अभियांत्रिकी शैक्षणिक अभ्यासक्रमात मानव्यशास्त्र (ह्युमेनिटीज) नेमका कशासाठी घुसडले आहे, याचे उत्तर शोधण्याची गरज आहे. त्याचा वापर खरोखरच समाजासाठी किती होतो, याचाही विचार झाला पाहिजे. जगभर ते आहे, म्हणून आपल्याकडेही ते हवे, हा विचार असेल तर जगभर ते कसे व का आहे, याचाही विचार झाला पाहिजे.
भारतातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांचे नियंत्रण करणार्या ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन(एआयसीटीई)च्या मॉडेल करिक्युलमनुसार, ४ वर्षांच्या बी.टेक अभ्यासक्रमात मानव्यशास्त्र(ह्युमेनिटीज)साठी १२ क्रेडिट्स गुण अनिवार्य करण्यात आले आहेत. हे क्रेडिट्स मिळवल्याशिवाय विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीची पदवी मिळत नाही.
जगभरातील अभियांत्रिकी कॉलेजमध्ये ‘लिबरल आर्टस्‘ किंवा ह्युमेनिटीज, आर्टस् अँड सोशल सायन्सेस(एचएएसएस) अनिवार्य असते. भारतासह तिथे तिथे सर्वत्र स्थानिक समाजातील सामाजिक दमन (सोशल ओप्रेशन) अभ्यासक्रमात असते. पण, कुठेही ख्रिश्चनिटी व इस्लामने केलेले सामाजिक दमन शिकवले जात नाही. हा फार महत्त्वाचा फरक आहे. जगभर ख्रिश्चनांनी केलेले ज्यूंचे सामाजिक दमन अभियांत्रिकीत कुठेच शिकवले जात नाही. ख्रिश्चनिटीने अमेरिकेत संपवलेले मय, इन्का आणि अँडियन समाज अमेरिकन अभियांत्रिकीत नाहीत, तिथे गौरवर्णीयांनी कृष्णवर्णीयांवर केलेले अत्याचार शिकवले जातात. आफ्रिकेतील सान, इबिबिओ, बासोथो, इग्बो यांचे ख्रिश्चनिटीने केलेले सामाजिक दमन अभियांत्रिकी अभ्यासक्रमात नाही. अपवाद म्हणून कॅनडातील युनिव्हर्सिटी ऑफ विंडसरमध्ये अभियांत्रिकीच्या एचएएसएसमध्ये ‘इन्डिजिनिअस पीपल, कोलोनिअलिझम अँड रेसिडेन्शिअल स्कूल्स’ हा विषय आहे. पण, इथेही ‘कोलोनिअलिझम’वर (वसाहतवादावर) त्याचे बिल फाडले आहे. इस्लामने व ख्रिश्चनिटीने भारतात केलेले हिंदूंचे सामाजिक दमन एकाही अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकवले जात नाही. गोव्यात ख्रिश्चनिटीने केलेले सामाजिक दमन अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात नाही.
अमेरिकेत गोर्यांनी केलेले कृष्णवर्णीयांचे दमन व जपानमध्ये शिनोकोशोंनी केलेले बुराकुमिन यांचे दमन शिकवले जाते. भारतात ‘ब्राह्मनिकल दमन’ शिकवले जाते. सर्वत्र स्थानिक सामाजिक दमन शिकवले जाते. जगभरात जे सर्वत्र अनेक समाजांचे दमन ख्रिश्चनिटीने व इस्लामने केले ते कुठेही ‘लिबरल आर्टस्‘ किंवा ह्युमेनिटीज, आर्टस् अँड सोशल सायन्सेस(एचएएसएस)खाली शिकवले जात नाही. ते शिकवले गेले तर ‘लिबरल आर्टस्‘, ‘लिबरल’ उरणार नाही आणि ‘ह्युमेनिटीज’चे मानव्य लगेच बंद पाडले जाईल! जिथे हे दमन टाळताच येत नाही तिथे ते राजसत्तेने व वसाहतवादाने केले, असे शिकवले जाते. यामागे, ख्रिश्चनिटी, इस्लाम व सांस्कृतिक मार्क्सवादी यांची जगभर असलेली युती कारणीभूत आहे. ख्रिश्चनिटीचे व इस्लामचे हे सामाजिक दमन शिकवले तर भारतात ‘सामाजिक सलोखा’ बिघडेल, समाजात द्वेषभावना भडकेल अशी भीती हेच लोक घालतात. मग, हिंदू समाजातील सामाजिक दमन दाखवल्यास हेच घडणार नाही का? तेच घडेल आणि तेच घडलेले तर हवे आहे. त्याचीची ही सामाजिक अभियांत्रिकी आहे!
भारतात ‘डीब्राह्मनायझिंग हिस्ट्री’ हे ब्रजरंजन मणी यांचे पुस्तक अभियांत्रिकी महाविद्यालयांत ‘ह्युमेनिटीज’ अभ्यासक्रमात शिकवले जाते. त्याचा आणि अभियांत्रिकीचा काहीही थेट संबंध नाही. उलट, जेव्हा हीच तथाकथित ‘शोषक जातव्यवस्था’ प्रबळ होती तेव्हा भारतीय अभियांत्रिकी जगात अग्रमानांकित होती. नगररचना, वास्तुरचना, जलनियोजन, रस्ते, शाश्वत अभियांत्रिकी, कालवे, धरणे, स्थापत्य, विहिरी, जहाजबांधणी, धातुशास्त्र यासह अनेक क्षेत्रांत भारताची कामगिरी नेत्रदीपक होती. त्याचा विचार केल्यास समाजासाठी कुठल्या पद्धतीची व कशा प्रकारची अभियांत्रिकी हवी, याचा विचार आजचे भारतीय अभियांत्रिकी शिक्षण करते का? की, त्याऐवजी तथाकथित ‘सामाजिक अन्याय’ पुसण्यासाठी नवा सामाजिक अन्याय करण्याला न्याय मानायला शिकवते? सर्वोच्च न्यायाल्याने तूर्तास स्थगित केलेली यूजीसी नियमावली तरी निदान हीच ‘ह्युमेनिटीज’ची अभियांत्रिकी स्पष्टपणे दाखवते!

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा