कै. प्रसन्न बर्वे आणि श्री. शिवराम बर्वे, असा उल्लेख केल्यास काय होईल? मेणबत्तीची दोन्ही टोके पेटवल्यामुळे जास्त उजेड होईल की, मेणबत्तीचा नाश होईल? हे दोन्ही प्रश्न ‘कायच्या काय’ किंवा वेडगळ वाटतील. पण, ते तसे नाहीत. पहिल्या प्रश्नाचा संबंध संकेतांशी आहे आणि दुसरा प्रश्न अशा अनेक संकेतांचा समुच्चय असलेल्या संस्कृतीशी आहे.
संकेत, शब्द, प्रतीक यांचा संबंध अनेकदा विशिष्ट संकल्पनेशी असतो. दोन शब्दांचा अर्थ एकच असला तरी त्यांचा वापर करण्याची रूढ पद्धत, संकेत वेगवेगळे आहेत. त्यांच्या ‘वेगळे’ असण्याचा असमानता, उच्च-नीचता, सन्मान-अपमान याच्याशी काही संबंध येत नाही. त्यांचा संबंध अर्थबोध होण्याशी असतो. ‘आलय’ आणि ‘घर’ या दोन शब्दांचा अर्थ ‘राहण्यासाठी बांधलेली जागा’ असा होतो. पण, म्हणून देवालयात गेलेल्या माणसाविषयी, ‘ते कुठे गेले आहेत’ हे सांगताना कुणी ‘देवाघरी गेले’ असे म्हणत नाही. रूढ संकेतांनुसार ‘देवालयात जाणे’ याचा आणि ‘देवाघरी जाणे’ याचा अर्थ वेगळा आहे.
शिवराम बर्वे हे माझे वडील, काही वर्षांपूर्वी देवाघरी गेले. त्यांच्याविषयी, त्यांच्या विद्वत्तेविषयी मला कितीही आदर असला व ते कायम माझ्या सोबतच आहेत, अशी भावना असली तरीही त्यांच्या नावाआधी श्री. लावणे चुकीचेच ठरते. त्याचप्रमाणे मला, ‘पुरे झाले हे जगणे’ किंवा ‘हा संसार असार आहे’ वगैरे असले वैराग्याचे कितीही झटके आले तरीही, हयात असताना माझ्या नावाआधी कै. लावणे चुकीचेच ठरेल. शब्द हे फक्त शब्द नसतात, त्यांना अर्थ असतो, त्यांना संकेत असतात.
संकेत आणि प्रतीक चिन्हे कुठेही व कशीही वापरणे अनादर करणारे व चुकीचे ठरते. कुंकू, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी या सर्वांचे स्थान व महत्त्व आयुष्यातील एक विशिष्ट टप्पा सूचित करतात. विवाहित स्त्रीचे हे सौभाग्यालंकार आहेत. स्त्री विवाहित असल्याची ती खूण आहे. विवाहाआधी व वैधव्य प्राप्त झाल्यानंतर अलंकारांचे कुठलेच औचित्य नसते. कुमारिका व विधवा स्त्रीने ते परिधान न करणेच योग्य.
हे जरी खरे असले, तरीही या रूढ धारणेला आधुनिक समाजात आणखीही काही कंगोरे आहेत. सौभाग्यालंकारांचे महत्त्व जसे ग्रामीण महिलांमध्ये आहे, तसे ते निम-शहरी, शहरी व उच्चशिक्षित महिलांमध्ये नाही. शहरी भागांत नोकरी व व्यवसाय करणार्या महिला मंगळसूत्राऐवजी तत्सम हार, अलंकार घालतात. काकणे घालणे, न घालणे त्या करत असलेल्या कामाच्या स्वरूपानुसार ठरते. त्यात काही चुकीचेही नाही. नेहमीच्या वापरात सौभाग्यालंकार पूर्णत: घालत नसल्या तरी व्रतवैकल्ये, मंगलकार्य या ठिकाणी आवर्जून घालतात. ग्रामीण भागांतील विवाहित महिला सौभाग्यालंकार दैनंदिन व्यवहारातही घालतात. ग्रामीण महिलांचा त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही उपयुक्तता यापेक्षाही सौभाग्य, सांस्कृतिक प्रतीक म्हणून अधिक असतो. विवाहित स्त्री, सुवासिनी म्हणून अन्य स्त्रियांकडून मिळणारा मानही मोठा असतो. सामान्यत: विवाहित स्त्रीकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोनही आदराचा असतो.
