सीजेपीच्या आंदोलनात सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला पाठिंबा द्यायला आलेल्या नंदिता नारायण यांनी ‘बस नाम रहेगा अल्लाह का..’ या ओळी मुद्दाम व जाणीवपूर्वक म्हटल्या. त्यांनी नंदिता राशिद अन्सारी हे पूर्ण नाव सांगून त्या ओळींचा अर्थ सांगितला असता, तर कदाचित कुणीच त्याकडे लक्षही दिले नसते. तिने ‘बस नाम रहेगा अल्लाह का’ म्हणणे यावर आक्षेप अजिबात नाही; ती जो त्याचा अर्थ सांगते व स्वत:च्या सांगण्याचे समर्थन करते ते केवळ चुकीचेच आहे, असे नव्हे तर घातकही आहे.
फैज अहमद फैज या पाकिस्तानी कवीची ‘लाज़िम है कि हम भी देखेंगे’ या नज्म(कविता)मधील ती ओळ आहे. डाव्यांची ही अतिशय आवडती कविता आहे व जिथे त्यांची सत्ता नाही, तिथे ही कविता ते म्हणतातच. नंदिता यांनी खास करून ही ओळ म्हणण्यामागेही ‘या ओळीचा सर्वांत जास्त त्रास उजव्या विचारसरणीच्या लोकांना होतो’ हेच कारण आहे. त्यांनी त्यानंतर जो अर्थ सांगितला आहे; न त्याचा काही संबंध वेदान्त तत्त्वज्ञानाशी आहे, ना ‘अहं ब्रह्मास्मि’ याच्याशी. आधीच्या कडव्यातील ओळी फार महत्त्वाच्या आहेत :
(अल्लाहची जमीन असलेल्या काबामधून जेव्हा सर्व मूर्ती काढून टाकल्या जातील) ‘अर्ज़-ए-ख़ुदा’ म्हणजे अल्लाहची भूमी, जमीन, काबा हा प्रदेश. बुत म्हणजे मूर्ती.
यात डावे असे सांगतात, की फैज अहमद फैज हे स्वतः कम्युनिस्ट (नास्तिक/डाव्या) विचारसरणीचे कवी होते. त्यांनी ही नज्म पाकिस्तानचे हुकूमशहा जनरल झिया-उल-हक यांच्या विरोधात लिहिली होती. जगात कुणीही मुसलमान कितीही डावा असला, तरी तो कधीच अल्लाह व इस्लामच्या विरुद्ध लिहीत नाही. डावे सांगतात तोच अर्थ जरी धरला तरी फैज झिया-उल-हकला मूर्तिपूजक म्हणतोय. दोघांचेही सुन्नी मुसलमान असणे, आड येत नाही. अल्लाहपेक्षा स्वत:ला मोठा समजणारा म्हणून तो झिया-उल-हकवर टीका करतोय. त्याचे राज्य जाऊन लोकशाही यावी असे म्हणत नाही. मूर्तिपूजक(मुसलमान असूनही) असलेल्या झिया-उल-हकची सत्ता जाऊन अल्लाहशी प्रामाणिक असलेल्या लोकांची (अहल-ए-सफा) सत्ता येईल, असे पुढे फैज म्हणतो. हे ‘अहल-ए-सफा’, ‘असहब-ए-सुफ़्फ़ा’ यावरून आलेले आहे. ‘असहब’ म्हणजे अनुयायी, साथीदार व मित्र आणि ’सुफ़्फ़ा’ म्हणजे चबुतरा किंवा ओटा. मदिनेतील मशिदीच्या (मस्जिद-ए-नबवी) मागील बाजूस प्रेषित मोहम्मद यांनी गरीब, निर्वासित आणि घरदार नसलेल्या अनुयायांसाठी एक सावलीचा ओटा (सुफ़्फ़ा) बनवला होता. तिथे राहून जे लोक केवळ कुराण शिकायचे आणि अहोरात्र प्रार्थना करायचे, त्यांना ’असहब-ए-सुफ़्फ़ा’ म्हणतात. त्यावरूनच कदाचित 'सुफी' हा शब्द आला असावा. अशा लोकांची सत्ता येईल व मूर्तिपूजक असलेल्या झिया-उल-हक यांची सत्ता जाईल, असा त्याचा अर्थ आहे.
झिया-उल-हक हा हुकूमशहा होता, त्यामुळे त्याविरुद्ध लिहिलेली ही कविता आहे, असे सांगितले जाते. डावे जेव्हा सत्तेत नसतात तेव्हा ते सत्तेत असलेल्यांना ‘हुकूमशहा’, ‘नाझी’, ‘हिटलर’, ‘फासिस्ट’ अशी बिरुदे लावतात. डाव्यांची सत्ता जिथे असते, तिथल्या हुकूमशहांविरुद्ध एक अक्षर ते काढत नाहीत. तिथे ‘नाम रहेगा अल्लाह का’ म्हणत नाहीत. फैज यांनी झिया-उल-हक यांच्याविरुद्ध लिहिले; पण, तेच काम रशियात स्टॅलिन करत होता, त्याविरुद्ध एक शब्द लिहिला नाही. त्यामुळे, जुलमी हुकूमशाही जाऊन लोकांचे राज्य येऊ दे, अशी भावना त्यामागे अजिबातच नाही व तसा त्याचा मूळ संदर्भही नाही.
दुसरा एक तर्क हे डावे देतात त्याचा संदर्भ याच कवितेतील दुसर्या कडव्यात आहे.
अनल-हक़ हा शब्द अना(मी) + अल् (तो) + हक़ (अल्लाह किंवा सत्य) मिळून ’अनल-हक़’ हा शब्द बनतो. पण, इस्लाम ‘मी अल्लाह’ हा विचार मानतच नाही. अगदी सुफीही ’सर्व काही देव आहे’ असे म्हणत नाहीत; उलट ते ’फक्त एका अल्लाहचेच अस्तित्व खरे आहे’, असे म्हणतात (’वह्दत-उल-वुजूद’). आपल्याकडेही अनेक विचारवंतांचा हाच घोळ आहे. ‘सगळे देव सारखे आहेत’, असे ख्रिश्चनिटी व इस्लामचे म्हणणे आहे, असे ते सांगतात. ख्रिश्चनिटी व इस्लाम असे कधीच म्हणत नाही. ते म्हणतात ‘देव येकूच. राम कृष्ण आहाय पोळोय ते देव न्हूय, ते सोंत’(देव एकच आहे. राम, कृष्ण वगैरे देव नव्हे, ते संत).
‘सगळे देव सारखे’ आणि ‘देव एकच आहे’ यात जो फरक आहे, तोच ‘अनल-हक़’ व ‘अहं ब्रह्मास्मि’मध्ये आहे. अहं ब्रह्मास्मि याचा अर्थ मीच ब्रह्म आहे असा होतो. हे सत्य जाणण्यासाठी कोणत्याही विश्वासाची किंवा देवावर श्रद्धा ठेवण्याची गरज नसते. माझ्यातील जाणीव आणि संपूर्ण विश्वात भरून राहिलेली जाणीव (शुद्ध चैतन्य) एकच आहे, वेगळी नाही. अनल-हक़ची भाषा करणारा सूफीवादी साधक स्वतःला अल्लाह मानत नाही. एक अद्वैत विचार आहे, तर दुसरा विचार द्वैत आहे. दोन्ही वेगळे आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा: अल्लाह म्हणजे देव; पण ब्रह्म म्हणजे देव नाही. जेव्हा इस्लाम ‘एकच अल्लाह आहे, त्याशिवाय अन्य कुणीच नाही’ असे म्हणतो तेव्हा तो वेदान्ती किंवा हिंदू ज्याला ‘ब्रह्म’ म्हणतात त्याबद्दल बोलत नाही; तो देवाबद्दल बोलतो. आपल्याकडे देव व धर्म वेगवेगळे आहेत. आपल्याकडे देव देव करणारा अधार्मिक असू शकतो व देवालाही न मानणारा धार्मिक असू शकतो. अल्लाहला व कुराणला न मानणारा मुसलमान असू शकेल का?
डावे विचारवंत दोन्ही गोष्टी एकच म्हणतात, पण त्या तशा नाहीत. त्यातील मूलभूत फरक ओळखून त्यांच्यापासून सावध राहणे आवश्यक आहे. डावे हे डावेच असतात; ते कधीही ‘प्राणिप्रेमी’, ‘पर्यावरणप्रेमी’, ‘मानवतावादी’, ‘लोकशाहीवादी’, ‘सत्तेविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवणारे’, ‘विज्ञाननिष्ठ’, ‘नास्तिक’ वगैरे नसतात. असलेच तर जिथे सत्ता नाही तिथेच असतात. डावे विचारवंत जेव्हा लोकशाही देशात किंवा इतर राजवटींमध्ये असतात, तेव्हा ते ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य’, ‘लोकशाही’, आणि ‘मानवी हक्कां’चे सर्वांत मोठे कैवारी बनतात. स्वतःची सत्ता आल्यानंतर ते सर्वांत आधी याच स्वातंत्र्याचा गळा घोटतात. जिथे गळा कापला जाण्याची शक्यता असते तिथे तो काढत नाहीत आणि जिथे तशी शक्यता अजिबातच नसते तिथे ‘नाम रहेगा अल्लाह का’ जोरजोरात म्हणतात!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा