गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६

"जेनझी" नावाचे नवे हत्यार

काळाच्या ओघात काही शब्द, वाक्ये अशा पद्धतीने पसरवली जातात, की ती अधिकाधिक अभेद्य होत जातात. त्याविरुद्ध बोलणे हे पाप, घोर अपराध ठरवले जाऊ लागते. या शब्दांची भीती निर्माण केली जाते. प्रत्येकजण स्वत:स तसे म्हटले जाऊ नये किंवा त्याविरुद्ध असल्याचा शिक्का बसू नये याची अतोनात काळजी घेतो. हे वलयांकित शब्द अनेकांसाठी एकाचवेळी सपासप वार करणारे हत्यार व स्वसंरक्षणाची ढाल बनतात! 

जगभरात "रेसिस्ट", "इस्लामोफोबिक" या शब्दांची एवढी जबरदस्त भीती आहे, की तसे म्हटले जाऊ नये म्हणून इंग्लंडचे प्रशासन गुन्हेगारांना सोडून देऊ लागले. मीडिया "इस्लामी ग्रूमिंग गँग" म्हणण्याऐवजी त्यांना "एशिअन ग्रूमिंग गँग" म्हणू लागली.

भारतात असे अनेक शब्द आहेत, जे सतत वापरले जातात. त्यांची भीती निर्माण केली जाते. त्यांच्याभोवती वलय निर्माण केले जाते. ज्यांना प्रसिद्धी हवी असते, नाव झालेले हवे असते किंवा अन्यायाला वाचा फोडण्याच्या नावाखाली कुणालाही, कुठेही, काहीही बोलण्याची सवलत हवी असते ते लोक याचा यथेच्छ वापर करतात. लष्कर, सैन्य, पोलीस सगळेच यात "बाय डिफॉल्ट" गुन्हेगार व चुकीचे ठरवले जातात. त्यांनी त्याविरुद्ध जराही आवाज काढला, हालचाल केली की लगेच तो शब्द वापरून अन्याय होत असल्याची आरडाओरड केली जाते. त्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जबरदस्त प्रसिद्धी लगेच मिळते.

यात सध्या "ट्रेंडिंग" असलेला शब्द म्हणजे "जेनझी". हा शब्द प्रत्येक ठिकाणी हत्यारासारखा वापरला जात आहे. लडाख की काश्मीरमध्ये सैन्य दलाच्या अधिकार्‍यांना वाट्टेल ते बोलणारी मुलगी आपण जेनझी असल्याचे सांगते व संसदेत आवाज उठवण्याची भाषा करते, हे त्याचेच रूप आहे. हे प्रकरण अंगावर शेकले, तर हीच मुलगी माफी मागून मोकळी होईल. तिला काहीच शिक्षा होणार नाही. आरपीएफ (RPF) आणि रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या जवानांची तुलना टॉयलेट क्लीनरशी करणार्‍या मुलीला कसे सतावले जात आहे, याची बातमी व चर्चा तिच्या तसे म्हणण्यापेक्षाही जास्त झाली. या मुलीचेही तसेच होईल. आपणास ट्रोल करण्याचे भांडवल ती करेल, पण जेनझीचा वापर हत्यारासारखा आपल्याच देशाच्या सैन्याविरुद्ध केला म्हणून तिची साधी चौकशीही होणार नाही.

हाच सांस्कृतिक मार्क्सवाद आहे!


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: