गोव्यात अनेक ठिकाणी जाग्यांना 'मानशीर', 'बानार' असे म्हटले जाते. प्रत्यक्षात तिथे मानसही नसते आणि बांधही नसतो. आता तिथे बांध, मानस नाही म्हणून त्या जागेचे ते नाव असूच शकत नाही, असा तर्क कुणी देऊ लागले तर कुणीही ऐकून घेणार नाही. वाघ्रो, वाघेरी ही नावे आहेत, त्या भागात वाघ नाहीत. पण, कधी तरी ते होते म्हणूनच तर त्याला तसे नाव पडले. आता कुणी असे म्हणेल की ज्या अर्थी तिथे वाघ नाहीत, म्हणजे ते त्या गावाचे नावच नाही, तर कसे व्हायचे? त्याचप्रमाणे हात कात्रो खांबाजवळ हात कापल्याचा उल्लेखच कुठे नाही, म्हणजे तिथे हात कापलेच जात नव्हते, असे म्हणणे चुकीचे ठरेल. त्या जागी घडलेल्या घटनांवरून व त्याची जबरदस्त भीती बसल्याने लोकांच्या स्मरणात त्या संदर्भातील नावे घट्ट राहतात. त्याला कुठे लिहिलेले असो वा नसो.
पेलोरिनो नोव्हो (Pelourinho Novo) हा खांब एका प्राचीन हिंदू देवळाचा भाग होता. स्तंभाच्या खालच्या भागावर कन्नड लिपीत "दयादंन्या" असे लिहिलेले आहे. हा शिवालयाचा खांब असावा. आता देवळाचा खांब पेलोरिनो नोव्हो कसा झाला याबाबत कुणीही सांगत नाही. देऊळ पाडून राहिलेल्या खांबाजवळ उभे राहून फर्माने देत असतील की शिक्षा देत असतील, हा तर्काचा भाग आहे. त्यातही पुन्हा पेलोरिनो वेल्हो (Pelourinho Velho) हा जुना स्तंभ बाजारपेठेजवळ होता.
आणखी एक महत्त्वाचा मुद्दा; पेलोरिनो नोव्हो नावाचा स्तंभ फक्त गोव्यातच होता का? नाही. दमण, दीव व कोचिन येथेही असे स्तंभ होते. पण, त्या स्तंभांना अशी शिक्षा दिल्याचा, जाळल्याचा, हात कापल्याचा संदर्भ असलेले नाव तिथे प्रचलित नाही. हात कातरो असे नाव फक्त गोव्यातच आहे. का? कारण तिथे फक्त आदेशच जाहीर केले जायचे व येथे हात कापले जायचे.
सोमनाथचे मोठे शिवलिंग फोडले, तोडले व त्याचे तुकडे दिल्लीतील जामा मशिदीच्या पायर्यांवर बसवले. का? येता जाता त्याला तुडवावे म्हणून. का? तर काफिरांविषयी व त्यांच्या देवांविषयी असलेली आत्यंतिक घृणा. तीच घृणा त्या पंथाचे नसलेल्यांविरुद्ध बाळगणारे ख्रिश्चन व पोर्तुगीज पाडलेल्या स्थानिकांच्याच देवळाच्या खांबाला बांधून स्थानिकांनाच शिक्षा देतील, हात कापतील की कायदेशीर व्यवहारांच्या आणि अधिकृत शासकीय घोषणा देतील याचा विचार तर्काने करावा लागतो.
सगळेच लिहिलेले नसते. लिहिलेले नाही, म्हणजे तसे झालेच नाही असे होत नाही.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा