रविवार, २८ डिसेंबर, २०२५

सातेरीचे ‘ब्राह्मणीकरण’

देव म्हणजे काय, हे गेल्या लेखात मांडले होते. तत्त्वाला समजून घेण्यासाठी सगुण, साकार रूपात भजणे, मूर्तीची पूजा करणे हे सर्वत्र आहे. भौगोलिक परिस्थितीप्रमाणे त्यात भिन्नता आढळत असली तरी त्यामागे हेतू, भावना, संस्कार आणि संस्कृती एकच आहे. 

माती, दगड, झाड, पशू, पक्षी अशा निसर्गातील अनेक घटकांमध्ये सगुण रूपात देव हे तत्त्व भजले, पुजले जाते. त्यातूनच तयार झालेले स्थान - वारूळ, देवराई, देवस्थान - पूजनीय ठरले. वनात, जंगलात राहणारे व त्यानुरूप जीवनशैली असलेल्या भारतीयांनी वारुळ, देवराई यांच्याठायी ते तत्त्व पाहिले. जंगलापाशी, निमशहरी, नागरी भागात राहणार्‍यांनी तेच तत्त्व कलश, दगडी मूर्ती करून देवस्थानात पाहिले, पुजले व भजले. त्यामागची संस्कृती एकच. त्या विचारात, मानण्यात भिन्नता नाही. 

जेव्हा ख्रिश्‍चन मिशनरि पंथ प्रसार करण्यासाठी भारतात आले, तेव्हा त्यांनी - जे जगभरच्या संस्कृती नष्ट करताना केले तेच - भेद असलेल्या जागा निवडल्या व त्या मोठ्या करण्यासाठी अनेक विचार प्रसवले. ‘आर्यांचे आक्रमण’ नावाचे थोतांड त्यातूनच जन्मले. आपल्याशिवाय जगात काहीच कुठेच चांगले नव्हते व आम्ही जग पवित्र, ‘सिव्हिलाइज्ड’ केले ही वसाहतवादी मानसिकताही त्यात होती. त्यामुळे, इथे जे जे काही चांगले म्हणून सापडले त्याचे मूळ त्यांनी भारताबाहेर शोधले. या भूमीत पूर्वी कुणीच राहत नव्हते, माणसे स्थलांतर करून आफ्रिकेतून इथे आली. पहिल्यांदा आले ते मूलनिवासी, आदिनिवासी व त्यांच्यावर आर्यांनी आक्रमण केले व त्यांची संस्कृती नष्ट केली अशी पाचरही मारून ठेवली. जी आजतागायत अनेक राजकीय, सामाजिक हेतू असलेली माणसे आणखी घट्ट करत आहेत. 

रा. चि. ढेरे यासारख्यांनी तर ‘भारतात वैदिक आर्यांच्या आगमनापूर्वीपासून स्थानिक समूहांची स्वतःची दैवते होती’ या गृहीतकावर विठ्ठलाच्या वैदिकीकरणाचा सिद्धांत मांडला. त्याचीच री पुढे ओढत गोव्यातील विचारवंतांनी विठ्ठलाला ‘बहुजनांचा देवू’ केला. त्याचेच पुढचे संस्करण म्हणजे ‘वारूळरूपी सातेरीचे ब्राह्मणीकरण’ झाले असा तर्क मांडला जात आहे. काही उपटसुंभ तर आदिवासींचे आधी हिंदूकरण झाले व नंतर ख्रिस्तीकरण झाले, असा समांतर धागा (पॅरलल ड्रॉ करणे) रंगवतात. देवळे मोडून त्याजागी चर्च उभारणारा ख्रिश्‍चिन पंथ व मशिदी उभारणारा इस्लाम पंथ यांच्याइतकाच हिंदू धर्मही अन्याय करणाराच आहे, असे त्यांचे म्हणणे असते. गंमत म्हणजे अगदी मागे जायचे तर इथे कुणीच आदिवासी, मूलनिवासी नव्हते व सगळे आफ्रिकेतून इथे आले हे म्हणणे खरे धरावे लागेल. 

‘सातेरीचे ब्राह्मणीकरण’ असेच शब्द का वापरले जातात? वारुळे होती ती मोडून सारस्वतांनी किंवा ब्राह्मणांनी त्याची मूर्ती केली का? मूर्तीरूप केलेले व भजणारे लोक हे त्या वारूळरूपी सातेरीचेच भक्त आहेत ना? वारूळ मोडून मूर्ती स्थापन केली आहे का? सध्या तसे थेट म्हटले जात नसले तरी याच विचारांची पुढची पिढी हेच गृहीतक मांडेल की, जशी हिंदूंची देवळे पाडून मुसलमानांनी मशिदी आणि ख्रिश्‍चनांनी चर्च उभारल्या तसेच त्यांच्या आधी आदिवासींची वारुळे (रोइणी) पाडून हिंदूंनी ब्राह्मणी देवतांच्या मूर्ती उभारल्या. 

देवतेची मूर्तीरूपात पूजा करणे म्हणजे ‘ब्राह्मणीकरण’ असेल तर मूर्तीपूजा इस्लाम जिथे जन्मास आला त्या मक्केतही होती. मग, ‘ब्राह्मणीकरण’ असा शब्दच इथे का योजला जातो? त्याचे मूळ आर्य, वैदिक, ब्राह्मण हे बाहेरून इथे आले या संकल्पनेत आहे. ही ‘फॉल्टलाइन’ काढली जात आहे. जी पुढे जाऊन अनेक संघर्षांना जन्म देईल. आज जे होत आहेत त्यापेक्षाही भयानक परिस्थिती याच ‘फॉल्टलाइन’ नंतर निर्माण करतील. पण या परिणामांची जबाबदारी हे लेखक, विचारवंत घेत नाहीत. त्यांना बहुजन समाजाचा कैवार घेत आपले पुरोगामीपण मिरवायचे आहे. पण, हे विचारवंत त्याच वसाहतवादी मानसिकतेची व ख्रिस्ती मिशनरि प्रचाराची सांस्कृतिक मार्क्सवादाच्या आकर्षक खोक्यात गुंडाळलेली कुजकी फळे आहेत. आज ते जे पेरत आहेत, त्याचे परिणाम भोगायला ही लाल माकडे असणार नाहीत. जातीभेद मिटवण्याच्या गप्पा हाणत तो अधिकच कसा रुजेल; समानतेच्या नावाखाली विषमताच कशी अधिक घट्ट होईल, याची काळजी घेतात.

ज्यांना देवाचे अस्तित्वच मान्य नसते, त्यांना देवतेच्या ‘ब्राह्मणीकरणा’ची चिंता लागते तेव्हा त्याचे कारण देव, संस्कृती नष्ट करणे हेच असते. अन्यथा वड पुजण्याला कर्मकांड, थोतांड म्हणणारे पर्यावरणवादी, हजारो वर्षे अनेक वटवृक्ष टिकून आहेत, देवराया टिकून आहेत त्याचे श्रेय त्या पुजण्याला व संस्कृतीला देत नाहीत. निसर्गचक्रावरच आधारित असलेल्या आपल्या संस्कृतीतल्या देवांच्या प्रत्येक सणाला प्रदूषणाची, प्राण्यांच्या हत्येची आठवण हमखास होते. 

जगभरातील प्रत्येक निसर्गपूजक संस्कृती संपलेली असताना, आपली संस्कृती अजून तग धरून आहे. त्याचे कारण या संस्कृतीच्या गाभ्यापर्यंत अजून ही विचारवंतांची टोळधाड पोहोचली नाही. चैतन्याचे जिथे जिथे प्रकटीकरण होते; मग ते वारूळ असेल, दगड असेल, मूर्ती असेल, काहीही असेल त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करा. सातेरी, शांतादुर्गा, रवळनाथ, देवचार, कुळागरातला ब्रह्मा, विष्णू, शंकर सगळे आमचेच आहेत. त्यांमागे असलेले तत्त्व एकच आहे. त्याला हात जोडून नमस्कार करा. त्या तत्त्वापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरूच ठेवा!

मंगळवार, २३ डिसेंबर, २०२५

देव म्हणजे काय? देव आहे का?

‘देव आहे की नाही’, ‘देवच सगळे करतो, तर अत्याचारही तोच करतो का?’ वगैरे हे प्रश्‍न विसरून जा. आपल्या क्षमतेबाहेरही जगात काही तरी आहे, जे आपण केल्यामुळे झाले नाही, असे आपल्याला मिळाले आहे व मिळत आहे, यासाठी ते देणाऱ्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. जेवत असाल, तर हे अन्न शिजवणाऱ्या गृहिणीसाठी, त्यासाठी लागवडीपासून ते कापणीपर्यंत काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यासाठी आणि त्याही पुढे जात ज्यामुळे त्याची निर्मिती होते त्या तत्त्वासाठी कृतज्ञता व्यक्त करा. छानपैकी डोळे मिटा, नमस्कार करा. त्याला धन्यवाद द्या! झालेच शक्य कधी, तर या माहितीवरून त्या तत्त्वाचे ज्ञान होण्यासाठी प्रयत्न करा.
‘देव म्हणजे काय?’ आणि ‘देव आहे का?’ या दोन प्रश्‍नांचा खल गेली हजारो वर्षे सुरू आहे. हे समजून घेण्याचा सर्वांत जास्त चांगला प्रयत्न भारतात झाला, याचा मला अभिमान आहे. 

देव हे तत्त्व आहे. ऊर्जा किंवा चैतन्य आणि जड या दोन्हीतही असलेले तत्त्व म्हणजे देव. तत्त्व समजून घेण्यासाठी तत्त्वच उपयुक्त आहे, तर्क नाही. तत्त्व हे ज्ञान झाल्यावर आपोआप समजते. तर्क हा माहितीवर आधारित असतो. ‘साखर गोड आहे’ यातील ‘साखर’ म्हणजे काय, असे विचारल्यास ती दाखवता येते, ‘गोड’ म्हणजे काय यासाठी ती साखर चाखूनच पाहावी लागते. माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळे. माहिती करून घ्यावी लागते, तर ज्ञान होते. त्यामुळे, देव मानण्यावर नाही. आपण मानो किंवा न मानो, देव आहेच. 

संस्कृतमध्ये दिव (द्यु-द्यतते) या धातूपासून बनलेल्या क्रियापदाचा अर्थ चमकणे किंवा प्रकाशणे असा आहे.  ’दिवु क्रीडाविजिगीषाव्यवहारद्युतिस्तुतिमोदमदस्वप्नकान्तिगतिषु’ या सूत्रानुसार ’दिव’ धातूचे अनेक अर्थ होतात. त्यात ’द्युति’ (प्रकाशणे/चमकणे) हा मुख्य अर्थ आहे. जो स्वतः प्रकाशमान आहे आणि प्रकाश देतो, तो ’देव’. या धातूपासून दिवा, देव असे शब्द तयार झाले. दिव या एका धातूपासून झालेले शब्द असले तरीही, जे कळतं तो ’दिवा’ आणि ज्याच्यामुळे कळतं तो ’देव’. 

ज्याच्यामुळे चैतन्य(ऊर्जा) आणि जड कळतं, ते तत्त्व म्हणजे देव. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न अनेक मार्गांनी झाला. देव तत्त्व समजून घेण्याचा प्रयत्न सगुण साकार माध्यमातून झाला, तसाच तो निर्गुण निराकार माध्यमातूनही झाला. तत्त्वाला तर्काने समजून घेण्याच्या प्रयत्नात अनेक वाद निर्माण झाले. ‘सगळे काही देवामुळेच होते’ किंवा ‘सगळे देवच करतो’, इथपासून ते ‘देव वगैरे असे काही नसतेच, भटांची पोटे भरायची मनुवादी सोय’ किं़वा ‘देवाला रिटायर करा’ किंवा ‘देव असेल तर दाखवा’, वगैरे प्रकार सुरू झाले. ‘एकच देव आहे’ किंवा ‘देव एकच आहे’ इथपासून ते ‘माझा देव हाच पुजण्यायोग्य बाकीचे सगळे खोटे देव’ इथपर्यंत मते मांडणे, खोडणे सुरू झाले. या सगळ्यांत देव हे तत्त्व समजून घेण्याचा प्रवास भरकटला. 

भारतामध्ये देव या तत्त्वाचे तेहेतीस प्रकार सांगितले आहेत. अष्ट वसू हे ’जड’ सृष्टीतून (पृथ्वी, पाणी, अग्नी), अकरा रुद्र हे जिवात असलेल्या जैविक ऊर्जेतून आणि बारा आदित्य हे खगोलीय ऊर्जेतून शुद्ध चैतन्य ज्ञात होण्याची तत्त्वे आहेत. यांचे संचालन, व्यवस्थापन करणारी उर्वरित दोन तत्त्वे म्हणजे इंद्र आणि प्रजापती. मग, इथे एक प्रश्‍न पडतो; बाकीचे हे जे देव आहेत, त्यांचे काय? 

एक तर ते या तेहेतीस प्रकारांपैकी कुठल्या तरी एका प्रकारात येतात, त्याचे रूप असतात किंवा काम्य, उपास्य देवता असतात. आपण ज्यांना गोव्यात ‘देवचार’, ‘खेत्री’ वगैरे म्हणतो ते वसू, रुद्र या प्रकारांत मोडतात. आपण मेल्यानंतर आपल्या सूक्ष्म देहाचा प्रवासही वसू, रुद्र आणि आदित्य या तत्त्वांतून होत असतो. आपल्या कर्मानुसार गती प्राप्त होते. कर्म नाहीसे होईपर्यंत पुन्हा पुन्हा जीवस्थितीत येणे क्रमप्राप्त आहे. ते नाहीसे झाले की आपण जे जड आहोत, ते शुद्ध चैतन्यात विलीन होतो. यालाच ‘मोक्ष’ म्हणतात. 

आपण आज जे सुख, दु:ख भोगत असतो, ते आपल्याच कर्माचे फळ, क्रियेची प्रतिक्रिया असते. ते ‘जशास तसे’ या न्यायाने मिळत नाही, तर ‘जेवढ्यास तेवढे’ या न्यायाने मिळते. इथे एक प्रश्‍न उभा राहतो; ‘कर्माचे फळ याखाली बलात्कार येतो का?’ असेलही किंवा ते नवीन कर्मही असेल. काहीही असले तरी ते बलात्कार करणाऱ्याच्या बचावाचे कारण, सबब ठरत नाही. एका मर्यादित अर्थाने, हे कर्मफळ पोहोचवण्याची, उजेडात आणण्याची व्यवस्था म्हणजे देव!

फारच जड झाले का? सोडून द्या सगळे जे वाचलेत. ‘देव आहे की नाही’, ‘देवच सगळे करतो, तर अत्याचारही तोच करतो का?’ वगैरे हे प्रश्‍न विसरून जा. आपल्या क्षमतेबाहेरही जगात काही तरी आहे, जे आपण केल्यामुळे झाले नाही, असे आपल्याला मिळाले आहे व मिळत आहे, यासाठी ते देणाऱ्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. जेवत असाल, तर हे अन्न शिजवणाऱ्या गृहिणीसाठी, त्यासाठी लागवडीपासून ते कापणीपर्यंत काबाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यासाठी आणि त्याही पुढे जात ज्यामुळे त्याची निर्मिती होते त्या तत्त्वासाठी कृतज्ञता व्यक्त करा. छानपैकी डोळे मिटा, नमस्कार करा. त्याला धन्यवाद द्या! झालेच शक्य कधी, तर या माहितीवरून त्या तत्त्वाचे ज्ञान होण्यासाठी प्रयत्न करा. 

रविवार, २१ डिसेंबर, २०२५

आम्हांला काय त्याचे?

दीपेश चंद्र दास नावाचा ३० वर्षांचा माणसाला झुंडीने मारण्यात आले, फरफटत ओढून झाडाला बांधण्यात आले व जाळण्यात आले. असे दर दिवशी बांगलादेशात घडते. मारणारे मुस्लीम असतात व मरणारे हिंदू असतात. मानवाधिकार नसलेले कुत्रे मेले काय व जगले काय? काय फरक पडतो?

रविवार आहे. झाले जेवण? बघितलात टीव्ही, केली चर्चा निवडणुकीवर, बांधलेत अंदाज कोण निवडून येतील याचे? हरकत नाही. आता वामकुक्षी घ्या. स्वस्थ झोपा. एक साधी कुठे तरी दूर घडलेली घटना  सांगायची होती. हळहळही व्यक्त करू नका. काहीच करू नका. कॉंग्रेसचे असाल तर भाजपचे सरकार का जाब विचारत नाही, म्हणून भक्तांची ठासा आणि भाजपचे असाल तर गेल्या सत्तर वर्षांचा हिशेब काढत मुस्लीम लांगुलचालनावर भाष्य करत गुलामांची ठासा. वाटल्यास एआयने केलेले मीम शेअर करा.  पुन्हा झोपी जा. काहीच घडले नाही.

दीपेश चंद्र दास नावाचा ३० वर्षांचा माणसाला झुंडीने मारण्यात आले, फरफटत ओढून झाडाला बांधण्यात आले व जाळण्यात आले. असे दर दिवशी बांगलादेशात घडते. मारणारे मुस्लीम असतात व मरणारे हिंदू असतात. मानवाधिकार नसलेले कुत्रे मेले काय व जगले काय? काय फरक पडतो? 

१९२१साली मोपलात झाले; बाकीच्या देशातले सगळे हिंदू ‘आमच्या इथे नाही घडले?’. तेच १९२४साली कोहाटमध्ये झाले;बाकीच्या देशातले सगळे हिंदू ‘आमच्या इथे नाही घडले?’. १९२५साली कलकत्त्यात घडले; बाकीच्या देशातले सगळे हिंदू ‘आमच्या इथे नाही घडले?’. १९२९साली बॉम्बेमध्ये घडले; बाकीच्या देशातले....(कंटाळा आला कॉपी पेस्टचा). १९४६साली कलकत्ता; बाकीच्या..... १९४६साली नौखालीत(इथे तर कुणालाच ते ‘दंगे’, ’दंगल’ असे शब्दही लावता येणार नाही. कारण गांधी चार महिने तळ ठोकून होते व चार महिने त्यांच्यासमोर केवळ हिंदू कापले गेले.); बाकीच्या..... १९४७साली फाळणी; बाकीच्या...... १९६१साली जबलपूरमध्ये; बाकी.... १९६९साली अहमदाबादमध्ये; बाकी.... १९७०साली जळगावमध्ये; बाकी.... १९८३साली आसाममध्ये; बाकी.... १९८९साली बिहारमध्ये; बाकी...... १९९०साली काश्मीर(हिंदूंना काही पडलेलेच नाही, सर्वोच्च न्यायालयासही काही पडून गेलेले नाही. हिंदू मानवाधिकार असलेला माणूस थोडाच आहे? तो तर सेक्युलर नसलेला कम्युनल आहे); बा...... (इथून आजवर जे लहानसहान घडतेय, ते आणि ‘बा’च्या पुढे ‘की’ व नंतरचे लिहिण्याचाही कंटाळा आलाय.) 

जाऊ द्या हो! काय आणि किती मनावर घ्यायचे? 

आम्ही हिंदूं कुत्र्याच्या मौतीनेच मरण्याच्या लायकीचे आहोत! हे एकदा मान्य केले, की आपल्या घरातल्या कुणाला तरी जमावाने ओढून फरफटत बाहेर नेऊन जाळले, तरी काही वाटणार नाही. चितेच्या लाकडाचा खर्च तरी वाचला, म्हणून समाधान मानू आम्ही हिंदू. नौखालीत मरेपर्यंत बलात्कार केला किंवा १४जणांनी बलात्कार करूनही वाचली म्हणून जिवंत असताना करवतीने तुकडे केले; तर आमच्या कुटुंबातील कुणा स्त्रीचे नाही ना केले, असे म्हणून गप्प बसणारे आम्ही स्वत:च्या कुटुंबातील मुलीच्या बाबतीत असे घडले तर आम्ही हिंदू ‘चला लग्नाचा खर्च वाचला’, यावर समाधान मानू. सेक्युलरिजम जिवंत राहिला पाहिजे यावर गप्पा हाणू, चर्चासत्र करू. 

आम्हांला काय त्याचे? 

मराठी क्वॉरावरील पोस्ट : https://qr.ae/pCU5Ik

सोमवार, १५ डिसेंबर, २०२५

भद्र, अभद्र आणि रामभद्र

जे रामभद्राचार्यांनी म्हटलेच नाही, ते नवभारत टाइम्सचे नाव वापरून सर्वत्र व्हायरल केले जात आहे. त्यांनी प्रत्यक्षात तसे म्हटले असते, तर त्यांच्यावर टीका होणे अजिबात गैर नव्हते. पण, त्यांनी तसे म्हटले आहे की नाही याची खातरजमा न करता, स्वत:ची वैचारिक विष्ठा त्यांच्या नावे खपवली गेली. त्यावर आलेल्या अभद्र टिपण्या तर सांगताही न येणाऱ्या आहेत.
आपल्या सभोवताली काय चांगले, काय वाईट हे आपण झुंडशाहीच्या नियमाने ठरवू लागलो आहोत. जे जिथे वाईट आहे, ते तिथे नेमकेपणाने सांगणे, आपण कधीच सोडून दिले आहे. आपण कुठल्या झुंडीचा भाग आहोत, त्यावरून आपले व्यक्त होणे ठरू लागले आहे. आपल्या धडावर झुंडशाहीचे ‘सहस्रशीर्ष’ आहेत. व्यक्ती कोण, काय आहे यापेक्षाही ती कुठल्या झुंडशाहीत आहे, कशाशी जोडलेली आहे, कुठल्या व्यक्तींची समर्थक आहे, यावर त्याचे महत्त्व ठरते. ‘आपला तो बाब्या दुसऱ्याचा तो कारटा’ ही उक्ती अतिशय क्षुल्लक ठरावी, अशा पद्धतीने टोकाची स्तुती व पातळी सोडून निंदानालस्ती केली जाते. परिणामी, आपण दृष्टी असूनही दृष्टिहीन होत चालले आहोत. ‘नराचा नारायण’ होण्याचे ध्येय असलेली माणसे स्वत:लाच किती हीन बनवत आहेत, हे पाहवत नाही. जे पाहिले होते, ते दिसत नाही आणि जे दिसते ते पाहवत नाही!

गिरिधर राजदेव मिश्र यांचा जन्म उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील एका गावात झाला. ते दोन महिन्यांचे असताना त्यांना खुपरीचा (ट्रॅकोमा) आजार झाला व त्यांचे डोळे गेले. १९५०साली त्यावर उपचार नव्हते किंवा योग्य उपलब्ध नव्हते म्हणून असेल, पण दृष्टी गेली. त्यानंतरचे त्यांचे सर्व  शिक्षण ऐकून व पाठांतर करण्याच्या क्षमतेमुळे शक्य झाले. पाठांतर केले म्हणजे ते कायमस्वरूपी लक्षात राहण्याची व हवे तेव्हा ते आठवण्याची निसर्गदत्त क्षमता आहे. १९६७साली  त्यांनी जौनपूर जिल्ह्यातील सुजनगंज येथे असलेल्या आदर्श गौरीशंकर संस्कृत कॉलेजातून संस्कृतमधील उत्तरा माध्यमा (हायर सेकंडरी) ही परीक्षा ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. १९७१ मध्ये गिरिधरांनी वाराणसी येथील संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठा त प्रवेश घेतला. तेथून त्यांनी शास्त्री (बी.ए.) ही पदवी विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली. १९७६मध्ये त्यांनी याच विद्यापीठातून आचार्य (एम्.ए.) ही पदवी परीक्षेत सर्वप्रथम येऊन मिळविली. १९८१मध्ये त्यांनी विद्यावर्धिनी (पीएच्.डी.) ही पदवी प्राप्त केली. १९९७मध्ये त्यांनी विद्यावाचस्पती (डी.लिट्.) ही पदवी मिळविली. ही पदवी त्यांना भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन् यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. ३ ऑगस्ट १९९६ रोजी त्यांनी चित्रकूट (उत्तर प्रदेश) येथे ‘तुलसी स्कूल फॉर द ब्लाइंड’ या शाळेची स्थापना केली. तसेच २७ सप्टेंबर २००१ रोजी चित्रकूट येथे त्यांनी केवळ दिव्यांगांसाठी असलेले जगातले पहिले विद्यापीठ स्थापन केले. त्यापूर्वी, बरीच वर्षे आधी ते रामानंद संप्रदायाचे अनुयायी झाले. ‘तुलसीपीठ’ ही संस्था स्थापन केली. गिरिधर मिश्र हे ‘रामभद्राचार्य’ झाले!

मस्जिद-ए-जन्मभूमी विरुद्ध राममंदिर या न्यायालयीन खटल्यात त्यांनी दिलेली साक्ष व एकूणच रामचंद्रांविषयीचे संदर्भ फार महत्त्वाचे ठरले. तेव्हापासून ते टीकेचे धनी झाले. मोदींनी त्यांची व त्यांनी मोदींची प्रशंसा केल्याने त्याला राजकीय वळणही प्राप्त झाले. तेव्हापासून त्यांच्या शारीरिक व्यंगावर अतिशय अभद्र पद्धतीने टीका होऊ लागली. राजकीय, सामाजिक क्षेत्रात असलेल्यांवर टीका होणे ही काही नवीन बाब नाही. पण, पूर्वी सार्वजनिक संडासाच्या फुटक्या दाराच्या आतल्या बाजूवर कोळशाने जे बसल्या बसल्या साहित्य पाडत, तेच आता सार्वजनिक माध्यमांवर पाडले जात आहे. या वैचारिक कुंथण्याला किंवा अतिसाराला मर्यादाच उरल्या नाहीत. यात हात धुऊन घेण्यात कुणीही मागे नाही. एखादी गोष्ट सत्य आहे की नाही, याला काहीच महत्त्व नाही. आपल्या झुंडशाहीत ती नाही म्हणजे ती चूकच आहे, किंवा जशी ती दाखवली जाते तशीच आहे, अशी खात्री असते. ती तशी असणे हेच बहुधा झुंडशाहीचे ओळखपत्र असावे. नेहरू, गांधी, सावरकर हे तर या झुंडशाहीचे नेहमीचे ‘बळी’. 

या झुंडशाहीत जे केले जाते, त्याला वैचारिक विरोध म्हणणे अत्यंत चुकीचे आहे. वैचारिक विरोध हा विचारांपुरताच मर्यादित असतो. विचारांवर, निर्णयांवर टीका करणे चुकीचे नाही. ती झालीच पाहिजे. नेहरूंच्या निर्णयांचे परिणाम आज जाणवत आहेत, त्यावर टीका होते. पण, म्हणून त्यांच्या नसलेल्या दहा बायका काढून अभद्रतेची हीन पातळी गाठणे चुकीचेच आहे. मोदींनी आज घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दिसू लागल्यानंतर त्यावरही टीका होणे स्वाभाविकच आहे. पण, म्हणून त्यांच्या वैयक्तिक, खासगी आयुष्यावर अत्यंत हीन पातळी गाठून टीका करणे, याला वैचारिक विरोध कसे बरे म्हणता येईल?

जे रामभद्राचार्यांनी म्हटलेच नाही, ते नवभारत टाइम्सचे नाव वापरून सर्वत्र व्हायरल केले जात आहे. त्यांनी प्रत्यक्षात तसे म्हटले असते, तर त्यांच्यावर टीका होणे अजिबात गैर नव्हते. पण, त्यांनी तसे म्हटले आहे की नाही याची खातरजमा न करता, स्वत:ची वैचारिक विष्ठा त्यांच्या नावे खपवली गेली. त्यावर आलेल्या अभद्र टिपण्या तर सांगताही न येणाऱ्या आहेत. ती पातळी गाठता येत नाही म्हणून उत्तर देणे थांबते. दु:ख याचे नाही, की रामभद्राचार्यांवर अभद्र बोलले, लिहिले गेले; दु:ख याचे आहे की चांगल्या, सुशिक्षित, कविमनाच्या माणसांनी ते केले. त्याचे समर्थनही, कुठले तरी कुठे तरी ’सेटल’ करून ‘जितं मया’, म्हटल्यासारखे केले याचे वाईट वाटले. भद्र माणसांनी अभद्रतेची सर्वांत खालची पातळी गाठली याचे दु:ख झाले. ‘नरेचि केला हीन किती नर..’ हे पाहून प्रचंड त्रास झाला.  

मंगळवार, ९ डिसेंबर, २०२५

काय फायदा?

 
काय फायदा?

एकोणीस वर्षांच्या वेदमूर्ती देवव्रत रेखे याचा देशाला काय फायदा? असा प्रश्न विचारणाऱ्यांंनी फक्त पाठांतर पद्धतीचा अभ्यास केला तरी अचंबित व्हायला होईल. पाठांतर, घोकंपट्टी, रेटून काही फायदा नाही; आधी अर्थ समजून घ्यायला हवा, हा विचार फार घातक आहे. ज्या वयात पाठांतर करण्याची शक्ती असते त्याच वयात ते करावे लागते. अर्थ समजून घेण्यासाठी आयुष्यही पुरत नाही. ख्रिश्चन मिशनरि आणि ब्रिटिश लेखकांनी लिहिलेल्या द्वेषपूर्ण व चुकीच्या लिखाणास प्रमाण मानून आपल्या संस्कृतीला हीन समजणारे स्वाभिमानशून्य विचारवंत हाच प्रश्न विचारतात, "काय फायदा?"

वेदपठणाच्या एकूण अकरा पद्धती आहेत, ज्या दोन भागांत विभागलेल्या आहेत; प्रकृती आणि विकृती. मूलभूत, नैसर्गिक असलेल्या प्रकृती पाठांतर्गत  संहिता (सर्वांत मूळ आणि सामान्य क्रम पाठ करणे), पद पाठ (संहितेतील प्रत्येक शब्द किंवा पद वेगळे करून, विराम देऊन  पाठ करणे) आणि क्रम पाठ (शब्द जोड्यांमध्ये पाठ करणे). याशिवाय, आठ विकृती पाठ आहेत. विकृती म्हणजे बदल(चुकीचे किंवा नकारात्मक नव्हेत) करून पाठ करणे. विकृती पाठांतर्गत जटा (शब्दांची उलट-सुलट मांडणी करून पाठ करणे, माला (शब्दांना एका विशिष्ट क्रमाने पुन्हा पुन्हा माळेसारखे जोडून पाठ करणे), शिखा ( शिखेसारखी रचना असलेली व  शब्दांचा क्रम वर-खाली करत पाठकरणे), रेखा ( शब्दांची विशिष्ट पद्धतीने रेषेसारखी मांडणी करून पाठ करणे), ध्वज (ध्वजाच्या आकाराप्रमाणे शब्दांची मांडणी करत पाठ करणे), दंड ( दंड किंवा काठीच्या सरळ रेषेप्रमाणे एक विशिष्ट क्रमात पाठ करणे, रथ (रथाच्या चाकाप्रमाणे शब्दांचा क्रम चक्राकार ठेवत पाठ करणे) आणि घन (शब्दांची अत्यंत गुंतागुंतीची रचना आणि अनेक दिशांनी ती पाठ करणे) या आठ आहेत. या सर्व अकरा पद्धतींनी हजारो वर्षांपासून वेदांचे मूळ स्वरूप आणि अचूक उच्चारण जतन केले आहे. या पद्धती केवळ पाठांतरासाठीच नव्हे, तर मंत्रांचे व्याकरण, स्वर आणि अर्थ न बदलता ते जसेच्या तसे पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी तयार केल्या गेल्या होत्या. 

याचा फायदाच हवा असेल तर सांगतो, 

सती अपवादात्मक असताना तिला प्रथा म्हणून सिद्ध करण्याचा आणि वेदकाळापासून ती प्रचलित असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न हेन्री थॉमस कोलब्रूक यांनी १७९५ साली केला. त्यांनी 


इ॒मा नारी॑रविध॒वाः सु॒पत्नी॒राञ्ज॑नेन स॒र्पिषा॒ सं वि॑शन्तु । 
अ॒न॒श्रवो॑ऽनमी॒वाः सु॒रत्ना॒ आ रो॑हन्त॒ं जन॑यो॒ योनि॒मग्रे॑ ॥

(प्रेतासोबत जाणार्‍या स्त्रिया, ज्यांचे पती जिवंत आहेत किंवा युवा आहेत, त्यांनी आणि विधवा झालेल्या स्त्रीने जलाशयासमीप जाऊन डोळे, तोंड धुवावे आणि पुन्हा स्वस्थ होऊन घरी जावे.)

हा ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील अठराव्या सूक्तातील सातवा मंत्र जो बहुधा अंत्येष्टी (अंत्यसंस्कार) विधीत वापरला जातो, तो चक्क बदलला. अग्रे (पुढे जा) हा शब्द बदलून तिथे अग्ने (अग्नीत जा) हा शब्द घातला.  हे विधवे तू अग्निप्रवेश कर असा अर्थ करून सती जाण्याची आज्ञा वेदात आहे, असे भासवले. या सर्व पाठांतर पद्धतीतून वेदाध्ययन केलेल्या विद्वानांनी ही बदमाशी उघड केली. त्यामुळे, विलियम जोन्स यांनी मंत्राचे भाषांतर चुकल्याचे सांगितले. संस्कृतचे विद्वान एच. एच. विल्सन यांनी सायणाचार्यांप्रमाणे त्याचा खोटारडेपणा जगासमोर आणला. हे केवळ त्या पाठपद्धतीमुळे शक्य झाले. अन्यथा लिहिलेले असते, तर त्यात बदल करून तेच आमच्या माथी मारले गेले असते. 

याच्याच पुढील मंत्रात

उदी॑र्ष्व नार्य॒भि जी॑वलो॒कं ग॒तासु॑मे॒तमुप॑ शेष॒ एहि॑ । 
ह॒स्त॒ग्रा॒भस्य॑ दिधि॒षोस्तवे॒दं पत्यु॑र्जनि॒त्वम॒भि सं ब॑भूथ ॥

(हे स्त्री, तू उठ, जिवंत लोकांच्या जगात परत ये. ज्याच्या शेजारी तू झोपली होतीस, तो मृत झाला आहे. (तुझे) पत्नीपण आता संपले आहे, तरी तू इथेच राहून संसार कर)  असा स्पष्ट उल्लेख आहे. असे असतानाही सती ही प्रथा होती, असे सांगत जो भंपकपणा केला जातो, तो किळस आणणारा आहे. 

आता तर "विधवा प्रथा" नामक बिनडोक प्रकार सुरू झाला आहे. विधवा होणे ही अवस्था आहे, ती प्रथा कशी होऊ शकते, हा साधा विचारही या विचारवंतांना सुचत नाही. प्रथा म्हणून संस्कृतीस एकदा हीन ठरवायचेच असे ठरवले की मग अपवादासही नियम करणे ओघाने आलेच. याविरुद्ध आवाज उठवणे आवश्यक आहे. ही आपली संस्कृती आहे. ना ती ब्राह्मणी आहे, ना बाहेरून आलेल्या युरेशिअन आर्यांची आहे, ना ती बहुजनविरोधी आहे. उलट यातील अनेक सूक्ते आज ज्यांना बहुजन म्हटले जाते, अशा ऋषींनीच रचलेली आहेत. ती परंपरा, ती संस्कृती जशास तशी जतन करण्याचा फायदा काय, असे विचारणार्‍या स्वाभिमानशून्यांना काय म्हणावे, तेच कळत नाही. 


मंगळवार, २ डिसेंबर, २०२५

पूजा नाईकच्या बातमीतला ‘लिंगबदल’

‘ऑटो ट्रान्स्लेट’ ही सुविधा सुरू असल्यामुळे अंतूच्या मोबाइलवर मूळ मराठी मजकूर इंग्रजीत दिसत होता. त्यात ‘.... या प्रकरणातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने शनिवारी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले’, असे होते त्याचे इंग्रजी भाषांतर करताना मराठीतीले ‘हिने’ इंग्रजीत कसे घ्यावे हे न कळल्याने मराठीतली ‘ही’, इंग्रजीतही तशीच राहिली. इंग्रजी बातमीत पूजा नाईकचा झालेला ‘लिंगबदल’ हा ‘ऑटो ट्रान्सलेट’चा घोळ होता.
पुलंच्या ‘असा मी असामी’मध्ये धोंडो जोशी कुमार गिरीशच्या शाळेतील मुख्याध्यापिका सरोज खरे यांना भेटायला जातात तो प्रसंग आठवला :  

‘सरोज खरे म्हणतात,  ‘कुमार गिरीशमध्ये आम्हाला काही चमत्कारिक ट्रेट्स दिसतात. असे थोडे आउट ऑफ द वे वागणार्‍या मुलांमध्ये हे विवक्षित गुण कुठून आले याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या पालकांच्यातल्या ट्रेट्स पाहाव्या लागतात. प्रॉफेसर ऑस्ट्रोजेमची थिअरी आहे. पॅरेन्ट सायकॉलॉजीवर ऑथोरिटी आहे ती’ त्यावर जोशी म्हणतात, ‘हो हो प्रश्‍नच नाही. ऑस्ट्रोजेम म्हणजे काय, ही इज अ जेम’ त्यावर सरोज खरे म्हणतात,‘ही नाही शी आहे ती’. त्यावर चतुरपणे स्वत:ची बाजू सांभाळत, ‘मी मराठी ‘ही’ म्हटली’, असे  जोशी उद्गारतात.’

हा प्रसंग आठवायला कारण ठरला तो अनंत गोब्रे या पुलंना न भेटलेल्या वल्लीने पाठवलेला व्हॉट्सअ‍ॅप मेसेज. रत्नांग्रीच्या त्या मधल्या आळीतले सगळे घेऊन वेळगे ग्रामीची ही ‘अंतू गोब्रे’ नामक व्यक्ती पुलंना भेटायला हवी होती, असे प्रत्येक अनुभवागणिक वाटते. असो!  ‘गोमन्तक टीव्ही’च्या एका फेसबुक पोस्टचा स्क्रीन शॉट अंतूने पाठवला होता. त्यात पूजा नाईकने आपल्याला नोटीस मिळाली नसल्याचे म्हटले होते. तो मजकूर इंग्रजीत होता आणि त्यात पूजा नाईक विषयी ‘He didn't receive the legal notice sent by IAS officer Nikhil Desai in the 'Cash for Job' case, says he will also drag Desai's chief engineer Uttam Parsekar along with Desai, the main accused Pooja Naik said while speaking to 'Gomantak' on Saturday. ’ असे इंग्रजीत लिहिलेले दिसत होते. त्या स्क्रीनशॉटखाली अंतूचा मला प्रश्‍न, ‘हा लिंगबदल कधी झाला?’ 


अर्थात माझ्याही लक्षात येईना ही चूक कशी झाली. मी फेसबुक धुंडाळले. पण, ती बातमी काही सापडली नाही. मग मी तीच मेसेज सुशांत मांगलेकरला फॉरवर्ड केली. तो बिचारा त्याच्या नवजात मुलीला आंघोळ घालण्यात व्यग्र होता. मूल जन्माला घातले म्हणजे वडील होत नाही, वडील होण्याचा हा प्रवास फार मोठा असतो, याचा अनुभव तो आताशा घेऊ लागलाय.  थोड्या वेळाने त्याचा फोन आला. तो म्हणला, ‘ती मूळ पोस्ट मराठीत आहे. तुम्हांला मूळ बातमीचा स्क्रीनशॉट पाठवलाय. तुमच्या मित्राच्या मोबाइलवर ऑटो ट्रान्स्लेट ऑन असल्याने हे झाले असावे.’ 

सुशांतची व्हॉट्सअ‍ॅप मेसेज पाहिली तेव्हा घोळ लक्षांत आला. ‘ऑटो ट्रान्स्लेट’ ही सुविधा सुरू असल्यामुळे अंतूच्या मोबाइलवर मूळ मराठी मजकूर इंग्रजीत दिसत होता. त्यात ‘.... या प्रकरणातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने शनिवारी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले’, असे होते त्याचे इंग्रजी भाषांतर करताना मराठीतीले ‘हिने’ इंग्रजीत कसे घ्यावे हे न कळल्याने मराठीतली ‘ही’, इंग्रजीतही तशीच राहिली. इंग्रजी बातमीत पूजा नाईकचा झालेला ‘लिंगबदल’ हा ‘ऑटो ट्रान्सलेट’चा घोळ होता.

असे अनेक घोळ प्रत्येक वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्या, सोशल मीडिया खाती यांवर होत असतात. काही चुका खरोखरच ‘उपसंपादकाच्या डुलक्या’ व ‘मुद्राराक्षसाचे विनोद’ असतात, यात दुमत नाही. पण प्रत्येक खेपेस तसेच असते, असे नाही. चूक कुणाकडूनही होऊ शकते, हे जाणून कोणताही पूर्वग्रह न बाळगता टीका करण्यास काहीच हरकत नाही. ‘सुधारणा व्हावी’ हा निखळ हेतू असावा. जसा आमच्या अंतूचा होता! 


रविवार, ३० नोव्हेंबर, २०२५

शंकराचार्य, शाही इमाम आणि लोकशाही

कामकोटी शंकराचार्य आणि शाही इमाम यांच्यात भारताचे नागरिक म्हणून असे काय वेगळेपण आहे. दिवाळीच्या दिवशी पूजा करत असलेल्या शंकराचार्यांना अटक करणारे ईदच्या दिवशी नमाज पठण करणार्‍या शाही इमामांना अटक करतील? अजिबात नाही!   का?   एकमेव कारण : लोकशाहीचे तीनही स्तंभ इस्लामला व मुसलमानांना प्रचंड घाबरतात.
भारतातील सेक्युलर लोकशाहीचे तीनही स्तंभ आणि चौथा स्वयंघोषित स्तंभ हिंदू-मुस्लीम असा भेदभाव कायम करत राहतात. सरकार, व्यवस्था, प्रशासन करीत असलेला भेदभाव दाखवून दिला तर ‘हिंदू-मुस्लीम करू नका’ नामक पुरोगामी अस्त्र तो भेद दाखवणार्‍यावर फेकून मारले जाते. 

सरकार कॉंग्रेसचे आहे, की भाजपचे आहे; न्यायाधीश कोण आहेत; प्रशासकीय प्रमुख कोण आहेत यावर हा भेदभाव किंवा घाबरणे, न घाबरणे अवलंबून नाही. हे सगळेच मुसलमानांना घाबरतात व हिंदूंना फाट्यावर मारतात. विचारवंतही यात अजिबात मागे नाहीत. १९५० ते १९८० या काळात भारताच्या अविकसित अर्थव्यवस्थेला एका विचारवंताने ‘हिंदू रेट ऑफ ग्रोथ’ म्हटले होते. 

२००४साली कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना दिवाळीच्या दिवशी झालेली अटक, चाललेला खटला आणि त्याचे माध्यमांवरचे प्रतिबिंब हा या दृष्टीने अभ्यासाचा विषय आहे. २०१३साली त्यांची निर्दोष सुटका झाली. २००४साली झालेल्या अटकेची बातमी सर्व वृत्त-माध्यमांवर महिनाभर ठळकपणे सुरू होती. निर्दोष सुटल्याची बातमी फक्त दोन दिवस टीव्हीवर झळकली, वर्तमानपत्रात एक दिवस झळकली. 

१९९६च्या अवैध बांधकामाच्या प्रकरणात २००१साली पहिला नॉन बेलेबल वॉरन्ट जारी करण्यात आलेले दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी आजवर दिल्ली पोलिसांना सापडले नाहीत. त्यानंतर अनेक प्रकरणात त्यांना कोर्टाचे अनेक समन्स बजावण्यात आले. ते एकदाही कोर्टात हजर झाले नाहीत. ‘त्यांना पकडले तर दंगली होतील, सामाजिक शांतता बिघडेल’, असे कारण कोर्टात देत पोलिसांनी खटला रद्द करण्याची मागणी केली. कोर्टाने केस सुरूच ठेवली व आजतागायत ती सुरूच आहे. स्वत: पाठवलेल्या समन्सना आरोपी हजर राहत नाही, याचे वैषम्य, अवमान कोर्टालाही वाटत नाही. वृत्त-माध्यमांना यावर बोलताच येत नाही.  कॉंग्रेस, आप व भाजप अशी तीन पक्षांची सरकारे दिल्लीवर आली. आजही शाही इमामला हात लावण्याची हिंमत न सरकारात आहे, ना प्रशासनात, ना न्यायालयात आहे. 

कामकोटी शंकराचार्य आणि शाही इमाम यांच्यात भारताचे नागरिक म्हणून असे काय वेगळेपण आहे. दिवाळीच्या दिवशी पूजा करत असलेल्या शंकराचार्यांना अटक करणारे ईदच्या दिवशी नमाज पठण करणार्‍या शाही इमामांना अटक करतील? अजिबात नाही!


का? 


एकमेव कारण : लोकशाहीचे तीनही स्तंभ इस्लामला व मुसलमानांना प्रचंड घाबरतात. 

राज्यघटना पाहा, सरकारचे निर्णय पाहा, प्रशासकीय निर्णय पाहा आणि न्यायालयाचे निर्णय/निकाल पाहा. हे म्हणणे पटेल. ‘कायदा सगळ्यांना सारखा’ व ‘कायद्यासमोर सगळे सारखे’ ही दोन अक्षरश: खोटारडी वाक्ये रेटून रेटून सांगितली जातात. पण, वस्तुस्थिती त्यापेक्षा खूप वेगळी आहे. 


शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०२५

सलीम, योगेंद्र आणि समाजवादी यादवी

सलीम, योगेंद्र आणि समाजवादी यादवी
योगेंद्र यादव यांची एक मुलाखत पाहून अनेक प्रतिक्रिया ते मुसलमान आहेत व आपली ओळख लपवून हिंदू म्हणून भासवतात; मुळात ते मुस्लीमच आहेत अशा अर्थाच्या आल्या. कुठल्याही गोष्टीवर व्यक्त होताना त्याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. 

योगेंद्र यादव यांचे आजोबा रामसिंग हे वॉर्डन होते. १९३८साली मुसलमानांती त्यांचा गळा चिरला. त्यावेळेस त्यांचे वडील देवेंद्र यादव आठ वर्षांचे होते. पुढे ते इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक झाले. त्यांची विचारसरणी समाजवादी असल्याने त्यांनी आपल्या मुलांची नावे इस्लामी ठेवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी आपल्या मुलाचे नाव सलीम ठेवले. शाळेत असताना हिंदू असूनही नाव सलीम कसे, यावरून सोबतचे विद्यार्थी विचारू लागले म्हणून त्यांनी आपले नाव बदलून योगेंद्र ठेवले. योगेंद्र यादव हे हिंदूच आहेत, मुसलमान नाहीत. 

आता खरा विचार करण्यासारखा मुद्दा; हे समाजवादी ‘संतुलन’, ‘सामाजिक’ सलोखा राखण्यासाठी म्हणून चुकीच्या व खोट्या गोष्टींचा आधार का घेतात?

मुसलमानांनी आपल्या वडिलांचा गळा चिरला म्हणून त्यांच्याविषयी आकस निर्माण होऊ नये म्हणून संतुलन राखण्यासाठी आपल्या मुलांची नावे इस्लामी ठेवणे, हा उपाय होऊ शकतो का? कुठल्याही समाजवाद्याने आपल्या मुलांची नावे इस्लामी ठेवली म्हणून मुसलमान गळे कापायचे थांबले नाहीत, थांबणार नाहीत. 

असेच दुसरे उदाहरण शरद पवारांचे. ते मुख्यमंत्री असताना मुंबईत झालेले सर्व बॉम्बस्फोट हिंदू जास्त प्रमाणात राहत असलेल्या वस्त्यांमध्ये झाले. शरद पवारांनी धावत पळत जाऊन न झालेला बॉम्बस्फोट मुस्लीमबहुल वस्तीत झाला म्हणून सांगितले आणि बॉम्बस्फोट करणारे मुस्लीम नाहीत हे सांगण्यासाठी ते लंकेचे असल्याचा निर्देश केला. बॉम्बस्फोट व्हायचे थांबले? दिल्लीतले उदाहरण ताजे आहे. 

समस्या इस्लाममध्येच आहे, हे जाणीवपूर्वक लपवून समाजवादी कुठला समाज घडवतात किंवा ‘सामाजिक सलोखा’ राखतात? उलट, योगेंद्र यादवांसारखे विचारवंत व शरद पवारांसारखे राजकारणी इस्लामी दहशतवादालाच पोसतात. ‘सामाजिक सलोखा’ राखण्यासाठी खोट्याचा आधार घ्यावा लागतो, हाच समाजवादाचा पराभव आहे. 

हेच समाजवादी, साम्यवादी, पुरोगामी विचारवंत इस्लामचे रक्षणकर्ते आहेत. खुद्द इस्लामी आक्रमकांना जेवढे भारताचे नुकसान करणे शक्य झाले नाही, तेवढे नुकसान हे लोक करत आहेत. या विचारवंतांनी ‘बहुसंख्य’ व ‘बहुजन’ अशी शोषक-शोषित विभागणी याचे उत्तम उदाहरण आहे. स्वत: राज्यकर्ते असताना भूमी उपलब्ध असूनही, मुसलमानांनी व ख्रिश्‍चनांनी देवळे का पाडली? असा प्रश्‍न ते कधीच विचारत नाहीत. विचारणारही नाहीत. हिंदूंना कट्टर, धृवीकरणी, अतिउजवे, घातक राष्ट्रवादी, फासिस्ट ठरवण्यातच यांची बुद्धी आणि बळ खर्ची पडते. इस्लामी दहशतवादाची व ख्रिस्ती विस्तारवादाची ढाल बनत आहोत हे त्यांच्या लक्षांत येत नाही. इतिहास पाहिला तर इस्लामी सत्तारूढ होतात, तेव्हा यांचेच गळे पहिल्यांदा कापले जातात. 

सोमवार, १७ नोव्हेंबर, २०२५

कुठे चाललो आहोत आपण?

साखळी येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेत काही ‘पीडित(?)’ लोकांनी ‘आम्हांला आमचे पैसे परत मिळवून द्या’, असे साकडे घातले. मुख्यमंत्र्यांनी ‘पोलिसस्थानकात पूजा नाईकच्या विरोधात पुराव्यासह तक्रार नोंदवा’, असा सल्ला दिला. वरवर पाहता ही साधी घटना वाटते, पण विचार केल्यास समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत, असा प्रश्‍न पडतो.

साखळी येथे मुख्यमंत्र्यांची भेट घेत काही लोकांनी ‘आम्हांला आमचे पैसे परत मिळवून द्या’, असे साकडे घातले. मुख्यमंत्र्यांनी ‘पोलिसस्थानकात पूजा नाईकच्या विरोधात पुराव्यासह तक्रार नोंदवा’, असा सल्ला दिला. वरवर पाहता ही साधी घटना वाटते, पण विचार केल्यास समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत, असा प्रश्‍न पडतो.

पूजा नाईक प्रकरण सर्वांना ज्ञात झाले आहे. सरकारी नोकरी हवी म्हणून अनेकांनी पूजा नाईक या महिलेस कोट्यवधी रुपये दिले. जवळपास ६१३ अर्ज होते व एकूण १७ कोटीच्या आसपास लाच घेतली व ती तिने ‘वर’पर्यंत पोहोचवली. यात नोकरीची हमी देणारे दोन अधिकारी व एक मंत्री असल्याचे पूजाचे म्हणणे आहे. पूजा नाईक ही काही एकच अशी व्यक्ती नाही, असे अनेक जण आहेत, जे पैसे घेऊन नोकरी लावतात. नोकरीतील पद, पगार, स्थान व ‘वरकमाई’ यानुसार त्या पदासाठी ‘रेट’ ठरवले जातात. दिले जातात व घेतले जातात. अपवाद म्हणून हा भ्रष्टाचार होणे स्वाभाविक आहे. ‘सरकारी नोकरीसाठी पैसे द्यावे लागतात’, हा नियम म्हणून समाजाने स्वीकारला आहे, ही घातक गोष्ट आहे. ‘पैसे दिल्याशिवाय काम होत नाही’ व तसे ते न देणारा अव्यावहारिक, मूर्ख हे आता जवळपास सर्वमान्य होत चालले आहे. ही मानसिकता स्वत:ची असते तेव्हा भ्रष्टाचाराविरुद्ध ओरडण्याची, हळहळण्याची, अमक्याने-तमक्याने ‘पैसे खाल्ले’ म्हणून तक्रार करण्याचा तरी आपल्याला काय अधिकार उरतो?

मुख्यमंत्र्यांनी ‘जनता दरबारा’त अशी मागणी करणाऱ्यांना त्याच वेळेस आत टाकायला हवे होते. पण, तसे करणे राजकीयदृष्ट्या मारक ठरले असते; म्हणून कदाचित स्वत: आयुर्वेदिक डॉक्टर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी सुंठीवाचून खोकला जावा यासाठी पोलिसांत ‘पुराव्यासह’ तक्रार करण्याचा सल्ला दिला. पुराव्यासह तक्रार करणे याचाच अर्थ आपण लाच दिल्याचा पुरावा स्वत:च पोलिसांना देण्यासारखे झाले. वर्तमानपत्रांनी बातमी देताना ‘फसवणूक झालेले’, ‘फसलेले’, ‘पीडित’ अशी विशेषणे या सरकारी नोकरीसाठी पैसे दिलेल्या लोकांना वापरली आहेत. हे भ्रष्टाचाराचे सामान्यीकरण(नॉर्मलायझेशन) आहे. एका बाजूने ‘भ्रष्टाचार, भ्रष्टाचार’ म्हणून ओरडायचे आणि दुसऱ्या बाजूने अशी विशेषणे लावत त्याचेच समर्थनही करायचे. 

सरकारी नोकरीकडे ‘गुंतवणूक’ म्हणून पाहिले जाते; केवळ नोकरी म्हणून नाही. अमुक एका पदासाठी किती पैसे देणे रास्त आहे, याचे हिशेबही लोक करतात. असे पैसे देऊन नोकरी लागली, की त्या दिलेल्या पैशांची वसुली सुरू होते. लोक जेव्हा आपले काम होत नाही, म्हणून सरकारी अधिकाऱ्यांस व प्रशासनास दोष देतात, तेव्हा ही आपणच रोवलेल्या व खतपाणी घालून वाढवलेल्या रोपाला आलेली फळे आहेत, हे लक्षांत घेत नाहीत. पैसे दिल्याशिवाय काम होत नाही, ही मानसिकताच नष्ट झाली पाहिजे. काम करण्यासाठी ‘टेबलावरून’ घेतलेला मोबदला म्हणजे पगार आणि तेच काम करण्यासाठी ‘टेबलाखालून’ घेतलेला मोबदला म्हणजे लाच, हे रूढ झाले आहे. ते स्वीकारायचे का, आणि कुठवर हे एकदा ठरवावे लागेल. ती दिशा देण्याचे काम करणारी वर्तमानपत्रे लाच देणाऱ्या लोकांस ‘शोषित’ ठरवू लागली आहेत, हेच दुर्दैव आहे.

वास्तविक, सामान्य लोक, एजंट, अधिकारी, राजकारणी, वृत्तपत्र माध्यमे यांना भ्रष्टाचार झालेलाच हवा. कुणालाही तो संपावा असे वाटत नाही. म्हणूनच तो संपवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी त्यातून आपली राजकीय, सामाजिक, वैयक्तिक ‘सेटलमेंट’ करण्याकडे सर्वांचे लक्ष आहे. त्यामुळे, भ्रष्टाचाराचे दुष्टचक्र कधी थांबतच नाही; त्यावर अनेकांचे रथ चालतात. भ्रष्टाचार कायम राहतो, फक्त माणसे आणि नावे बदलतात.  एवढेच कशाला, काळाच्या ओघात भ्रष्टाचाराची व्याख्याही आम्ही लोकांनी बदलून टाकली आहे. 

पैसे घेऊन काम करणे हा ‘शिष्टाचार’; तर पैसे घेऊनही काम न करणे हा  ‘भ्रष्टाचार’ अशी व्याख्या रुजली आहे. 




सोमवार, १० नोव्हेंबर, २०२५

‘बारामुल्ला’ आणि कवडीचेही मोल नसलेले हिंदू

‘बारामुल्ला’ आणि कवडीचेही मोल नसलेले हिंदू
‘बारामुल्ला’ हा चित्रपट ‘नेटफ्लिक्स’वर पाहिला. नेटफ्लिक्सवर चित्रपट पाहणे म्हणजे हल्ली भीतीच वाटते. पक्वान्न म्हणून जाहिरात केलेली असली तरी पुरोगाम्यांचे ‘वोक’लेले पाहण्याची पाळी येते. त्यामुळे, ‘बारामुल्ला’ हा हॉरर नसलेला चित्रपट भीत भीत पाहिला. सुदैवाने पुरोगामी व्होकिझम नव्हता. 

चित्रपट आपण ‘हॉरर’ या सदरात रूढार्थाने खरे तर येत नाही. हा सुपरनॅचरल थ्रिलर चित्रपट आहे. यातले कथानक सांगणे म्हणजे त्यातले थ्रिल घालवणे. बारामुल्ला येथे अपहृत मुलांचे प्रकरण सोडवण्यासाठी आलेला पोलीस उपअधीक्षक रिदवान सय्यद एका घरात राहतो. सोबत पत्नी गुलनार, मुलगी नूरी आणि मुलगा अयान. मुलांचे अपहरण नेमके कोण करते, ती अचानक गायब कशी होतात, कशा पद्धतीने दहशतवाद आपली पाळेमुळे फार पूर्वीपासून फैलावत आलाय ही बाब आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विश्‍वासघाताची न भरलेली जखम, आपल्याला अस्वस्थ करते. हळूहळू उलगडत जाणारा हा सिनेमा खूप काही गोष्टी सांगून जातो. अक्षरश: मनावर बिंबवत जातो. त्यात कवड्या खेळण्याचा एक संदर्भ आहे, ज्याचे एक टोक अगदी शेवटच्या सीनमध्ये उलगडते. तिथे संवाद नाहीत, फक्त कॅमेरा बोलतो. चित्रपटाचा शेवट नावाच्या पाटीवर येऊन कॅमेरा स्थिरावल्यावर होतो आणि ब्लॅक आउट होऊन दिग्दर्शकाचे नाव झळकते. चित्रपट हे कॅमेऱ्याला बोलते करणाऱ्या दिग्दर्शकाचे माध्यम आहे, हे आदित्य सुहास जांभळे यांनी सार्थ करून दाखवले आहे! 

चित्रपटातील प्रत्येकाच्या भूमिका छान झाल्या आहेत. पटकथा बंदिस्त आहे. काही नगण्य चुका आहेत, त्या सांगू गेल्यास रहस्योद्घाटन करावे लागेल. हा चित्रपट जाणिवेने बघण्याचा चित्रपट आहे, तो तसाच सर्वांनी पाहावा. कथा, पटकथा, प्रसंग, संदर्भ सगळे काही बारकाईने पाहणे अत्यावश्यक आहे; खास करून ते फूल, केस कापणे आणि कवड्या खेळणे!

वपुंच्या ‘बदली’ या कथेतला जनार्दन एकबोटे दामलेंना म्हणतो, ‘जिवंतपणी माणसावर जे संस्कार झालेले असतात, ते मेल्यावरसुद्धा माणसाची पाठ सोडत नाहीत!’ पण, केवळ संस्कारच नव्हे तर झालेले आघात, विश्‍वासघात आणि अन्यायही आपली पाठ सोडत नाहीत. 

‘खूप कालावधी लोटला’, या सबबीखाली साधी सुनावणीही नाकारणाऱ्या व ‘इथे जा, तिथे जा’ सांगणाऱ्या सर्वोच्च  न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाने हा चित्रपट पाहावा. स्वत:ला न्यायाधीश म्हणवून घेणाऱ्या प्रत्येक निर्लज्ज व्यक्तीने तो पाहावा. काश्मीरमध्ये हिंदूंच्या नरसंहाराचे जे जिवंत साक्षीदार आहेत, त्यांच्या निदान साक्षी तरी नोंदवून घ्या. अन्यथा स्वत:स न्यायाधीश म्हणवून घेणे तरी बंद करा. त्यावेळेस भारतभर इतरत्र कवड्या खेळत बसलेल्या समस्त हिंदूंनी आवाज उठवला असता तर कदाचित न्याय झाला असता. 

गळ्यात कवड्यांची माळ घालून बेल-भंडारा उधळत वेळ राहताच अन्यायाचे परिमार्जन केल्यासच ते होते. वेळ निघून गेली, की त्यास कवडीइतकेही मोल राहत नाही.  राहिल्या तर राहतील फक्त कथा, पटकथा, चित्रपट आणि वाट बघणे; कुणी तरी कुठल्या तरी डॉ. सप्रूला खेळातल्या कवड्या पोहोचवेल याची! 


बुधवार, २७ ऑगस्ट, २०२५

संस्कृतीची नाळ या मातीशी घट्ट जोडून ठेवणारा गणांचा अधिपती

काळाच्या ओघात मूर्ती नष्ट होतात; पण त्या मूर्ती ज्या विचारातून निर्मिलेल्या असतात, तो विचार मंत्रांतून, मौखिक साहित्यातून तसाच राहतो. हा विचार पुन्हा मूर्ती घडवायला, तसे नेतृत्व घडवायला प्रेरणा देत राहतो.
श्रावणातला ऊनपावसाचा खेळ आवरता घेत सृष्टी नवसृजनाने सजते. तिची शुभ, मंगल आणि कल्याणकारक पावले जीवनाचे रहाटगाडगे सुरू ठेवण्याची प्रेरणा देतात. निर्मितीपासून विलयापर्यंतचा हाच सृजनोत्सव आपण दरवर्षी साजरा करतो, ज्याला गणेशचतुर्थी म्हटले जाते! हा सण व हा देव सर्व अबालवृद्धांना अत्यंत आवडतो.  दरवर्षी मातीचा गणपती तयार करण्यापासून ते त्याचे वाहत्या पाण्यात विसर्जन करण्यापर्यंत हा सण अक्षरश: साजरा केला जातो. गणेश हे भारतातले सर्वांत लोकप्रिय दैवत. तो गणांचा ईश (देव) म्हणून गणेश आहे. तो गणांचा अधिपती असल्याने गणपती म्हणून ओळखला जातो. ज्याचा याच अर्थाने उल्लेख ऋग्वेदाच्या दुसऱ्या मंडलातील तेविसाव्या सुक्ताच्या पहिल्या मंत्रात येतो

ग॒णानां॑ त्वा ग॒णप॑तिं हवामहे क॒विं क॑वी॒नामु॑प॒मश्र॑वस्तमम्। 
ज्ये॒ष्ठ॒राजं॒ ब्रह्म॑णां ब्रह्मणस्पत॒ आ नः॑ शृ॒ण्वन्नू॒तिभिः॑ सीद॒ साद॑नम्॥

व ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील एकशेबाराव्या सुक्ताच्या नवव्या मंत्रातही 

नि षु सी॑द गणपते ग॒णेषु॒ त्वामा॑हु॒र्विप्र॑तमं कवी॒नाम् । 
न ऋ॒ते त्वत्क्रि॑यते॒ किं च॒नारे म॒हाम॒र्कं म॑घवञ्चि॒त्रम॑र्च ॥

असा उल्लेख येतो. 

काळाच्या ओघात मूर्ती नष्ट होतात; पण त्या मूर्ती ज्या विचारातून निर्मिलेल्या असतात, तो विचार मंत्रांतून, मौखिक साहित्यातून तसाच राहतो. हा विचार पुन्हा मूर्ती घडवायला, तसे नेतृत्व घडवायला प्रेरणा देत राहतो. 

गणपती सर्व संकटे, विघ्ने, अडथळे आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर दूर करतो. हा गणपती गजानन (गज - हत्ती व आनन - तोंड = हत्तीचे तोंड असलेला) कसा झाला, याच्या अनेक कथा शिवपुराण, भविष्यपुराण, स्कंदपुराण अशा अनेक पुराणांमध्ये येतात. वानगीदाखल तिथे आलेल्या तपशिलात शिरायचे नसते; त्यात असलेले तप आणि शील पाहायचे असते. तत्त्वांना प्रतीकात्मक रूपात रंजक पद्धतीने मांडणे म्हणजे पुराण. प्रतीकांतून पुराणकथा नेमके काय सांगू पाहते, याचा विचार होणे गरजेचे आहे. समुद्रमंथनाची कथा कार्यकर्ता कसा असावा, हे सांगते तर गणेशजन्माची कथा नेता कसा असावा, हे सांगते!

अमृत प्राशन करतात ते देव आणि हलाहल विष प्राशन करतो तो महादेव. एरव्ही कापरासारख्या गोऱ्या असलेल्या महादेवास आपण संपूर्ण निळा रंगवतो; वास्तविक त्याचा कंठ फक्त निळा आहे. समाजात वावरताना कार्यकर्त्याला अनेक मंथनांना सामोरे जावे लागते. त्यातून निर्माण झालेले हलाहल प्राशन करणे क्रमप्राप्त असते. ते पोटात गेले तर आपला जीव जातो आणि बाहेर ओकले तर समाज नष्ट होतो. म्हणून त्या नीलकंठाप्रमाणे ते गळ्यातच ठेवावे लागते. कार्यकर्ता असावा तर तो महादेवासारखा आणि नेता असावा तर त्याच्याच मुलासारखा म्हणजे गणपतीसारखा!

चतुर्थीच्या दिवशी माता पार्वतीने स्नानासाठी जात असताना आपल्या अंगावरील मळापासून एक लहानशा मुलाची मूर्ती तयार करून, त्यात प्राण टाकले होते. मग देवी पार्वती आपले स्नान होईपर्यंत आपल्या कक्षाबाहेर पहारा देण्यास या लहान मुलाला सांगते आणि कोणालाही आत प्रवेश न देण्याची सूचना देते. हा मुलगा कक्षाबाहेर पहारा देत असतो त्याच वेळी देवी पार्वतीला भेटण्यासाठी महादेव तिथे येतात. लहान मुलगा महादेवांना माता पार्वतीच्या कक्षात प्रवेश करण्यास मनाई करतो. महादेवदेखील ते मान्य करीत नाहीत आणि हा लहान मुलगाही मागे हटत नाही. त्यामुळे महादेवांना राग अनावर होतो आणि दोघांमधील वाद टोकाला जातो. मग शंकर आपल्या त्रिशूळाने त्या मुलाचे शिर धडापासून वेगळे करतता. तोपर्यंत माता पार्वती स्नान आटोपून बाहेर येते आणि आपल्या मुलाची अशी अवस्था पाहून अत्यंत दुःखी व संतप्त होते. आपल्या मुलाला पुन्हा जिवंत करण्याचा हट्ट ती भगवान शंकराकडे धरते. त्यावेळी भगवान शंकर त्याच्या देवतांना उत्तर दिशेला सर्वांत पहिल्यांदा ज्या प्राण्याचे डोके दिसेल ते आणण्यास सांगतात. त्यानुसार देवतांना हत्तीचे डोके सापडते. अखेर भगवान शंकर ते हत्तीचे डोके त्या लहान मुलाच्या धडाला जोडतात आणि श्रीगणेशाचा जन्म होतो, अशी ही कथा आहे.

निर्मिती, विनाश आणि पुन्हा नवनिर्मितीची ही प्रतीकात्मक कथा आहे. गणेशाचा जन्म शिव आणि शक्ती या दोन तत्त्वांतून झाला आहे. तो बुद्धिमत्ता आणि चैतन्याचे प्रतीक आहे. अगदी, गजमुख असले तरी तो हत्तींचा अधिपती नाही, गणांचा अधिपती म्हणजेच नेता आहे. हत्तीचेच तोंड का बरे या कथेत निवडले असावे? हा प्रश्न आपल्याला त्या प्रतीकामागील विचाराकडे घेऊन जातो. या गजमुखामध्येच नेता कसा असावा, याचे सारे सार दडले आहे. तोंडावळ्यास पाहता गजमुखाचे डोळे खूपच लहान आहेत. नेत्याची दृष्टी बारीक व दृष्टिकोन सूक्ष्म असायला हवा. या शूर्पकर्णाचे कान सुपासारखे आहेत. नेत्याने प्रत्येकाचे म्हणणे ऐकावे व निवडून योग्य असेल ते आत घ्यावे. हत्तीला परिसराचा सुगावा सोंडेमुळे लागतो. सुईसारखी लहानातली लहान व ओंडक्यासारखी मोठ्यातली मोठी गोष्ट उचलण्याचे सामर्थ्य त्या सोंडेत असते. हे दोनही गुण नेत्यात असाव्या लागतात. हे सर्व सांभाळणारी, समतोल साधणारी कुशाग्र, प्रवाही बुद्धिमत्ता हे गणपतीचे वैशिष्ट्य आहे. बुद्धी, संतुलन आणि स्पष्टता यांचे जतन करून परिवर्तन घडवणे हे नेत्याचे काम आहे. 

बुद्धिमत्ता म्हणजे माहितीवर प्रक्रिया करून तिचा संचय करण्याचे सामर्थ्य नव्हे. अस्तित्वाशी सुसंगत राहण्याची, प्रतिकार न करता प्रवाहित होण्याची, अडथळ्यांना संधीमध्ये रूपांतरित करण्याची आणि मर्यादांच्या पलीकडे विस्तारत जाण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता! म्हणूनच अडथळे दूर करणारी, समरसतेने सर्वांना एकत्र आणणारी व जीवनात संतुलन जपणारी बुद्धिमत्ता जोपासणे आवश्यक आहे. अशी बुद्धिमत्ता असलेल्या नेतृत्वाला जपणे गरजेचे आहे. 

खरी बुद्धिमत्ता कधीही निष्ठूर, एककल्ली व एकाच जागी साचलेली नसते. ती प्रवाही आणि अबाधित असते. शुद्ध चैतन्याचे प्रकट रूप असलेली हीच बुद्धिमत्ता ऋषींनी निसर्गाशी प्रामाणिक असलेल्या कृषी संस्कृतीत रुजवली. निसर्गचक्राशी जुळणारी व्यवस्था मानवी जीवनाशी जोडली. भावनेशी, उपासनेशी जोडली. म्हणूनच गणेशचतुर्थीसारखे सगळे सण निसर्गचक्राशी बांधलेले आहेत. त्याचबरोबर ते शुद्ध चैतन्याच्या प्रवाही असण्याच्या विचाराशीही ऋषींनी जोडले. मूर्ती तयार करण्याची आणि नंतर विसर्जित करण्याची पद्धत ही अस्तित्वाच्या प्रवाही स्वरूपाची ओळख पटवण्याचा एक सांस्कृतिक मार्ग आहे. हा मार्ग वेदकाळापासून ऋषी व कृषी संस्कृतींचा संगम आहे. मूर्त प्रतीकांपलीकडे जात त्यांचे गुण आत्मसात करणे म्हणजे गणेश चतुर्थी; हा साकारातून निराकाराकडे जाण्याचा, जड (मॅटर) हे शुद्ध चैतन्याचेच (प्युअर कॉन्शिअसनेस) रूप आहे हे ओळखण्याचा उत्सव आहे! 

ही गणेशचतुर्थी आम्हा सर्वांमध्ये असलेल्या शुद्ध चैतन्यास ओळखण्याचे सामर्थ्य आम्हांला देवो. संस्कार, संकेत आणि संस्कृती यांची नाळ या मातीशी घट्ट जोडून ठेवणारे गणांचे अधिपती आम्हांस लाभो!

सोमवार, ४ ऑगस्ट, २०२५

कदाचित आवडणार नाही, तरीही...

कदाचित आवडणार नाही, तरीही...

आपली बाजू खरी, सत्याची असूनही एखाद्या परिस्थितीत कसे व्यक्त व्हावे याची अजिबात जाण नसल्यामुळे हिंदू संघटना अक्षरश: मार खातात. कृतीतून ‘आपण कसं ऐकवलंय माहितीये!’, या वृथाभिमानापलीकडे काहीच ठोस घडत नाही. कुठल्याही प्रकरणात विनाकारण आक्रमक होण्याची पद्धत नेहमीच बरोबर असते, असे नाही. अनेक प्रकरणे वेगळ्या पद्धतीने हाताळणे गरजेचे असते. त्यासाठी काही मूलभूत गोष्टींचे भान, अभ्यास असावाच लागतो.

दुसरी महत्त्वाची बाब जी ठळकपणे लक्षांत ठेवली पाहिजे, ती म्हणजे भारतात ख्रिस्तीकरण आणि इस्लामीकरण (कन्व्हर्जन) घटनात्मक आणि कायदेशीर आहे. भारतात कन्व्हर्जन हा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे, त्याविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊच शकत नाही. आता, जो सांगितला जातो तो ‘फसवणूक करून किंवा फोर्स्ड कन्व्हर्जन केल्यास’ अटक व शिक्षेचा प्रकार. फसवणुकीचा गुन्हा नोंद होतो, कन्व्हर्जन केल्याचा नाही! 'आपल्यावर ख्रिस्ती होण्याची जबरदस्ती केली नव्हती', अशी साक्ष आली की फोर्स्ड कन्व्हर्जनचे कलम गळून पडते. सगळ्यात मोठी मेख आहे ती, ‘सगळे पंथ एकच आहेत’ या विचारावर बेतलेल्या घटनात्मक तरतुदीत व त्यानुसार असलेल्या कायद्यांमध्ये. समता, समानता या नावाखाली गायीचा गवत खाण्याचा व वाघाचा गाय खाण्याचा अधिकार त्यांना एकाच ठिकाणी ठेवून मान्य करण्यासारखा प्रकार कलम २५(१)मुळे घडला आहे.

दोन केरळी नननी छत्तीसगडमध्ये जाऊन ख्रिस्तपंथाचा प्रचार केला, दुर्गम भागात ‘सेवा कार्य’ केले. ते ख्रिस्तीकरणच आहे, याबद्दल दुमत नाही. पण, जेव्हा त्याला मानवी तस्करीशी जोडून गुन्हा दाखल केला जातो तेव्हा ते कायदेशीरदृष्ट्या सिद्ध होईल का, हे पाहिलेच जात नाही. त्या महिलांना काम देण्यासाठी नेणे आणि मानवी तस्करी यात बराच फरक आहे. मग, ज्योती शर्मा यांनी अकांडतांडव केले ते कशासाठी? त्या ननना फैलावर घेऊन काय मिळवले? त्यांना तेच सांगितले जे त्यांना माहीत होते. उलट परिणाम असा झाला, की बजरंग दल चुकीचे ठरले आणि ख्रिस्तीकरण करणार्‍या नन सेवाकार्यासाठी समर्पित व निष्पाप ठरल्या! नीट अभ्यास करून, पुरावे गोळा करायला लावून किंवा पोलिसांना देऊन केस केली असती, तर ते जास्त प्रभावी ठरले असते.

ख्रिश्‍चन मिशनरि ख्रिस्तीकरण करतात यात दुमतच नाही. पण, त्यांची कार्य करण्याची पद्धत पूर्णपणे अभ्यासून त्याविरुद्ध वेगळी पद्धत उभी करणे गरजेचे आहे. ती केल्यानंतरही लोक ख्रिस्ती होतच राहणार आहेत. त्यामुळे, ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यासाठी अंत:प्रवाह (अन्डर करन्ट) असणे गरजेचे आहे. गिरिश कुबेरांसारखा संपादक राजीनामा देऊन घरी बसला असता, तर त्याचे फारसे वैयक्तिक नुकसान झाले नसते. पण, त्याने बिनशर्त माफी मागून संपूर्णच्या संपूर्ण अग्रलेख दुसर्‍याच दिवशी मागे घेण्याचा दळभद्रीपणा केला. कुणीही ख्रिश्‍चन माणूस किंवा ख्रिस्ती संस्था यांनी अवाक्षरही काढले नव्हते. पण, असे काय घडले की, कुबेरासारख्या संपादकाला व ‘लोकसत्ता’ला संपूर्ण अग्रलेख मागे घ्यावा लागला? त्यालाच ‘अंडरकरन्ट’ म्हणतात. तिथे हिंदू संघटनांसारखी बोंबाबोंब करावी लागत नाही. जिथे चावी फिरवायची तिथेच फिरवली की ‘निर्भीड’ कुलुपे आवाज न करता उघडतात.

जिथे इस्लाम अजूनही ‘सर तन से जुदा’ वगैरे असल्या भीती घालून कन्व्हर्जन करतो, तिथे ख्रिश्‍चनिटी लोकशाहीचा वापर करते. ‘लोकशाही’ हे कन्व्हर्जनचे आधुनिक हत्यार आहे. संस्कृतीत असलेली सर्वसमावेशकता व सहअस्तित्व या गुणांचा आणि लोकशाहीत असलेली ‘समता-समानता’ ही तत्त्वे यांचा योग्य वापर कन्व्हर्जनसाठी केला जातो. इतके सगळे करूनही आपण त्या गावचेच नसल्याचा कांगावा केला जातो. कदाचित आवडणार नाही, तरीही हिंदू संघटना बोंबाबोंब जास्त करतात; नेमका उपाय कमी प्रमाणात योजला जातो.

बुधवार, ९ जुलै, २०२५

अहो, उठा...!

अहो, उठा...!

‘अहो उठा!’ हे दोन शब्द लग्न झाल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या सुरात कानावर पडतात. स्वत:च्या पाकळीवर पडलेले चांदण्याचे ओझेही सहन न झालेल्या गुलाबाने केलेले लडिवाळ आर्जव ते सुरकुतलेल्या चेहऱ्यावर झिजलेले हात ठेवत वात्सल्याने ओथंबलेले मार्दव, इतका मोठा या दोन शब्दांचा प्रवास असतो. 

बायकोने झोपेतून प्रेमाने जागे करण्याचे क्षण वीस पंचवीस वर्षांनंतर तसे कमीच येतात. पण, आज तो क्षण आला. अगदी संसाराच्या पहिल्या पहाटेत मला घेऊन गेला. तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. ‘अहो, उठा! खिडकीत पाहा. तुमच्यासाठी सरप्राइज आहे’. येऊन पाहतो, चार पाच गुलाबी फुले उमलली होती. त्यांना काय म्हणतात तेही माहीत नाही, पण हिच्या चेहऱ्यावर तो आनंद पाहूनच आनंदलो. संसारात सुखाचे हे असे छोटे छोटे क्षणच स्त्रीसाठी खूप महत्त्वाचे असतात. तिच्या खूप मोठ्या अपेक्षा नसतात. आपल्या छोट्या छोट्या आनंदात, आपल्या जाणिवांत नवऱ्याची जाणीव असावी, ती मिसळावी असेच वाटत असते. सुखाच्या या लहान लहान क्षणांना गोळा करतच दु:खाचे डोंगर पार करायचे असतात. 

‘स्त्रीला नेमके काय हवे असते?’ या गहन प्रश्‍नाचे उत्तर कदाचित सापडणारही नाही. ते शोधूही नये. लग्न झाल्यानंतरच्या नव्यानवेल्या दिवसांत, ‘आपलं किती प्रेम आहे’ हे दाखवायची हौस असते. प्रत्येक गोष्टीत ते दाखवायचा अट्टहास असतो. पंधरा वीस वर्षे गेल्यानंतर लक्षांत येते की, तिला ते दाखवून दिलेले नको असते; तिला ते दिसायला हवे असते. संसार हा असाच उणिवांना, जाणिवांना शिकत जाण्याचा, त्यावर भाळण्याचा आणि सांभाळण्याचा प्रवास आहे. अगदी आंग्लाळलेल्या विचारांनी सांगायचे तर आपली ‘बॅचलर्स’ पदवी हरवूनही आपण ‘मास्टर’ न होण्याचा खटाटोप आहे. 

तिचा आनंद कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह काही केल्या आवरता आला नाही. हाच फोटो आणखी काही वर्षांनी पाहेन तेव्हा हीच सकाळ जशीच्या तशी आठवेल. आजचा तिचा आनंद तेव्हाही माझ्या मनात, चेहऱ्यावर ओसंडून वाहेल. ती फुले नसतील कदाचित, ते क्षण तसेच असतील आणि हिचं ते ‘अहो उठा!’ म्हणणेही...





सोमवार, ९ जून, २०२५

‘व्हीयापी कल्चर’ म्हणजे नेमके काय?

‘व्हीयापी कल्चर’ म्हणजे नेमके काय?

सहज भरता आली असती, अशा जखमेचे आता गँगरीन झाले आहे. आरोग्यमंत्री आणि डॉक्टर या दोघांनीही याला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवले आहे.  वास्तविक दोघांनीही सेवेत, व्यवस्थेत सुधारणा घडवण्याकडे लक्ष दिले पाहिजे. सुट्टीच्या दिवशी, रविवारी प्राथमिक आरोग्य केंद्रे, ओपीडी बंद असते तेव्हा नियमित उपचार घेण्याची व्यवस्था कुठे करावी? अशा उपलब्ध असलेल्या सेवेची माहिती कशी द्यावी, याकडे लक्ष देणे जास्त आवश्यक आहे. अन्यथा अशीच स्थिती उद्भवल्यास काय करावे, याचे उत्तर कुणाचकडे नसेल.

आता ‘व्हीआयपी कल्चर’ बंद करा अशी मागणी डॉक्टर करत आहेत. पण, जीएमसीमध्ये ओळख असल्याशिवाय तातडीने काम होत नाही, लक्ष दिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. ओपीडीसमोर रुग्ण रांगेत उभे असताना थेट ‘आत’ घेऊन जाणार्‍यांना किती डॉक्टर जाब विचारतात? अडलेला, अडवलेला माणूस कुठून तरी ओळख काढून आपले काम करून घेतो, हाही नेहमीचा अनुभव आहे. 

जोडरस्त्यावरून मुख्य रस्त्यावर वाहन घेताना किंवा थांबलेल्या वाहतुकीत वाहन सर्वांत पुढे नेण्यासाठी जी घाई काही वाहनचालक करतात, ती पुढे मार्गक्रमण करताना किंवा वाहतूक सुरळीत झाल्यावर दिसत नाही. पुढे घाई करणारा वाहन सावकाशच हाकत असतो. अनेकदा नेमका हाच प्रकार ओपीडीबाहेर घडतो. रुग्ण आणि त्याच्यासोबत असलेली व्यक्ती घाई करते, पुढे पुढे जाते आणि तपासून घेऊन बाहेर येते. जरा पुढे गेल्यावर सोबतची व्यक्ती एक वाक्य बोलते, ‘पळयले मरे, फुडे सल्लो म्हणोन बेग्यान जालें. लायनीन, फाटी रावल्लो जाल्यार दनपार जावपाची आमकां’. याच वृत्तीची माणसे खासगी रुग्णालयात जातात तेव्हा तिथल्या बाकड्यांवर शांत बसलेली असतात. जेव्हा सिस्टर किंवा मदतनीस नाव पुकारतात तेव्हाच डॉक्टरच्या कॅबिनमध्ये जातात. 

असे अनेक पत्रकार, कार्यकर्ते आहेत, ज्यांनी स्वत:ची ओळख वापरून रात्रीच्या दोन तीन वाजता अनेक रुग्णांना मदत केली आहे. मग ते त्यांचे नातलग असतील किंवा नसतील. ओळख वापरणे हा एक भाग झाला, कसलीही ओळख नसताना केवळ माणुसकी म्हणून अपरात्री; एक्स रे काढायला, सिटिस्कॅन करायला रुग्णासोबत त्याला घेऊन जाणारे, रात्रभर थांबणारे पत्रकार, कार्यकर्ते पाहिले आहेत. त्यांना कुणीही कसलेही पदक देत नाही, नंतर ओळखही दाखवीत नाहीत. उलट, ‘तेका खाजा असा रे हें नाका जाल्लें करपाची’ ही स्तुती ऐकायला मिळते. प्रश्न इथे मदत करतात किंवा वजन वापरतात त्याचा नाही; असे करावे लागते याचा आहे. ‘फावोर लावचो पड्टा’ ही स्थिती आणि मानसिकता खरे तर बंद झाली पाहिजे. 

फारशी आवश्यकता नसताना, केवळ मोठेपणा, रुबाब दाखवण्यासाठी केलेला व खपवून घेतलेला गैरवापर म्हणजे ‘व्हीआयपी कल्चर’.  सर्वांसाठी असलेल्या नियमांना काहींसाठी वाकवणे म्हणजे ‘व्हीआयपी कल्चर’. किती डॉक्टरांनी, अधिकार्‍यांनी, कर्मचार्‍यांनी त्याला प्रत्यक्षात विरोध केला आहे? प्रश्न नोकरीचा असतो, तेव्हा अपवाद म्हणून का होईना, पण हे खपवून घेतले जाते.

रुग्णसेवा, शिस्तपालन यासाठी खासगी रुग्णालयात मनुष्यबळ वापरले जाते, तसे सार्वजनिक रुग्णालायत वापरले जात नाही. त्यासाठी प्रत्यक्षात प्रयत्न झाले पाहिजेत. सार्वजनिक सेवेबद्दल बहुतांश लोकांची मानसिकता गैरवापर, ओरबाडणे, वाट्टेल तसे वापरणे अशी असते. कमी पैशात किंवा किंमत न मोजता मिळालेल्या सेवेचे मूल्य राहत नाही, देणार्‍याला व घेणार्‍यालाही! 

चित्रस्रोत : आंतर्जाल

रविवार, ८ जून, २०२५

आरोग्यमंत्री, सीएमओ व समस्या

आरोग्यमंत्री, सीएमओ व समस्या

सीएमओ डॉक्टरांचे चुकले की, आरोग्यमंत्र्यांचे चुकले यावर दोन्ही बाजूंनी बोलले जाते. कारण त्या घटनेकडे पाहण्याचा प्रत्येकाचा पूर्वग्रह, अनुभव व दृष्टिकोन असतो. पण, त्यामुळे मूळ समस्या जशीच्या तशीच राहते. त्यावर विचार होणे गरजेचे आहे. 

डॉक्टरांची बाजू प्रत्यक्ष त्यांच्याकडून बहुधा समोर आली नाही किंवा त्यांनी ती मांडली नसावी. जे काही समोर येतेय ते एकांगी येत आहे. आता तो ‘तपासाचा भाग’ म्हणून त्यावर तिथे काम करणारे बोलणार नाहीत. इंजेक्शन घेण्यासाठी आलेल्या त्या महिलेशी डॉक्टर उद्धटपणेच बोलले हे आरोग्यमंत्र्यांनी पूर्णपणे गृहीत धरले व डॉक्टरांना निलंबित करून मोकळे झाले. त्यांची बाजूही त्यांनी विचारली नाही. ती जर त्यांनी प्रोटोकोलप्रमाणे चौकशीत मांडायची तर मग निलंबनही प्रोटोकॉलप्रमाणे झाले पाहिजे होते. 

आरोग्यमंत्र्यांनी आपण ज्या पद्धतीने बोललो ते चुकीचे होते, असे स्पष्टीकरण दिले आहे. रागाच्या भरात असे होणेही स्वाभाविक आहे. ते चुकीचे नाही. पण, ज्या पद्धतीने हे घडले, तेही चुकीचेच आहे. कारवाई ज्या पद्धतीने झाली ती पद्धत योग्य म्हणायची झाल्यास अर्ध्यापेक्षा जास्त जीएमसी रिकामी होईल. प्रत्येक दिवशी कुठल्याही ओपीडीच्या बाहेर सेक्युरिटी गार्ड ज्या तर्‍हेने रुग्णांवर, त्यांच्या नातेवाइकांवर ओरडतात, ते पाहता त्यांच्यावर अशा पद्धतीने कारवाई आरोग्यमंत्र्यांनी केली तर कुणीच तिथे उरणार नाही. पण, ते दारावर उभे असलेले तसे का वागतात, याचाही विचार होणे आवश्यक आहे. रुग्ण, त्यांचे नातेवाईक जी गर्दी करतात, पुढे पुढे जाऊन हुज्जत घालतात, बेशिस्त वागतात, त्याचे काय करायचे? ओरडणे दिसते, पण अनेकवेळा सांगूनही अन्य पर्यायच उरत नाही तेव्हा काय?

कुठली सेवा कुठे दिली जावी, याचे काही ठरावीक ठोकताळे आहेत. कॅज्युअलिटीमध्ये जीवनमरणाचा प्रश्न असतो तेव्हा सेवा दिली जाते. तेच अपेक्षितही आहे. एखाद्या रुग्णाला या विभागात तातडीने सेवा द्यायची की, नाही हे डॉक्टरांनी ठरवायचे आहे. नियमित औषधोपचार घेणारा एखादा रुग्ण आला तर त्याला सेवा द्यायची की नाही? नियमाप्रमाणे नाही. पण, वृद्ध महिलेस इंजेक्शन दिले असते तर असे अनेक रुग्ण ‘तेका दिलें म्हाका कशें ना?’, असे विचारत घुसू लागतील. प्रोटोकॉलप्रमाणे कॅज्युअलिटीमध्ये व्हिडिओ शूटिंगही करता येत नाही. तसे तिथे लिहूनही लावलेले आहे. तरीही आरोग्यमंत्र्यांनी ते होऊ दिले व व्हायरलही होऊ दिले. आता एखादा पत्रकार कुणी तिथे जाऊन व्हिडिओ शूटिंग करू लागला व सेक्युरिटीने अडवले; तर ‘आरोग्यमंत्र्यांचे व्हिडिओ शूटिंग चालते, आमचे चालत नाही?’, असे त्याने विचारले तर? 

आता खरी भीती व्यक्त करतो. समजा आता कुठल्याही वृद्ध रुग्णास त्रास झाला, डॉक्टर त्याच्यावर रागावले किंवा त्याला इतरत्र जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला, तर तो थेट आरोग्यमंत्र्यांना कळवेल. थेट निलंबन. आरोग्यमंत्र्यांची ओळख असण्याची भीती घालून रुग्णही गैरफायदा घेऊ लागतील, त्याचे काय? प्रश्न राहतो तो डॉक्टर उद्धटपणे बोलले, वागले की नाही याचा! त्या वृद्ध महिलेच्या व्हिडिओत डॉक्टर उद्धटपणे वागल्याचा, बोलल्याचा उल्लेख नाही. ‘उद्धटपणे बोलल्याने, वागल्याने निलंबन’ हाच निकष असेल तर तो आरोग्यमंत्र्यांना लागू होत नाही का? डॉक्टर चुकले, आरोग्यमंत्री चुकले की, त्या रुग्ण महिलेचे थेट आरोग्यमंत्र्यांशीच संपर्क साधणे चुकले, यापेक्षाही माणसासाठी असलेले नियम पाळताना, त्यावर व्यक्त होताना समतोल व संयम पाळला जात नाही, हे महत्त्वाचे आहे.  


प्रत्येक व्यवस्थेचे काही नियम असतात. ते नियम कशा पद्धतीने वापरले जातात व त्याला काय, कुठे व कसे अपवाद मान्य आहेत आणि जेव्हा त्या व्यवस्थेचा थेट संबंध दररोज, दर क्षणी माणसांशी येतो तेव्हा त्या नियमांचे काय करायचे यावर विचार झाला पाहिजे. खरी समस्या इथे आहे. त्याकडे तटस्थपणे पाहणे आवश्यक आहे. प्रत्येक घटना सुटी सुटी व स्वतंत्रपणे अभ्यासली गेली पाहिजे. 



सोमवार, ३ मार्च, २०२५

झुंडशाही, गळे कापणे आणि अंत:प्रवाह (अंडरकरंट)


झुंडशाही आणि गळे कापणे या दोन्ही गोष्टी निंदनीयच. त्यांचे समर्थन कुठल्याही पद्धतीने करणे शक्यच नाही. माझाही तसा हेतू अजिबात नाही. पण, जे दिसते ते समोर ठेवणे क्रमप्राप्त आहे.

एखाद्याचा विचार पटला नाही की आक्रमक होऊन जाब विचारणे ही झुंडशाही. असा आक्रस्ताळेपणा न करता केली जाणारी कृती म्हणजे गळे कापणे. झुंडशाही केल्याने ज्याच्यामुळे ही झुंडशाही केली जाते त्याला सहानुभूती मिळते. उदाहरण : बजरंग दल आणि उदय भेंब्रे. इथे विचारांचा प्रतिवाद विचारांनी करावा, अशी भूमिका घेतली जाते. रात्री जाब विचारायले गेले म्हणून चुकीचे ठरतात. सहानुभूती भेंब्रेंना मिळते. हेच तुम्ही काही वर्षांपूर्वी म्हणाला होतात व ते सचिन मदगे यांनी सप्रमाण खोडून काढले होते, मग पुन्हा का तेच म्हणालात, असे कुणीही भ्रेंब्रेंना विचारत नाही. चुकीचे सिद्ध करूनही तुम्ही वारंवार तेच का रेटत आहात, असेही कुणी विचारत नाही. मागे घेतलेले ‘ब्रह्मास्त्र’ आता पुन्हा बाहेर काढण्यावर कुणी शंकाही घेत नाही.  

गळे कापल्याने ज्याच्यामुळे गळे कापले गेले तो दोषी धरला जातो, कापणारा नाही. उदाहरण : कन्हय्यालाल शिंप्याचा गळा कापला तेव्हा न्यायाधीश म्हणाले यासाठी नुपूर शर्मा कारणीभूत. इथे विचारांचा प्रतिवाद विचारांनी करावा, अशी भूमिका घेतली जात नाही. गळे कापणार्‍यांना कायद्यानुसार शिक्षा होईल, असे म्हटले जाते. सरकार कुणाचे आहे, याची खात्री करून कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे की, नाही हे ठरवले जाते.  

यासोबतच तिसरा एक प्रकार घडतो तो म्हणजे अंत:प्रवाह (अंडरकरंट). झुंडशाही करून कुणी रस्त्यावरही उतरत नाहीत किंवा गळेही कापत फिरत नाहीत. अंत:प्रवाह असा प्रवाहित केला जातो  (कळ अशी फिरवली जाते) की, जो बोलतो तो आपणहून स्वत:च, कुणीही न सांगता स्वत:चे म्हणणे मागे घेतो. उदाहरण गिरीश कुबेर यांनी ‘असंतांचे संत’ संपूर्ण अग्रलेख दुसर्‍याच दिवशी मागे घेतला, तोही पहिल्या पानावर बिनशर्त माफी मागून. एरव्ही ‘भावना दुखावल्या गेल्या असल्यास’ असे शब्द असतात माफीत. पण, असंतांचे संत अग्रलेख मागे घेताना मागितलेल्या माफीत ‘भावना दुखावल्यामुळे’ , अशी थेट माफी होती. कुठून चावी, कळ फिरली होती, वेगळे सांगायला नको. 

भावना दुखावल्यावरचे व्यक्त होण्याचे तीन प्रकार आणि त्याकडे कसे पाहिले जाते ते वरील उदाहरणांवरून समजेल. हे सगळे नवीन नाही, हे विचारवंतांना पूर्णपणे माहीत आहे. म्हणून ते झुंडीने विरोध झाला तर त्याला आपल्या विचारांचा विजय मानतात. अंत:प्रवाह जाणवला तर कुठेही कसलीही वाच्यता न करता माघार घेतात. गळा कापला जाण्याची खात्री असेल तिथे गळाच काढत नाहीत. 

शनिवार, ११ जानेवारी, २०२५

दोष आणि जबाबदारी

दोष आणि जबाबदारी
मठ, मंदिराच्या वादात दोष आणि जबाबदारी ओळखणे महत्त्वाचे आहे. ज्याचा दोष आहे त्यावरच त्याची जबाबदारी निश्चित करणे महत्त्वाचे आहे. विचारवंत आणि विश्वस्त दोघेही आपापल्या जागी दोषी आहेत. त्यांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. अन्यथा संस्कृतीची हानी होणे निश्चित आहे.

लूट, लुटालूट म्हणजे एखाद्याच्या परवानगीशिवाय पैसे, मालमत्ता बळजबरीने काढून घेणे. दान दिलेल्या पैशांचा, जमिनीचा अपहार, गैरवापर किंवा दिलेल्या हेतूशिवाय अन्य गोष्टींसाठी वापर होणे याला फसवणूक म्हणतात. लूट, लुटालूट नाही. स्वखुशीने दिलेल्या दानाचा गैरवापर झाला तर त्याला लुटणे म्हणता येत नाही. मंदिर, मठ लुटालूट करतात का? तर ‘नाही’ हे त्याला स्पष्ट व रोखठोक उत्तर आहे. मग फसवणूक, लुबाडणूक कोण करतात? याचे उत्तर मंदिर, मठ समिती असे द्यावे लागेल.

देव वेगळा व देवस्थान वेगळे. लोक देवासाठी श्रद्धेने पैसे देतात व देवळे, मठ लुटतात. त्याच तर्काने जायचे तर देवस्थान, मठ वेगळे व त्यांच्या समित्या वेगळ्या. लोक देवस्थान, मठ यांना देणग्या देतात ते त्यांवर असलेल्या श्रद्धेमुळे देतात. लोक मठ, मंदिराला श्रद्धास्थान मानतात. त्या देवस्थान किंवा मठाच्या समित्यांना लोक श्रद्धास्थान मानत नाहीत. देवस्थान जागृत आहे, असे म्हटले जाते; देवस्थान समिती जागृत आहे, असे म्हटले जात नाही. समित्यांनी भ्रष्टाचार, अपहार केला, असे म्हटल्यास कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. पण त्यांना लक्ष्य करण्याऐवजी जाणूनबुजून श्रद्धास्थानाला लुटारू, हीन ठरवले जाते. कुठल्याही डॉक्टरने लुबाडणूक, फसवणूक केली तर आपण त्या डॉक्टरला दोषी धरतो; वैद्यकशास्त्राला नाही. त्याप्रमाणेच मंदिर, मठ समितीने भ्रष्टाचार केल्यास समितीला दोषी धरले पाहिजे, मंदिर किंवा मठाला नाही.  धर्माच्या, मंदिराच्या, मठाच्या नावे गैरव्यवहार केला जातो, असा तर्क मांडायचा तर तोच तर्क विज्ञानाचा, वैद्यकशास्त्राचा वापर करून फसवणार्‍या डॉक्टरलाही लागू होतो. विज्ञान, वैद्यकशास्त्र दोषी नसते; धर्म, मंदिर, मठ असतात असे कसे?

अनेक देवस्थानांना बाजारू रूप आले आहे, ते समित्यांमुळे आले आहे. देवस्थानांचे पावित्र्य नष्ट करण्याचे काम समित्यांनी केले आहे. देवस्थानाच्या जमिनी परस्पर विक्रीस काढणे, पैशांचे गैरव्यवहार आदी हीन प्रकार इतके चालतात की लिहितानाही कठीण वाटते. अनेक लहान लहान देवळांच्या जत्रा पटकार प्रायोजित करतात. काही ठिकाणी ‘देवाची’ आणि ‘पटकारांची’ अशा दोन दोन जत्रा भरतात. जत्रेला दूर कोपर्‍यात दारूची दुकाने सुरू असतात. देवस्थान समिती, ग्रामस्थ आणि पुजारी यांचे वाद अनेक देवळांत होतात. हाणामारीची भांडणे होतात. ज्या देवासाठी देवस्थान आहे, त्याची मूर्तीच उपटून काढण्यापर्यंत मजल जाते. या सगळ्यांना जे जे कारणीभूत आहेत, त्यांच्यावर कठोर आणि कडक कारवाई झालीच पाहिजे. एका गावातल्या मंदिरात समिती नेमण्यासाठी माणसे ओढून आणावी लागायची, त्या गावात एक कंपनी आल्याबरोबर आणि तिने पैसा ओतायला सुरुवात केल्याबरोबर देवस्थान समितीवर वर्णी लागण्यासाठी अक्षरश: घराघरांत वाद होऊ लागले. सत्ता, संपत्ती यांच्या नादात बरबटलेल्या देवस्थान समित्यांनी व सदस्यांनी देवस्थानांचे सांस्कृतिक महत्त्व कमी केले आणि अक्षरश: बाजार मांडला. उलट काही देवस्थान, मठ समित्यांनी केलेले सामाजिक, सांस्कृतिक कार्य खरोखरच वाखाणण्यासारखे आहे. अनेक लहानलहान मंदिरे लहानमोठे उपक्रम चालवत आहेत. शेगाव, पावस यांचे कार्य याबाबत अभ्यासण्यासारखे आहे. जे वाईट आहे ते वाईट आणि जे चांगले आहे ते चांगले, या न्यायाने ज्याचे माप त्याच्या पदरी घालणे म्हणूनच फार महत्त्वाचे ठरते.

लुटालूट हा शब्द जाणीवपूर्वक वापरला जातो. लूट करणारा लुटारू असतो. त्यामुळे, विचारवंत देवळे, मठ यांनाही लुटारू ठरवतात. वास्तविक त्यासाठी समित्यांना जबाबदार धरले पाहिजे. पण, तसे न करता विचारवंतांनी मंदिर व मठ यांना लुटारूंच्या श्रेणीत ढकलले. विचारवंतांची त्यामागची भूमिका, हेतू वेगळे आहेत हे ठळकपणे जाणवत असले तरीही देवस्थान समित्या आणि विश्वस्त सोवळे ठरत नाहीत. विचारवंत आणि विश्वस्त यांच्या चुकीच्या भूमिकांचे दूरगामी परिणाम म्हणजे धर्म, संस्कृती याविषयी नकारात्मक, त्याज्य, हीन भावनेत वाढ होते. समाजकारण, राजकारण यात सांस्कृतिक मानबिंदूंचा खेळ मांडणे कुणाच्याच  हिताचे नाही. त्याचप्रमाणे देवस्थानच्या नावाला बट्टा लागेल, अधर्म होईल असे कोणतेही कृत्य न करण्याची सर्वांत मोठी जबाबदारी मठ, मंदिर समित्यांवर आणि विश्वस्त असलेल्या लोकांवर आहे. विचारवंत आणि विश्वस्त यांनी संस्कृतीच्या मानबिंदूंना धक्का लागणार नाही, याची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. 

शुक्रवार, १० जानेवारी, २०२५

श्रद्धास्थानांवर आघात करणे हाच हेतू

दत्ता नायक व मोहनदास लोलयेकर या दोघांनी मांडलेली मते व त्यावर उमटलेली प्रतिक्रिया यावरून बरेच चर्वितचर्वण सुरू आहे. त्यावर कुणी कसे व्यक्त व्हावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. इथे जाणीवपूर्वक श्रद्धास्थानांना लक्ष्य केले जातेय का, हा मुद्दा अधिक महत्त्वाचा आहे.  ‘लुटालूट’, ‘देऊळ’ असेच शब्द का वापरले गेले? कारण ती श्रद्धास्थाने आहेत. संस्कृतीचे मानदंड असलेली प्रतीके आहेत. 

लूट, लुटालूट म्हणजे एखाद्याच्या परवानगीशिवाय पैसे, मालमत्ता बळजबरीने काढून घेणे. दान दिलेल्या पैशांचा, जमिनीचा अपहार, गैरवापर किंवा दिलेल्या हेतूशिवाय अन्य गोष्टींसाठी वापर होणे याला फसवणूक म्हणतात. लूट, लुटालूट नाही. स्वखुशीने दिलेल्या दानाचा गैरवापर झाला तर त्याला लुटणे म्हणता येत नाही. 

लोलयेकर म्हणतात देव वेगळा व देवस्थान वेगळे. लोक देवासाठी श्रद्धेने पैसे देतात व देवळे, मठ लुटतात. त्याच तर्काने जायचे तर देवस्थान, मठ वेगळे व त्यांच्या समित्या वेगळ्या. लोक देवस्थान, मठ यांना देणग्या देतात ते त्यांवर असलेल्या श्रद्धेमुळे देतात. ते त्यांना श्रद्धास्थान मानतात. त्या देवस्थान किंवा मठाच्या समितींना लोक श्रद्धास्थान मानत नाहीत. समित्यांनी भ्रष्टाचार, अपहार केला, असे म्हटल्यास कुणाचाही आक्षेप असण्याचे कारण नाही. जाणूनबुजून श्रद्धास्थानाला लुटारू, हीन ठरवले जाते. कुठल्याही डॉक्टरने लुबाडणूक, फसवणूक केली तर आपण त्या डॉक्टरला दोषी धरतो; वैद्यकशास्त्राला नाही. त्याप्रमाणेच मंदिर, मठ समितीने भ्रष्टाचार केल्यास समितीला दोषी धरले पाहिजे, मंदिर किंवा मठाला नाही.  धर्माच्या, मंदिराच्या, मठाच्या नावे गैरव्यवहार केला जातो, असा तर्क मांडायचा तर तोच तर्क विज्ञानाचा, वैद्यकशास्त्राचा वापर करून फसवणार्‍या डॉक्टरलाही लागू होतो. विज्ञान, वैद्यकशास्त्र दोषी नसते; धर्म, मंदिर, मठ असतात असे कसे?

दत्ता नायक व लोलयेकर यांनी देवस्थान समिती, मठ समिती लुटालूट करते असे म्हटले नाही. देवळे, मठ लुटालूट करतात असे म्हटले आहे. हे अनवधानाने नाही. पाच-सहा पिढ्या कळत नकळत रुजवलेल्या नकारात्मक विचारांचे ते प्रतिबिंब आहे. जगभर जिथे जिथे संस्कृती संपल्या तिथे तिथे हेच पाहावयास मिळते. अगदी नकळत बिंबवलेल्या शब्दांचा परिणाम खूप मोठा होतो. सगळे हिंदी चित्रपट काढून पाहा; त्यात वाईट घडते ते सणाच्या दिवशीच का असते? देवळात लपूनछपून प्रेम(?) करणारे दाखवतात; कधीही मशिदीत, चर्चमध्ये का नाही? ‘हवस का पुजारी’, असतो; पाद्री, मौलवी का नाही? प्रश्‍न हिंदू-मुस्लीम, हिंदू-ख्रिश्‍चन असा नाहीच मुळी. आपल्या संस्कृतीची श्रद्धास्थाने पद्धतशीरपणे नकारात्मक, घृणास्पद ठरवण्यात आली. याचा परिणाम इतका होतो की, ज्या सणांनी पर्यावरण जपले ते सण पर्यावरणविरोधी ठरवले जातात. देवळात बोकडाच्या बळीवर कायदेशीर बंदी आणली जाते. ईदला बोकडाचा बळी हा राज्यघटनेने दिलेला अधिकार ठरतो. ख्रिश्‍चन मिशनर्‍यांनी व साम्यवादी विचारवंतांनी शेकडो वर्षे रुजवलेले नकारात्मक विचार अशा पद्धतीने फलद्रूप होत आहेत. आपण आपल्याच संस्कृतीच्या प्रतीकांना हीन, वाईट ठरवत आहोत. 

याचीच दुसरी बाजू पाहू; यातला एकही विचारवंत, इतिहासतज्ज्ञ चर्च संस्थेने देवळे पाडून चर्च बांधल्या असे म्हणत नाही. ते बिल पोर्तुगिजांच्या नावे फाडले जाते. पोर्तुगिजांनी देवळे पाडून चर्च उभी केली असे म्हटले जाते. भारतभर देवळे पाडून मशिदी बांधल्या त्याचे बिल मुस्लीम शासकांवर फोडले जाते, इस्लामवर नाही. 

लुटालूट हा शब्द जाणीवपूर्वक वापरला जातो. लूट करणारा लुटारू असतो. देवळे, मठ हेही लुटारू ठरतात. नास्तिकवाद, समतावाद, पर्यावरणप्रेम, प्राणीप्रेम असलेले सगळे विचारवंत, अ‍ॅक्टिव्हिस्ट संस्कृतीच्या प्रतीकांना, मानबिंदूंना लक्ष्य करतात. म्हणूनच देवस्थान व मठ समितीऐवजी ‘देवळां’, ‘मठ’ आणि भ्रष्टाचार, फसवणूक याऐवजी ‘लूट’ असे शब्द जाणीवपूर्वक वापरले जातात. दत्ता नायक यांचा राजकीय लाभ मिळवण्याचा हेतूही असू शकेल. वाद होतील, पेटतील, चर्चेत राहता येईल या अपेक्षेने वाक्ये उच्चारलेली असू शकतात. मोहनदास लोलयेकरांनी समतावादी दृष्टिकोनातून भूमिका मांडलेली असावी. समाजकारण, राजकारण यात सांस्कृतिक मानबिंदूंचा खेळ मांडणे कुणाच्याच  हिताचे नाही. यातून निष्पन्न काहीच होत नाही. फक्त वादावादी आणि दूरगामी परिणाम म्हणजे धर्म, संस्कृती याविषयी नकारात्मक, त्याज्य, हीन भावनेत वाढ होते.