दुर्दैवाने हेच आदराचे स्थान विधवा स्त्रीच्या वाट्याला येत नाही. त्यातही पुन्हा तिच्या वयोमानाप्रमाणे त्यात फरक पडत जातो. कोवळ्या वयातील विधवा स्त्रीचे जीवन फारच कष्टप्रद व वखवखलेल्या पुरुषी नजरांनी भरलेले असते. स्मृतींनी यावर तत्कालीन परिस्थितीमध्ये उपाय म्हणून सांगितलेले केशवपन, नेमस्त व्रताचरण वगैरे नियम आपण रूढ केले. पण, त्याचबरोबर विधवा स्त्रीला कुटुंबात, समाजात यतीचा दर्जा देण्यात यावा, हे स्मृतिवचन सोयीनुसार टाकून दिले. त्याऐवजी तिला अपशकुनी ठरवण्यात आले. तिचे दर्शनही अमंगळ ठरवण्यात आले. आजच्या ग्रामीण भागांतही ही परिस्थिती अद्याप बदलली नाही. पतीच्यामागे मुलांची, संसाराची जबाबदारी समर्थपणे आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना मार्गी लावणार्या स्त्रीचा आदर वास्तविक विवाहित स्त्रीपेक्षाही कैक पटीने अधिक झाला पाहिजे. पण, बहुतांशी हा आदर मिळालाच तर वृद्धापकाली मिळतो. तरुण विधवा स्त्रीच्या चारित्र्यावर सहज शिंतोडे उडवले जातात. हे कटू असले तरी सत्यच आहे. शहरी भागांत विधवा स्त्रीचे एकेरी पालकत्व किंवा लिव्ह-इन-रिलेशनमध्ये असणे समाजमान्य होत चालले आहे. निमशहरी व ग्रामीण भागांमध्ये पुनर्विवाहाला आणि पुन्हा लग्न केलेल्या स्त्रीलाही तोच मान मिळणे सर्वमान्य होत आहे.
विधवा स्त्रीला सुवासिनी स्त्रीप्रमाणे ‘हळदी कुंकू’ या समारंभांमध्ये सहभागी करून घेणे, तिने सौभाग्यालंकार घालणे हा तिच्याप्रति असलेला दृष्टिकोन बदलण्याचा उपाय नव्हे. हे जिवंत माणसाच्या नावामागे कै. व मृत व्यक्तीच्या नावाआधी श्री. संबोधन लावण्याइतकेच औचित्यभंग करणारे ठरेल. उलट, एखाद्या स्त्रीला तिच्यावर झालेल्या संस्कारांमुळे किंवा ते अलंकार घातल्याने पतीची आठवण वारंवार आल्यामुळे जास्त त्रास होऊ शकतो. एखादी विधवा स्त्री पतीपेक्षाही अलंकारांत आणि सुवासिनी म्हणून मिळणार्या सन्मानात अडकलेली असल्यामुळे ती सौभाग्यालंकारांचा, हळदीकुंकवाचा हट्टाग्रह धरत असल्यास तेही चुकीचेच ठरेल. विधवा स्त्रीला कुंकू लावताना, परिचयातील विवाहित स्त्रीला खरी परिस्थिती माहिती असतेच. ती नजरेतून व्यक्तही होते. कधी कधी अपमानापेक्षाही, सन्मान जास्त वेदना देऊन जातो!
अत्याचारापासून सुरक्षेसाठी विधवांनी सौभाग्यालंकार घालावेत, हा विचार मांडणारे विचारवंत, स्त्रीने कमीत कमी वस्त्रे घालण्याचे समर्थन करताना ‘पूर्ण झाकलेल्या स्त्रीवरही अत्याचार होतो’ असा तर्क मांडतात. गोव्यातील कायदा महाविद्यालयातील एका प्राध्यापक महिलेने विद्यार्थ्यांना शिकवताना मंगळसूत्राला ‘कुत्र्याच्या गळ्यातील पट्टा’ संबोधले होते. एकच मंगळसूत्र विवाहितेला दुय्यम व असुरक्षित करते आणि विधवेला भक्कम व सुरक्षित ठेवते. पांढरी कपाळं घेऊन फिरणार्या कुमारिका व विवाहित महिला, विधवा स्त्रीने कुंकू लावण्याविषयी आग्रही असतात. हा वैचारिक विरोधाभास, विधवा स्त्रीला आदर व सन्मान मिळवून देण्यापेक्षाही सांस्कृतिक प्रतीकांना हीन व स्थानभ्रष्ट करण्यासाठी केला जातो. मेणबत्ती दोन्ही बाजूंनी जाळली की, उजेड होण्याऐवजी, ती मेणबत्ती लवकर संपून पुन्हा अंधार होतो.
मंगळसूत्रासकट इतर अनेक प्रतीकांचा संबंध हीन गोष्टींशी व विकृतींशी जोडल्याने त्या नकोशा वाटू लागल्या. ती प्रतीके, त्या वस्तू वापरायला लाज वाटू लागली. पुरुषांनी टिळा न लावणे, कुमारिकांनी कुंकू न लावणे, विवाहित स्त्रीने कमीत कमी टिकली लावणे व मंगळसूत्र लपवणे हे आधुनिक असल्याचे लक्षण झाले. ‘स्त्रियांनीच का घालायचे मंगळसूत्र, पुरुषांनी का नाही?’, ‘मंगळसूत्र हा माझ्यासाठी सौभाग्यालंकार वगैरे काही नसून तो फक्त एक अलंकार/दागिना आहे.’, हे विचार रूढ झाले. आता त्याची पुढची पायरी आली आहे. या नको असलेल्या ‘सौभाग्य-लोढण्यांचं’ हवं असणं विधवा झाल्यानंतर जाणवू लागलं आहे. ते काढले जाऊ नयेत यासाठी महाराष्ट्रातील हेरवाड गावात ‘विधवा प्रथा बंद करणे संदर्भात चर्चा करणे’ असा विषय ठेवून ठरावही मंजूर करण्यात आला आहे.
कुंकू, मंगळसूत्र आहे म्हणजे ‘ती कुणाची तरी आहे’ आणि हे नसलं म्हणजे ‘ती कुणाचीही’ अशा नजरेने तिच्याकडे पाहिले जाते. हे खरे असले तरी ती सामाजिक विकृती आहे. लैंगिक अत्याचार करणारा विकृत पुरुष विवाहित स्त्रीवरही बलात्कर करतो. ही विकृती घालवण्यासाठी मंगळसूत्र घालणे हा उपाय म्हणायचा झाल्यास, लैंगिक अत्याचार व बलात्कार होतात म्हणून सुरक्षेसाठी शाळकरी मुलीनेही मंगळसूत्र घालावे का? ‘मंगळसूत्र घालावे की, घालू नये हे ठरवण्याचे स्वातंत्र्य त्या विधवेला असावे.’, असे म्हणणार्यांना मंगळसूत्र काढणार्या व बांगड्या फोडणार्या स्त्रियांचे स्वातंत्र्य मान्य आहे का? फोडणे बंधनकारक नसावे, असे म्हणताना ‘न फोडणे’ ग्रामसभेत ठराव घेऊन बंधनकारक करणे योग्य कसे वाटते?
माझ्या मते, विधवा स्त्री स्वत: सौभाग्यालंकार उतरवून ठेवत नसेल, तर जबरदस्तीने ते उतरवून घेऊ नयेत. जबरदस्ती करून काकणे फोडू नयेत. विधवा स्त्रीला वेगळी वागणूक देऊ नये, अपशकुनी म्हणून हिणवू नये. उलट नवर्याच्या पश्चात तिला सर्व कार्यात सहभागी करून घ्यावे. त्याच्या पश्चात तिने पेललेल्या जबाबदारीचा, संसारासाठी ती घेत असलेल्या कष्टांचा व तिच्या स्त्रीत्वाचा योग्य मान राखला जावा. हळदी-कुंकू लावणे याचा संबंध मानापमानाशी न जोडता सौभाग्याशी व विवाहित स्त्रीची ओळख इतक्यापुरताच ठेवावा. हळदी कुंकू लावले म्हणजे मान आणि नाही लावले म्हणजे अपमान, दुय्यम लेखणे असे समजण्याचे काहीच कारण नाही. वैधव्य प्राप्त झालेली स्त्री पुनर्विवाह करून पुन्हा सौभाग्यालंकार प्राप्त करू शकते. त्यासाठी विधवा असताना त्यांचा हट्टाग्रह धरणे कितपत योग्य? पुनर्विवाह करायचा नसल्यास, सौभाग्यालंकार घालू नये व हळदी-कुंंकू कार्यक्रमात सहभागी होऊ नये. प्रतीकांचा आग्रह संकेतपालनासाठी व्हावा, मोडण्यासाठी नव्हे.
विकृती घालवायची, कमी करायची असेल तर त्यांंची जागा संस्कृतीने व्यापणे आवश्यक आहे. आपण विकृती घालवण्यासाठी संस्कृती संपवत आहोत. आपण आपल्या कुटुंबात, समाजात विधवा स्त्रीला किती व कसा आदर देतो, यावरून आपल्यावर काय संस्कार झाले आहेत, हे समजू शकते. मुळात अपण संस्कार रुजवत नाही आणि संस्कृतीला दोष देतो. विकृतीसाठी संस्कृतीला जबाबदार धरतो. माणसं मारून संस्कृती संपत नाही. त्या संस्कृतीची प्रतीके, संकेत हीन ठरवा, विकृत करा. मग त्या संस्कृतीतले लोकच ती संस्कृती स्वत:हून संपवतात. विकृती नाहीशी किंवा कमी व्हावी यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आपण संस्कृतीच्या प्रतीकांना हीन व स्थानभ्रष्ट करत आहोत. यातून विकृती नष्ट होण्याऐवजी संस्कृतीच नष्ट होण्याची भीती अधिक आहे.




