सोनम वांग्चुक यांच्या आंदोलनाचे, उपोषणाचे जे व्हायचे तेच झाले. उपोषणास बसलेल्या माणसासमोरच समर्थक जेवणावर ताव मारू लागले तेव्हाच या उपोषणामागचा हेतू व त्याचे परिणाम यांची कल्पना आली होती. ‘हाय क्या लोग मेरा साथ निभाने निकले’, असे अमजद इस्लाम अमजद जे एका गझलमध्ये म्हणतो, नेमकी तीच भावना सोनम यांची झाली असावी. थोडेसे कठोर वाटेल, पण यात त्यांचा मृत्यूच अनेकांना अपेक्षित होता. सोनम यांच्या हौतात्म्यावरच पुढची वाटचाल अवलंबून होती. जेव्हा क्रांती किंवा आंदोलन हे 'सामूहिक त्यागावरून' घसरून केवळ 'एकाच माणसाच्या त्यागावर' अवलंबून राहते, तेव्हा त्या आंदोलनाची शोकांतिका आधीच ठरलेली असते. यातून कुणाचे काय साधते, हाच खरा प्रश्न आहे.
आंदोलनाचा हा सगळा प्रवास, त्यातल्या चित्रविचित्र कठपुतळ्या पाहिल्या आणि त्यामागे असलेल्या अदृश्य हातांची जाणीव झाली. उपोषण इतके दिवस लांबले तरी सरकारचे त्यात हस्तक्षेप न करणे, उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी अपेक्षित गर्दी न जमणे, दिपके यांचे अनेकांना त्यासाठी आवाहन करणे, अनेक राजकीय व्यक्तींचे तिथे येणे-जाणे, त्यांच्या घोषणा, सैनी यांचे जनहित याचिका दाखल करणे, न्यायालयाने त्यांना इस्पितळात हलवण्याचा आदेश देणे, अन्य पर्याय नसल्याने सरकारचे त्यांना इस्पितळात हलवणे, याच दरम्यान अनेक ठिकाणाहून लोकांची लाखोंच्या संख्येने जंतरमंतरला धाव घेणे, संसद उखडून टाकण्याची भाषा करणे, ‘धर्मेश प्रधानचा राजीनामा नकोच सरकारच उलटवू’, अशा घोषणा देणे, हा सगळा घटनाक्रम पाहिला तर अनेक अदृश्य वर्तुळे व हात दिसू लागतात.
पर्यावरण, लडाख ते नीटचा घोटाळा व धर्मेश प्रधान यांचा राजीनामा हा प्रवास काही विचित्र संकेतांकडे बोट दाखवतो. सोनम वांग्चुक यांचे पर्यावरणाचे मुद्दे, त्यांनी त्यासाठी केलेले प्रयोग व त्यांचे प्रामाणिक हेतू याविषयी शंका घेण्याचे अजिबात कारण नाही. त्यांना देशद्रोही वगैरे ठरवण्याचेही काहीच कारण नाही. त्यांची पर्यावरणाची तळमळही न्याय्यच आहे. त्यांचे त्यासाठी सरकारविरुद्ध उभे ठाकणे हेही योग्यच आहे. खरी समस्या इथून पुढे सुरू होते. इथवरचे वर्तुळ हे स्थानिक व योग्य असते. यानंतर अनेक वर्तुळे सुरू होतात व त्यातील अनेकांचा अदृश्य सहभाग कृतीची दिशा ठरवतो आणि परिणाम त्यांना हवे तसेच घडत जातात. या लोकांच्या कृतीला विरोध म्हणजे प्रामाणिक हेतू असलेल्या व्यक्तीस व त्याच्या कार्यास विरोध असे हीच माणसे पद्धतशीरपणे पसरवतात.
सोनम वांग्चुक यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ येणार्यांचा प्रमुख व एकमेव मुद्दा हाच असायला हवा होता की, ‘नीट परीक्षा घोटाळा व धर्मेश प्रधान यांचा राजीनामा’. पण, ते सोडून तिथे सगळे सुरू होते. उपोषणस्थानी जेवणे, एलजीबीटींचे हिडीस नाचणे, ‘बस नाम रहेगा अल्लाह का’ म्हणणे, मूळ मुद्दा सोडून राजकारण्यांची त्यांच्या सोयीची वक्तव्ये करणे, हे सर्व प्रकार तिथे यथेच्छ घडले. प्रत्येक जण तिथे आपापले हेतू घेऊनच सामील होत होता. ज्या हेतूसाठी उपोषण सुरू झाले त्याचे कुणालाच सोयरसुतक नव्हते. हे सगळे हवशे, नवशे आणि गवशे तिथे स्वत:ची प्रसिद्धी करायला आले होते.
जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळण्याच्या नादात अशी अनेक आंदोलनांचा व तळमळ असलेल्या प्रामाणिक माणसांचा गैरवापर झाला आहे. भारतातील याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे ‘नर्मदा बचाव आंदोलन’! एकट्या अमेरिकेत ९०,०००पेक्षा जास्त लहान-मोठी धरणे बांधली गेली आहेत. युरोपमधील नद्यांवरही प्रचंड प्रमाणात धरणे बांधून त्यांनी सिंचन आणि जलविद्युत क्षेत्रात स्वयंपूर्णता मिळवली आहे. भारताचे ’सरदार सरोवर’ असो किंवा इथिओपियाचे ’ग्रँड रेनेसां डॅम’ असो, आंतरराष्ट्रीय एनजीओ आणि जागतिक बँकेने विकसनशील देशांमधील मोठ्या प्रकल्पांना पर्यावरणविरोधी ठरवून त्यांचा निधी रोखला. परंतु, अमेरिका किंवा युरोपातील अशा मोठ्या धरणांना हटवण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी कधीही जागतिक पातळीवर अशा तीव्र मोहिमा चालवल्या गेल्या नाहीत. अन्यत्र जिथे कोळसा निर्मितीस पर्यावरणाच्या नावावर प्रचंड मोठा विरोध केला जातो, तिथेच युरोपमध्ये ऊर्जेचे संकट निर्माण झाले, तेव्हा जर्मनीने स्वतःचे बंद केलेले कोळसा प्रकल्प पुन्हा सुरू केले. एवढेच नाही, तर ’लुत्झराथ’ हे संपूर्ण गाव उद्ध्वस्त करून तेथे ’गार्झवाइलर’ या कोळशाच्या महाकाय उघड्या खाणीचा विस्तार केला. युगांडा आणि टांझानिया दरम्यान होणार्या ’ईस्ट आफ्रिकन क्रूड ऑइल पाइपलाइन’ या प्रकल्पाविरोधात युरोपियन युनियनची संसद आणि आंतरराष्ट्रीय एनजीओंनी प्रचंड मोहीम चालवली आणि आफ्रिकेने तेलाचा वापर करू नये असा सल्ला दिला. अगदी त्याच काळात, अमेरिकेने अलास्कासारख्या अत्यंत संवेदनशील पर्यावरणीय भागात ’विअलो प्रोजेक्ट’ या महाकाय तेल उत्खनन प्रकल्पाला मंजुरी दिली. तमिळनाडूमधील ’कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पा’विरोधात अनेक वर्षे तीव्र आंदोलने झाली. फ्रान्स आपल्या एकूण विजेपैकी सुमारे ७०% वीज अणुऊर्जेपासून तयार करतो. संपूर्ण युरोप आणि अमेरिकेत शेकडो अणुभट्ट्या गेल्या अनेक दशकांपासून कार्यरत आहेत. त्यांच्याविरोधात तोंडीलावण्यापुरता विरोध होतो. पण, विकसनशील देशांतील प्रकल्पांना मात्र पर्यावरणाचे कारण पुढे करून तीव्र विरोध होतो, त्याला लगेच आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी दिली जाते.
सोनम वांग्चुक हे मूलत: राजकीय नेते नसून एक 'गांधीवादी विचारवंत आणि संशोधक' आहेत. त्यामुळे, आपला वापर होऊ न देता कार्य सिद्धीस नेणे त्यांना जमत नाही. वांग्चुक यांच्या लडाखमधी बर्फाच्या प्रकल्पात प्लास्टिकचा अतोनात वापर झाला तेव्हा पर्यावरणाची हानी झाली नाही. भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तिथे कुठलाही प्रकल्प सुरू होतो, तेव्हा मात्र पर्यावरणाची हानी होते व ती आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजते. हे उगाच घडत नाही. सोनम यांची तळमळ चुकीची आहे का? निश्चितच नाही, पण त्यांचा होणारा आंतरराष्ट्रीय वापर त्यांना टाळता येत नाही, हे वास्तव आहे. वास्तविक कुठलाही व्यावसायिक लाभाचा प्रकल्प होण्यास विरोध करून पर्यावरणाची हानी झाली तरीही राष्ट्रीय सुरक्षेच्या प्रकल्पांना सोनम वांग्चुक यांनी पाठिंबा देणे रास्त ठरले असते.
त्यामुळे, उपोषणामागील हेतूची तळमळ अप्रामाणिक नाही, हेतूही नाही. कृती ताब्यात न राहिल्याने व त्यात संबंध नसलेल्यांचे हेतू घुसल्याने परिणाम मूळ हेतूनुसार होत नाहीत. यातून काहीच साध्य होत नाही किंवा भलत्यांचेच साधते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा