून निघणार्या कोकणी मासिकाचे संपादक फाऊश्त दि कॉश्ता यांनीही तेच सांगितले. कोकणी अकादमीने दोन्ही रोमन व देवनागरीसाठी वेगवेगळे नियम मानक करून दिले आहेत. त्यावर एक प्रश्न उपस्थित झाला की मग "रोमी कोकणी" अशी शब्दयोजना का केली जाते? आणि भाषा एकच असेल तर लिपीनुसार वेगळी मानके का? ("सगल्यांक देवाची दया आनी मोग कळचो" हे "sagalyaank devachi daya ani moga kalacho" असेच त्याचे लिप्यंतर होईल. तेही होताना उच्चारास जवळ जाणारे होतील. भाषेचे नियम बदलणार नाहीत. )
ज्या भाषा अनेक लिपीत लिहिल्या जातात त्यांची ओळखही लिपीवरून करून दिली जात नाही. त्यामुळे, रोमी कोकणी असे संबोधन खटकते. आता प्रत्येक ठिकाणची कोकणी वगळी असे खूळ आले तर विचारायलाच नको. कर्नाटकी, मंगळूरी, कुंदापुरी, कारवारी, हल्याळी, भटकळी अशा वेगवेगळ्या कोकणी भाषा झाल्या तर अनवस्था ओढवेल. त्यातही कॅथलिक आणि हिंदू यांचे वेगळेपण हा आणखी एक घोळ व्हायचा.
कुठेही गेले तरी कोकणी एकच व तिची लिपीही एकच हे योग्य सूत्र आहे. कोकणीतील 'ळ', 'ण', 'ठ' ही अक्षरे देवनागरीत जशीच्या तशी वाचून उच्चारली जातात, तिथे रोमन लिपीसारखा संभ्रम होत नाही. मराठी व कोकणीसाठी देवनागरी हीच नैसर्गिक व योग्य लिपी आहे; रोमन नाही.
भाषा किंवा लिपी हे केवळ माध्यम आहे, असे मानणे चुकीचे. भाषा हे संवादाचे माध्यम नाही. भाषा, लिपी म्हणजे संस्कृतीची नाळ. विचार करण्याची पद्धत किंवा विचारप्रवाह. तो बदलला, की सगळेच बदलते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा