"नीम का पत्ता कडवा है" या नंतरची ओळ जी जंतरमंतरवर मोदींसाठी वापरली गेली, तीच ओळ भाजपच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधींसाठी पणजीतील मोर्चात वापरली. सहभागी एकाही नेत्याने माइकवरून दिल्या जाणार्या या घोषणेस बंद करायला सांगितले नाही.
सार्वजनिक जीवनात, स्थळी काय बोलावे याला मर्यादा असतात. महाराष्ट्रातील विचारवंतांनी, माध्यमांनी भाषणातून दिल्या जाणार्या शिव्यांना "ठाकरी भाषा" म्हणून गौरविले. संजय राऊत यांनी एका शिवीचा अर्थ "नॉटी", असा सांगितला होता. आता भाजपच्या कुणी त्या शिवीचा अर्थ "एजन्ट" असा सांगितला नाही, म्हणजे मिळवली.
काँग्रेसच्या नेत्यांनी या आधी मोदींसाठी जे जे अपशब्द वापरले, तेही अयोग्यच होते व आहेत. "आमच्या नेत्याबद्दल बोलाल तर आम्हीही तेच तुमच्या नेत्याबद्दल बोलू" हा त्यावरचा उपाय नव्हे. सार्वजनिक जीवनात कुणीच ते व तसे बोलू नये यासाठी उपाय करणे, योजणे गरजेचे आहे. याऐवजी झुंडशाही बळावली आहे. विरोध किंवा समर्थन करण्यासाठी कुठल्या तरी झुंडीचे असणे अनिवार्य झाले आहे. जे चूक आहे ते चूकच आहे, असे म्हणण्याचे धाडस झुंडीत असलेल्यांंना उरत नाही. तसे ते केले तर ती झुंडच त्याला संपवते.
शिवी किंवा गालिप्रदान हे राग व्यक्त करण्याचे अपवादात्मक साधन आहे. सार्वजनिक ठिकाणी घोषणा देण्याचे नाही. मंचावर, मोर्चात, आंदोलनात जेव्हा याचा वापर केला जातो, तेव्हा अशा गोष्टी "नॉर्मलाइज" केल्या जातात. हे घातक आहे. जे नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या तोंडी होते, तेच आता युवकांच्या व मुलांच्या तोंडीही आले आहे. हे लांच्छनास्पद आहे.
नेते ते कार्यकर्ते अशी फळी उभी राहते, तेव्हा चारित्र्य वरून खालच्या स्तरापर्यंत झिरपावे लागते आणि कार्य खालच्या स्तरापासून ते नेत्यापर्यंत ऊर्ध्वगामी व्हावे लागते. गणपती हे आपल्याकडे नेता, पुढारी, अधिपती कसा असावा याचे प्रतीकात्मक रूप आहे आणि कार्यकर्ता कसा असावा, याचे प्रतीकात्मक रूप म्हणजे महादेव. गणपतीचे डोळे, कान, सोंड हे सगळे नेत्याकडून अपेक्षित गुण आहेत. महादेवाला संपूर्ण निळा रंगवतात, ते चुकीचे आहे. तो गोरा आहे, कर्पूरगौर आहे. त्याचा फक्त कंठ निळा आहे. हलाहल प्राशन केले तेव्हा ते पोटात घेतले असते, तर मृत्यू ओढवला असता व बाहेर फेकले असते तर जगाचा विनाश ओढवला असता. कार्यकर्ताही असाच असावा लागतो. त्याच्या कार्यातून मिळणारे हलाहल पोटातही घ्यायचे नसते व बाहेरही फेकायचे नसते.
नेता व कार्यकर्ता होणे म्हणूनच खूप कठीण असते. प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यावी लागते. आंदोलनाचे नेते, समर्थक व मोर्चाचे नेते व कार्यकर्ते ती घेतील?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा